इंद्रधनुष्य
☆ भारतरत्न किताबाचे उपेक्षित मानकरी – भाग-1 – लेखक : श्री सुभाषचंद्र सोनार☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
भारतरत्न किताबाचे उपेक्षित मानकरी : …. नाना जगन्नाथ शंकरशेठ.
“आपण एतद्देशीय लोक जगन्नाथ शंकरशेठ यांचे अत्यंत ऋणी आहोत. कारण ज्ञानाचे बीज पेरण्यात ते अग्रेसर होते; इतकेच नव्हे तर सध्या त्याची जी जोमाने वाढ झाली आहे त्याचे सर्व श्रेय त्यांनाच आहे.“
– दादाभाई नौरोजी
आमच्या जातिव्यवस्थेचा डंख, महामानवांनाही चुकला नाही. परिणामी सामान्य माणसासारखी, असामान्य माणसं देखील, जातिव्यवस्थेची बळी ठरली आहेत. आमच्या देशात नावलौकिकासाठी, व्यक्तीचं नुसतं कार्यकर्तृत्व पुरेसं नसतं. तर त्याला जातीच्या प्रमाणपत्राचीही जोड असावी लागते. जातीचं प्रमाणपत्र हे अनेकदा, प्रगतीपत्रकावरही कुरघोडी करतं. तुमच्याकडे प्रस्थापित जातीचं प्रमाणपत्र असेल, तर मग तुमच्या राई एवढ्या कर्तृत्वाचेही पर्वत उभे केले जातील. आणि ते नसेल, तर तुमच्या पर्वता एवढ्या कर्तृत्वाचीही राई राई केली जाईल. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे नाना जगन्नाथ शंकर शेठ!
आज नाना जगन्नाथ शंकर शेठांची २१२ वी जयंती. हे नाना कोण? असा प्रश्न काहींना पडेल, तर काही म्हणतील हे नाव ऐकल्यासारखं वाटतं, पण हे गृहस्थ कोण ते मात्र आठवत नाही. नानांचं योगदान आणि कार्यकर्तृत्वाचा परिचय असणारेही आहेत, पण थोडेच.
मित्रहो, नानांची एका वाक्यात ओळख सांगायची तर, नाना जगन्नाथ शंकर शेठ हे भारतीय रेल्वेचे जनक आहेत, एवढं सांगितलं तरी पुरेसं आहे. पण ते नानांच्या कार्यकर्तृत्वरुपी हिमनगाचं फक्त टोक आहे. एवढं नानांचं योगदान विशाल आहे.
१० फेब्रुवारी १८०३ रोजी मुंबईत, एका धनाढ्य सोनार (दैवज्ञ) परिवारात, नानांचा जन्म झाला. कुशाग्र बुद्धीच्या नानांचं शिक्षण घरीच झालं. तरुणपणी आपला वडीलोपार्जित व्यापाराचा वारसा तर नानांनी समर्थपणे चालवलाच, पण समाजकारण, अर्थकारण, राजकारण, शिक्षण, कला, विज्ञान अशा जीवनाच्या अनेक क्षेत्रात, त्यांच्या अश्वमेधी अश्वाने निर्विघ्न संचार करुन, नानांच्या कार्यकर्तृत्वाची पताका चौफेर फडकवली. त्यामुळेच आचार्य अत्रेंनी ‘मुंबईचा अनभिषिक्त सम्राट’ असं त्यांचं सार्थ वर्णन केलं आहे.
नाना हे फक्त धनाढ्य नव्हते, गुणाढ्यही होते. नाना इतके धनाढ्य होते की, प्रसंगी इंग्रज सरकारलाही ते अर्थसहाय्य पुरवित, आणि नाना इतके गुणाढ्य होते की, अनेक महत्वपूर्ण प्रश्नांवर इंग्रज अधिकारी, नानांशी परामर्श करीत. नाना जणू त्यांचे थिंक टँक होते. धनाचा आणि गुणांचा असा मनोरम आविष्कार क्वचितच पहायला मिळतो.
मुंबई या आपल्या जन्मभूमि आणि कर्मभूमिवर नानांचं निरतिशय प्रेम होतं. भारतात सुरु होणा-या नव्या गोष्टींचा मुळारंभ, हा मुंबईपासूनच झाला पाहिजे, हा नानांचा ध्यास होता. इंग्रजांची भारतातील राजधानी कलकत्ता होती. तरीही या देशात रेल्वेचा मुळारंभ मुंबईपासून झाला, त्याचं सर्व श्रेय नानांना आहे. हे पाहून मला मेहदी हसन यांच्या गजलेतील —
‘मैंने किस्मत की लकीरों से चुराया है तुझे।’
—- या काव्यपंक्तींचं स्मरण होतं.
आज रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन (जीवनरेखा) बनली आहे. पण खरोखरच ‘दैवज्ञ’ नानांनी, नियतीच्या हातातली लेखणी काढून घेऊन, स्वहस्ते ती जीवनरेखा मुंबईच्या करतलांवर रेखली आहे. त्यासाठी आपल्या संवादकुशलतेने त्यांनी इंग्रज अधिका-यांचं मन वळवलं. त्यांना सर्वप्रकारच्या सहकार्याचं आश्वासनही दिलं. त्यासाठी १८४३ साली ग्रेट ईस्टर्न रेल्वे कंपनीच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. नुसता पुढाकारच घेतला नाही, तर या कंपनीच्या तीन प्रवर्तकांपैकी एक प्रवर्तक नानाच होते. तसेच रेल्वेच्या कार्यालयासाठी स्वत:च्या घरात जागा उपलब्ध करुन देऊन, नानांनी रेल्वेच्या मार्गातील तोही अडथळा दूर केला. अशाप्रकारे १६ एप्रिल १८५३ रोजी, मुंबई-ठाणे या मार्गावर धावलेली ही रेल्वे, फक्त भारतातील पहिली रेल्वे नव्हती, तर आशिया खंडातील पहिली रेल्वे होती. मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणा-या, बोरीबंदर-पुणे या रेल्वेमार्गाचे जनकही, नानाच आहेत. नानांच्या या बहुमोल कार्याचा गौरव इंग्रज सरकारने सोन्याचा पास देऊन केला. त्यायोगे नानांना रेल्वेच्या पहिल्या वर्गातून, प्रवासाची सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिली.
नानांच्या लोककार्याच्या यज्ञाची सांगता इथेच होत नाही, तर मुंबई विद्यापीठ, ग्रँट मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज, जे. जे. स्कूल अॉफ आर्टस, एल्फिन्स्टन कॉलेज या शिक्षणसंस्थांच्या उभारणीत, नानांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. स्रीशिक्षणाचेही नाना पुरस्कर्ते होते. मुलींसाठी त्यांनी स्वखर्चाने स्वत:च्या घरात शाळा सुरु केली. तसेच मुलींसाठी शाळा सुरु करणा-या रेव्हरंड विल्सन यांना शाळेसाठी, गिरगावात जागा उपलब्ध करुन दिली. तत्पूर्वी सन १८४६-४७ मध्ये नानांनी महाराष्ट्रभर हिंडून, शैक्षणिक परिस्थितीची पहाणी करुन, आपले अनुभव बोर्ड अॉफ एज्युकेशनचे अध्यक्ष, सर अर्स्किन पेरी यांना कळविले. त्यातूनच महाराष्ट्रात सार्वत्रिक शिक्षणाचा पाया घातला गेला. त्यामुळेच आचार्य अत्रेंनी म्हटले आहे, “आज मुंबई इलाख्यामध्ये विद्यादानाचा जो विराट वृक्ष पसरलेला दिसतो त्याचे बीजारोपण नाना शंकरशेट यांनी केले आहे हे प्रत्येक महाराष्ट्रीयाने ध्यानात धरावेत. आम्ही हे म्हणतो असे नव्हे तर महर्षि दादाभाई नौरोजींनीच मुळी तसे लिहून ठेवलेले आहे.”
– क्रमशः भाग पहिला
लेखक : -सुभाषचंद्र सोनार, राजगुरुनगर.
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈