☆ इंद्रधनुष्य : अग्नी -पद्मिनी ☆ सौ. डाॅ. मेधा फणसळकर 

हे अग्निदेवा, तुझ्याच साक्षीने सात फेरे घेऊन मी विवाहबंधनात अडकले. अतिशय पराक्रमी “राजा रतनसिंह” यांची पत्नी म्हणून   चितोड साम्राज्याची “राणी पद्मिनी” झाले.मी इकडे आले त्यावेळी तुझ्या असंख्य ज्योतीनी औक्षण करताना तू मला माझ्या मातेची आठवण करुन दिलीस आणि जणू काही माहेरहून आलेला माझा सखाच असल्यासारखा तू मला वाटलास. मग ठायी ठायी मी तुला शोधू लागले आणि तुझ्या दर्शनाने सुखावू लागले.

राजवाड्यातील देवघरातील समईच्या ज्योतीत प्रकाशित होणाऱ्या तुझ्या सान्निध्यात परमेश्वराची आराधना करताना मन प्रसन्न होत होते.

शयनगृहातील तुझ्या मंद प्रकाशाच्या साथीने आम्ही पती-पत्नी एकरुप झालो आणिआमच्या उभयतांच्या प्रेमाचा तू साक्षीदार झालास.

दिवाळीत तुझ्या लक्ष लक्ष  पणत्यांच्या उजेडाच्या नक्षीकामाने चितोड  गड न्हाऊ लागला.गडावरील दारुकाम बघताना तुझी असंख्य रुपे मनामनात उत्साहाचे दीप पेटवू लागले.

पाकगृहात तर तुझेच साम्राज्य!सर्वांना चवीचे खाऊ घालणे तुझ्याशिवाय अशक्य होते.उत्सवाच्या वेळी तर एकावर एक उठणाऱ्या पंक्ती आणि चुलीखाली सुरू असणारे तुझे सततचे नर्तन नवनवीन पदार्थाना जन्म देत होते आणि खवय्यांची रसना तृप्त करत होते.

दीपदानाच्या उत्सवाच्या  वेळी  हलक्या हलक्या लाटांवर तुला अल्लदपणे झोके घेताना बघून मन प्रफुल्लित होत होते.जणू काही संपूर्ण जलदेवतेने लखलखणाऱ्या अग्नीचे वस्त्र पांघरले आहे असे वाटत असे.

युद्धाला निघालेल्या आणि युद्ध जिंकून आलेल्या पतीला ओवाळताना निरांजनाची वात पेटवणारा तू माझ्या मनातही अभिमानाचे, शौर्याचे आणि धैर्याचे बीज पेटवत होतास.तुझ्या सान्निध्याने मी आश्वस्त होत होते.

मात्र आज अल्लाउद्दीन खिलजीसारख्या बलाढ्य योद्द्यांशी लढताना माझ्या पराक्रमी पतीने वीरमरण पत्करले आहे आणि त्या नराधमाची माझ्यावर नजर पडली आहे.चितोडसह माझाही घास घेण्यासाठी तो इकडेच येत आहे. हे अग्निदेवा,वेगवेगळ्या रुपात सतत माझ्याबरोबर असणाऱ्या तुला मी माझा पाठीराखाच मानते. तुला सोडून मी कोणाला बरे शरण जाणार? माझे किंबहुना आम्हा सर्वांचे रक्षण करण्यासाठी माझ्या सर्व सख्यांसह मी तुझ्या आश्रयाला आले आहे.आतापर्यंत जशी साथ दिलीस तशीच साथ दे आणि आमचे रक्षण कर.

 

© सौ. डाॅ. मेधा फणसळकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
2 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Shyam Khaparde

उत्कृष्ट रचना