सुश्री सुलु साबणेजोशी
इंद्रधनुष्य
☆ “वस्त्र” – लेखिका : सुश्री अश्विनी मुळे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
त्या वैभवशाली, भव्य दरबारात ती एखाद्या भिंगरीसारखी गरगरत होती. हात जोडत होती, विनवण्या करत होती. ती तेजस्वी बुद्धीमती युक्तिवाद करत होती. पण सर्वांच्याच माना खाली होत्या. अखेर दु:शासनाने तिच्या केसांना पकडून तिला थांबवलं आणि तिच्या वस्त्राला हात घातला. एकच जळजळीत नजर आपल्या महापराक्रमी पतींकडे टाकून तिने डोळे घट्ट मिटून घेतले. कृष्णाचा धावा सुरु केला. “तुझं बोट कापल्यावर मी बांधलेल्या चिंधीएवढं वस्त्रसुद्धा माझ्या अंगावर उरणार नाहीये आता. तू तरी काही करणार आहेस कां? की तूही बसणार आहेस मान खाली घालून?” पण हे काय? संपूर्ण शरीराला वस्त्राचा स्पर्श अजूनही कसा काय जाणवतोय? दुर्योधनाचं मन बदललं कां? तिने हलकेच डोळे उघडले. दु:शासन दात ओठ खात दरादरा वस्त्र ओढत होता आणि ते संपतच नव्हतं. एकाला जोडून दुसरं. दुसऱ्यात गुरफटलेलं तिसरं. शालू, शेले, अंशुकं, किंशुकं, पटाव. रेशमी, कशिदाकारीची, जरीबुट्टयांची वसनं. ओघ संपतच नव्हता. संपूर्ण राजसभा पुतळ्यासारखी स्तब्ध होऊन ते आश्चर्य बघत होती. दुर्योधनाचा मदोन्मत्त चेहरा भयचकित झाला होता. बलदंड दु:शासन घामाने नाहून निघाला होता. आणि एका क्षणी ते पृथ्वीमोलाचे पाटव प्रकटलं. त्याच्या सुवर्ण झळाळीने सर्वांचे डोळे दिपले. त्या वस्त्राला मात्र हात घालण्याची हिंमत दु:शासनात नव्हती. ते तेज असह्य होऊन तो खाली कोसळला. पितामह भीष्मांनी हात उंचावून इशारा केला आणि नि:शब्दपणे दरबार रिकामा झाला. उरले फक्त अग्निकुंडातल्या ज्वालेसारखी दिसणारी द्रौपदी आणि तिच्या पायाशी कोसळलेला दु:शासन. त्याच क्षणी अठरा दिवस चालणाऱ्या सर्वसंहारी महायुद्धाचं बीज रोवलं गेलं.
वस्त्राच्या हरणामुळे महाभारत झालं आणि हरणाच्या वस्त्रामुळे रामायण घडलं. एक पळही विचार न करता, राजवस्त्रांचा त्याग करून, वल्कलं लेऊन रामा पाठोपाठ वनाची वाट धरणाऱ्या राजसबाळी सीतेला सुवर्णमृगाच्या काचोळीचा मोह कसा काय पडला असेल? तो मोह इतका प्रभावी होता की रामाने परोपरीने सांगूनही तिने आपला हट्ट मागे घेऊ नये? तिची फक्त पाऊले पहिलेल्या लक्ष्मणावर तिने संशय घ्यावा? त्याने संरक्षणासाठी आखून दिलेली मर्यादा तिने ओलांडावी?
आपल्या तीन प्राथमिक गरजांमधे दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वस्त्रांची ही ताकद. ज्यांनी दोन अजरामर युद्धं घडवून आणली. समरभूमीवर अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्णाला वस्त्रच आठवलं. ‘वासांसी जीर्णानी यथा विहाय’.
‘एक नूर आदमी, दस नूर कपडा’. माणसाचं व्यक्तिमत्त्व खुलवणारी वस्त्रं. आत्मविश्वास वाढवणारी. ऊब देणारी. सन्मान करणारी. आदर, माया, प्रेम दर्शवणारी वस्त्रं.
गेले तेरा दिवस एक वस्त्र लाखो लोकांना जोडून घेत होतं. रेशमी धाग्यांबरोबर अतूट श्रद्धा गुंफली जात होती. लाखो हात ते विणत होते. लाखो पाय त्या वस्त्रापर्यंत पोचण्यासाठी आनंदाने तिष्ठत होते. प्रेम, श्रद्धा, भक्तीचा कशिदा त्यावर उमटत होता. राजवस्त्र हा शब्दसुद्धा अपुरा ठरेल त्या महावस्त्राला. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामासाठी विणल्या जाणाऱ्या वसनात आपले दोन धागे सोडताना लाखो मनं उचंबळत होती. अनघाताई घैसास, तुमचं कौतुक तरी किती करू? आपण मांडलेल्या या खेळात किती सहजपणे तुम्ही सर्वांना सामावून घेतलंत. रोज बारा बारा तास चालणारे पंधरा हातमाग आणि त्यात आम्ही दिलेलं दोन धाग्यांचं अर्घ्य. त्या दोन धाग्यांत तुम्ही आम्हाला श्रीरामापर्यंत पोचवलंत. अयोध्येला कधी जाणं होईल, माहित नाही. कधी ते रामदर्शन होईल, माहित नाही. पण माझ्या हातचे दोन धागे आज ना उद्या रामचंद्राच्या पोशाखात असतील, ही भावनाच किती तोषवणारी आहे. रामाची मूर्ती घडवण्यासाठी आणलेल्या शिळेला स्पर्श करताना जे समाधान मिळालं, त्याच तोडीचं धागे विणतानाचं समाधान होतं. त्या दोन धाग्यांनी प्रत्येकाचा सहभाग राममंदिराच्या उभारणीत नोंदला गेला. पुणे ते अयोध्या हे अंतर एका नाजुकशा धाग्यावर स्वार होऊन, आम्ही सहज पार केलं. जेव्हा प्रभू रामांचं प्रत्यक्ष दर्शन घेऊ तेव्हा आम्ही विणलेले धागे त्यांच्या वस्त्रातून आम्हाला ओळख देतील. हे भाग्य अनघाताई, तुम्ही आम्हाला दिलंत.
लेखिका : अश्विनी मुळे
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
मो – 9421053591
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈