? इंद्रधनुष्य ?

☆ अधिकमास म्हणजे काय? ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

अधिक मासाविषयी…

अधिकमास  म्हणजे काय? व त्याला एवढे महत्व कां?

सण हे चंद्रावर अवलंबून आहेत.आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत.आपल्या कालगणनेत चांद्र आणि सौर पद्धतीचा  उत्तम असा मेळ घातलेला  आहे. या गणितावरुन येणारा जास्तचा जो महिना असतो तो म्हणजे “अधिक मास” व कमी झालेला  जो महिना असतो  त्याला “क्षयमास” असे म्हटले जाते. 

सूर्य एका राशीमधे असताना.  जर दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ झाला, तर पहिला येणारा महिना  जो असतो तो अधिकमास असतो व दुसरा तोच असणारा महिना हा 

निजमास असतो. 

ज्या चांद्रमहिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास . 

या आधिक मासात ३३ या संख्येला विशेष महत्व (प्राधान्य) आहे.

अधिक महिन्याचा आणि ३३ अंकांचा संबंध  काय?

तर एका चांद्रवर्षात ३६० तिथी असतात. 

आणि एका सौर वर्षात ३७१ तिथी असतात.

म्हणजेच प्रत्येक चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा ११ तिथीने लहान आहे. 

आता प्रत्येक वर्षात  ११ तिथी जर कमी झाल्या. तर ११ या संख्येप्रमाणे तिन वर्षात ३३ तिथी कमी होतात.

आणि ३३ तिथी  ज्या कमी होतात. त्या कमी तिथींचा योग्य मेळ बसावा म्हणून एक महिना हा वाढीव धरण्यात येतो. आणि त्या वाढीव येणाऱ्या  महिन्यालाच

अधिक महिना (अधिकमास, धोंडामास) म्हणतात. 

दोन अधिकमासात कमीतकमी २७ महिने व जास्तीतजास्त 

३४ महिने अंतर असते. 

आता अधिकमासात कोणती कर्मे करावीत ? कोणती कर्मे करू नयेत ?

तर अधिकमासात नित्य व नैमित्तिक कर्मे करावीत  म्हणजेच नामकरण, अन्नप्राशन इत्यादी कर्मे करावी. परंतू देव प्रतिष्ठापना, चौल, उपनयन, विवाह, संन्यासग्रहण, वास्तुशांत, गृहारंभ इत्यादी कर्मे करू नयेत असे शास्त्रात सांगितले आहे.

अधिकमासाला पुरुषोत्तममास असे का म्हणतात ?

याविषयी एक कथा सांगितली जाते. अधिकमासाला धोंड्यामहिना,अथवा मलमास असेही म्हटले जाते. 

या महिन्यात शुभ कार्ये केली जात नाहीत. फक्त नैमित्तिक कार्येच होतात. याचे  या अधिकमासाला खूप वाईट वाटले. म्हणून एकदा हताश, निराश,दु:खी

झालेला अधिकमास हा श्रीविष्णूंकडे गेला

व आपली निराशा सांगितली

श्रीविष्णूने अधिकमासाला श्रीकृष्णाकडे पाठवले.

श्रीकृष्णाने मात्र अधिकमासाचे स्वागत करुन त्याचे  “पुरुषोत्तम मास”

असे नांव ठेवले. आणि  सांगितले  हा सर्वोत्तम मास आहे. लोक या महिन्यात जास्त दानधर्म करतील. व  त्या मुळे हा मास पुण्यकारक मास म्हणून ओळखला जाईल. 

म्हणून याला अधिकमास अथवा ‘ पुरुषोत्तममास ‘ असे नांव प्राप्त झाले.

अधिकमासात ‘ विष्णूपूजनाला प्राधान्य आहे. तसेच अपूप दान ‘ देण्याची पद्धत आहे. अपूप म्हणजे जाळीदार पदार्थ. उदा. 

(अनारसे, बत्तासे, मेसूर)

वेदकालातही 

“न पूयते विशीयंति” इति -अपूप ‘ असे वर्णन आहे.

गहू किंवा तांदूळाच्या पिठात तूप व गूळ मिसळून केलेला विशेष पदार्थ (अपूप) म्हणजे “अनरसा” 

अधिकमासात ३३ अनरशांचा नैवेद्य विष्णूला अर्पण करावा. व ३३ अनरसे दान करावेत असे सांगण्यात आले आहे.

विवाह समारंभात कन्यादानाचे वेळी जावई व मुलगी यांना विष्णू व लक्ष्मी स्वरुप मानून माता,पिता त्यांना नमस्कार  करतात. त्यामुळे जावई हा विष्णूसमानच असतो.  

म्हणून विष्णूरुपी जावयाला ३३ अनरसे दान देण्याची पद्धत पडली आहे.

किती महिने अधिक येतात?

सूर्याच्या भासमान गतीमुळे ठराविकच महिने अधिक येतात. 

चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक आणि फाल्गुन हे  ९ महिने अधिक येतात. 

मार्गशीर्ष व पौष हे २ महिने क्षयमास होतात.

राहिला उर्वरीत माघ महिना.  हा मात्र कधीच क्षय किंवा अधिक होत नाही.

आता क्षयमास म्हणजे काय?

कधी कधी एका चांद्रमहिन्यात सूर्य दोन राशीत प्रवेश करतो. तो क्षयमास असतो.  

आणि एक क्षयमास आला की त्यावर्षी दोन अधिकमास येतात.

संदर्भ–  श्री दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोलअभ्यासक.

संग्राहिका : सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments