डॉ गोपालकृष्ण गावडे
इंद्रधनुष्य
☆ एक अलौकिक व्यक्तिमत्व !… आद्य शंकराचार्य — भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆
एक अलौकिक व्यक्तिमत्व !… आद्य शंकराचार्य
भारतात आजवर अनेक महान व्यक्तीमत्वे होऊन गेली. त्यांचे कार्य इतके महान होते की शेकडो वर्षांनंतरही भारतीय समाज त्यांच्या समाजोपयोगी कार्याबद्दल कृतज्ञ आहे. ती कृतज्ञता व्यक्त करत भारतीय समाज या महापुरूषांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतो.
आज अशाच एका अलौकिक व्यक्तिमत्वाची माहिती घेऊ या !
वैशाख शुक्ल पंचमी ! आद्य शंकराचार्यांचा जन्मदिवस !
… सहा भारतीय दर्षणांपैकी प्रसिद्ध अद्वैत वैदांत दर्शनाचे जनक आणि प्रणेते,…. ब्रम्हसुत्रावर भाष्य, १० प्रमुख उपनिषदांवर भाष्य, विवेकचुडामणी, उपदेशसहस्री यासारख्या ३०० पेक्षा जास्त ग्रंथांचे निर्माते,… शास्रार्थात प्रकांड पंडितांना नम्रपणे नमवत धर्म दिग्विजय करणारे पंडित , …
जगतगुरू आदी शंकराचार्यांची आज जयंती.
सामान्य मनुष्याला शेकडो वर्षात जे कार्य साध्य होणार नाही ते केवळ ३२ वर्षांच्या आयुष्यात साध्य करणारे हे असामान्य व्यक्तिमत्व !
केरळ मधील चेर राज्यात पेरीयार नदीच्या किनाऱ्यावर वसलेले कलदी हे गाव होते. हे गाव आजच्या कोची शहराजवळ आहे. या कलदी गावात शिवगुरू आणि सुभद्रा(आर्यांम्मा) भट्ट हे ब्राह्मण जोडपे राहत होते. लग्नाला बरेच वर्षे झाली तरी दोघांना मुलबाळ मात्र होत नव्हते. दोघे शंकराचे निस्सिम भक्त होते. एक दिवस शिवगुरूला स्वप्नात श्रीशंकराने दर्शन दिले. सोळा वर्षांचा बुद्धीमान पुत्र किंवा साठ वर्षांचा कमीबुद्धी पुत्र … यापैकी एकाची निवड करायला श्रीशंकराने शिवगुरूला सांगितली. यावर शिवगुरूंनी सोळा वर्षांचा बुद्धीमान पुत्र मिळावा अशी इच्छा व्यक्त केली.
पुढे यशावकाश माता सुभद्रा गर्भवती राहिली आणि वैशाख शुक्ल पंचमीला त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. श्रीशंकराच्या कृपाप्रसादाने झाला म्हणून बालकाचे नाव शंकर ठेवले.
शंकराचार्यांच्या जन्मसालाबद्दल मात्र एकवाक्यता नाही. वेगवेगळे विद्वान लोक शंकराचार्यांचा काळ वेगवेगळा मानतात. अगदी इस पुर्व 491 पासून इ.स. नंतर 897 पर्यंत वेगवेगळ्या वर्षी शंकराचार्यांचा जन्म झाला होता असे वेगवेगळे लोक मानतात.
शृंगेरीपीठानुसार महाराज विक्रमादित्याच्या कार्यकाळाच्या चौदाव्या वर्षी शंकराचार्यांचा जन्म झाला. पण विक्रमादित्य ही पदवी अनेक राजांना दिली गेली, ज्यांनी प्रजेवरील सर्व कर माफ केले होते. अगदी शंकराचार्यांनी उभारलेल्या चार पीठांमध्येही शंकराचार्यांचे जन्मसालाबद्दल एकवाक्यता नाही.
शृंगेरी शारदापीठ – इ.स.पूर्व 483
जगन्नाथपुरी गोवर्धन पीठ – इ.स.पूर्व 484
बद्रिकाश्रम ज्योतिर्मय पीठ – इ.स.पूर्व 485
द्वारकापीठ – इ.स.पूर्व 491
वयाच्या तिसऱ्या वर्षीच बाल शंकरच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले. शंकरचे पाचव्या वर्षी यज्ञपवीत संस्कार झाले आणि शंकर शिक्षणासाठी गुरुगृही गेला. पण केवळ दोन वर्ष गुरूगृही राहून बालक शंकरने तात्कालिक शिक्षण व्यवस्थेतील सर्व शास्त्रांचे ज्ञान मिळवले. शिकवायला नवीन काहीही बाकी न राहिल्याने गुरूने सातव्या वर्षीच शंकरला स्वगृही परत पाठवून दिले. बाल शंकरने वयाच्या सातव्या वर्षी प्रकांड पंडिताला लाजवेल इतके ज्ञान मिळवले होते.
या ज्ञानामुळे शंकरला बालवयातच वैराग्य प्राप्त झाले होते. त्याला संन्यास घ्यायचा होता. पण आई आपल्या एकुलत्या एक पुत्राला संन्यास घ्यायची अनुमती देईना. शंकर आठ वर्षाचा असताना एकदा नदीत स्नान करत होता. इतक्यात मगरीने बाल शंकरचा पाय पकडला आणि ती त्याला खोल पाण्यात ओढू लागली. त्या अवस्थेतही बाल शंकरने आईला संन्यास घेऊ देण्याची विनंती केली. शेवटी आईने त्याची विनंती मान्य केली. त्यावर मगरीने शंकरचा पाय सोडला. बाल शंकरच्या मनासारखे झाले. संन्यासदिक्षा घेऊन बाल शंकर गुरूच्या शोधात बाहेर पडला.
पण इतक्या प्रभावी बालकाला गुरूही तसाच हवा. महिष्मती राज्यात नर्मदा नदीच्या तीरावर ओंकारेश्वर येथे गोविंद भगवतपादांचा आश्रम होता. ते महाज्ञानी म्हणून प्रसिद्ध होते. बाल शंकरने त्यांचे शिष्यत्व पत्करण्याचा निर्णय घेतला. दोघांची भेट झाल्यावर गोविंदपादांनी बालशंकरला त्याचा परिचय विचारला. त्यावर “मनोबुद्धयहंकार चित्तानि नाहम्…” असे सहा कडव्यांचे निर्वाण षट्कम हे पद्य सांगितले. बालशंकरने भुजंगवृत्तात तयार केलेल्या या सुंदर निर्वाण शटकात बालशंकरने आपला परिचय केवळ “शिवो अहम्” असा करून दिला. असा बुद्धिमान शिष्य मिळाल्याने गोविंद भगवतपाद सुद्धा सुखावले. त्यांनी बाल शंकरला आपला शिष्य बनवले. त्यांनी बालशंकरला वेदांत, अष्टांगयोग आणि उपनिषदांचे ज्ञान भरभरून दिले. शिक्षण पूर्ण झाल्यावर शंकर तेथेच आचार्य म्हणून काम करू लागले. शंकर आता शंकराचार्य झाले.
शंकराचार्यांना ब्रम्हसुत्रावर भाष्य करण्यासाठी इच्छा होती. त्यासाठी गुरूंच्या परवानगीने शंकराचार्य काशीला गेले. तेथे त्यांनी ब्रम्हसुत्र, प्रमुख दहा उपनिषदे आणि भगवत गीतेवर भाष्य लिहिली. काशीला गंगेच्या तटावर शंकराचार्यांनी अनेक विद्वानांसोबत शास्त्रार्थ केला. एकदा एका विद्वान ब्राम्हणाबरोबर सुरू झालेला शास्त्रार्थ तब्बल आठ दिवस चालला. शंकराचार्यांच्या ज्ञानावर समाधानी होऊन त्या ब्राम्हणाने शंकराचायांना भरभरून आशीर्वाद दिला…. शंकराचार्यांचे १६ वर्षांचे आयुष्य वाढून ३२ वर्षांचे होईल असा आशीर्वाद. प्रत्यक्ष चिरंजीव वेदव्यास ब्राह्मणरूपात शंकराचार्यांशी शास्त्रार्थ करत होते असे मानले जाते. त्यांचा आशीर्वाद खरा ठरला. शंकराचार्यांना अद्वैत वेदांताचा प्रचार प्रसार करायला आणखी सोळा वर्षांचे आयुष्य मिळाले.
–क्रमशः भाग पहिला
© डॉ गोपालकृष्ण गावडे
सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर
सिंहगड रोड, पुणे
मो 9766325050
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈