श्रीमती उज्ज्वला केळकर
इंद्रधनुष्य
☆ हिरव्या हास्याचा कोलाज आणि गौतम राजर्षी – क्रमश – भाग २ ☆ सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण बघितले,
‘हरी है ये जमीं कि हम तो इश्क बोते है
हमीं से हँसी सारी, हमीं पलके भिगोते है
धरा सजती मुहब्बत से, गगन सजता मुहब्बत से
मुहब्बत से ही , खुशबू, फूल, सूरज, चाँद होते है… ) आता इथून पुढे —
कथेच्या ओघात दोन बोचरी सत्ये लेखकाने प्रगट केली आहेत. एनकाऊंटरमधे शहीद झालेल्या आपल्या परममित्राची आठवण काढता काढता, मोहितच्या मनात येतं, जोर्यंत तुम्ही शहीद होत नाही, तोपर्यंत तुम्ही बहादूर नसता. ज्या देशासाठी तुम्ही जीव गमावला, त्या देशवासीयांना क्षणभर थांबून तुमच्यासाठी दु:ख करायला वेळ नसतो. दुसरं सत्य म्हणजे, आपण बहादूर आहात की नाही, हे दाखवण्यासाठी, आपण कुठे लढलात, ती जागा महत्वाची. दूर चीड – देवदारच्या जंगलात झालेलं राहूलचं युद्ध, दिल्ली-मुंबईच्या परिसरात झालं असतं, तर तो आत्तापर्यंत हीरो झाला असता. आता मात्र न्यूज चॅनेलच्या बातम्यांच्या खाली धावणार्या पट्टीपुरतं त्याचं हिरोइझम मर्यादित झालय.
‘इक तो सजन मेरे पास नही रे’ ही संग्रहातील अतिशय सुरेख, भावुक, हळवी कथा. कथेच्या सुरूवातीला एका दृश्याचं वर्णन येतं. झेलमच्या साथीने जाणारा रस्ता जिथे तिची साथ सोडतो, तिथे चिनारचा एक पुरातन वृक्ष आहे. गावाची वस्ती जिथे संपते, तिथे हा वृक्ष आहे. नियमित पेट्रोलिंगसाठी जाणार्या विकास पाण्डेयला नेहमी वाटतं, तिथे उभ्या असलेल्या देखण्या, चित्ताकर्षक तरुणीला त्याला काही तरी सांगायचय आणि ते खरंच असतं. एक दिवस आपली जीप थांबवून तो तिची चौकशी करतो. ती सुंदर तर आहेच. पण तिचे डोळे त्याला दल आणि वुलर सरोवराचा तळ गाठणारे वाटतात आणि तिच्या नाजूक देहातून उमटणारा आवाज अतिशय गंभीर वाटतो. वेगळीच ओढ लावणारा. व्याकूळ करणारा. त्याला पाकिस्तानी गायिका रेशमाची आठवण होते. विशेषत: तिचं गाणं, ‘चार दिना दा प्यार ओ रब्बा बडी लंबी जुदाई.’ तिच्या डोळ्यातली तळ गाठणारी दल आणि वुलरची सरोवरं, तर कधी त्यात उसळलेलं झेलमच तूफान आणि तिचा रेशमासारखा व्याकूळ करणारा आवाज आणि रेशमाचं ते गाणं.. लंबी जुदाई… याची गुंफण कथेमधून अनेक वेळा इतकी मोहकपणे आणि मार्मिकपणे झाली आहे, की सगळी कथा प्रत्यक्ष वाचायलाच हवी.
ती तरुणी रेहाना. तिचा प्रियकर सुहैल गेल्या महिन्यापासून गायब आहे. त्याचा ठावठिकाणा शोधण्याची विनंती ती मेजर विकास पाण्डेयला करते. तो तिला त्याचा शोध घेण्याचं आश्वासन देतो.
सुहैलचा शोध घेतल्यावर असं लक्षात येतं की तो सरहद्दीपलीकडे जिहादी कॅम्पमधे दहशतवादाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलाय. सुलतान नावाचा मेंढपाळ पाच हजार रुपये आणि दोन पोती आटा, डाळ याच्या मोबदल्यात, सुहैलशी मोबाईलवर बोलणं करून देण्याचा मान्य करतो. दिल्या शाब्दाला आणि दिल्या पैशाला, आटा-डाळीला तो जागतो. विकासाचं सुहैलशी बोलणं होतं. तो जन्नत म्हणून तिकडे गेलेला असतो. प्रत्यक्षात जहन्नूमचा अनुभव घेत असतो. आपल्याला यातून बाहेर काढण्याची तो विनंती करतो. विकास त्याला ‘सरहद्द पार करून या बाजूला ये, पुढचं सगळं मी बघेन’, असं सांगतो. एका जिहादी गटाबरोबर तो इकडे यायचं ठरवतो पण…
एके दिवशी विकासच्या चौकीवर, सरहद्दीजवळ एनकाऊंटर झाल्याची बातमी येते. सरहद्द पार करून येणार्या एका जिहादी दहशतवादी गटाला, आधीपासूनच दबा धरून बसलेल्या सैन्याच्या तुकडीने मारून टाकल्याची ती बातमी असते. सुलताना नावाच्या कुणा मेंढपाळाने पन्नास हजार रुपयांच्या बदल्यात, ही खबर दिलेली असते. मेलेल्यांच्या यादीत सुहैलचंही नाव असतं.
त्या रात्री सायलेंट मोडवर असलेल्या विकासच्या मोबाईलवर रेहानाचा नंबर वारंवार फ्लॅश होत होता आणि त्याच्या लॅपटॉपवर रेशमा गात होती…
‘इक तो साजण मेरे पास नाही रे
दूजे मीलन दी कोई आस नही रे
‘गर्ल फ्रेंड’ ही कथा दहशतवाद्यांशी प्रत्यक्ष झालेल्या चकमकीचं वर्णन करते. एका मोठ्या घरात दोन अफगाण दहशतवादी लपून बसल्याची माहिती कळते. त्यांचा सफाया करण्याचा प्लॅन ठरतो. त्या प्रमाणे अंमलबजावणी होते, पण अनपेक्षितपणे चकमकीला वेगळं वळण लागतं. मेजर प्रत्यूशचा बड्डी तळघर झाकणारी पट्टी उचकटणार असतो आणि प्रत्यूश आत ग्रेनेड टाकणार असतो. मेजर सिद्धार्थ व त्याचा बड्डी त्यांना फायरिंग कव्हर देणार असतात. सिद्धार्थ म्हणतो, ‘सर, तुम्ही अनेक यशस्वी ऑपरेशन्स पार पाडलीत, यावेळी मला ग्रेनेड आत टाकू द्या. प्रत्यूश मान्य करतो आणि दोघे आपआपल्या जागा बदलतात आणि अनपेक्षितपणे अफगाणीच अंदाधुंद गोळीबार करत, पट्टी उचकटून बाहेर येतात. या गोळीबारात सिद्धार्थ आणि त्याचा बड्डी धराशायी होतात. आपल्यासाठी बाहेर पडलेली गोळी सिद्धार्थचा जीव घेणारी ठरली, या विचाराने प्रत्यूश कासावीस होतो. त्याला सतत वाटत रहातं, आपण सिद्धार्थचं म्हणणं मान्यच केलं नसतं तर…
इतक्या गंभीर कथेचा शेवट मात्र नर्म विनोदाने होतो. इथे नर्स शकुंतलाला तो सांगतो, ‘मृत्यू समोर दिसत असताना मी माझ्या गर्ल फ्रेंडचे नंबर मोबाईलवरून डीलीट करत होतो कारण मी मेल्यानंतर माझ्या सामानासकट मोबाईल माझ्या बायकोकडे जाईल आणि मी तर तिला सांगितलं होतं की आता मी कुठल्याही गर्ल फ्रेंडच्या संपर्कात नाही. तिला हे नंबर बघून काय वाटलं असतं?’
असाच नर्म विनोदी शेवट ‘हॅशटॅग’ कथेचा आहे. ही समर प्रताप सिंह या तरुणाच्या एकतर्फी विफल प्रेमाची कहाणी. या कथेत प्रामुख्याने मिल्ट्री कॅंडिडेट्सना जे कठोर प्रशिक्षण दिलं जातं, त्याची माहिती येते. ही माहिती, समर आपल्या बहिणीला मुनमूनला आपल्या दिनचर्येची माहिती देतो, त्यावरून कळते.
लॅपटॉपवरून जेव्हा त्याला कळतं त्याची प्रेयसी सगुना हिचा साखरपुडा आदित्यशी झाला आहे, तेव्हा तो कासावीस होतो. सगुनाशी प्रत्यक्ष बोललं, तर ती आपलं प्रेम मान्य करेल अशीही त्याला भाबडी आशा आहे. यावेळी त्याच्या कंपनीतली सगळी मुले एकजुटीने कसं कारस्थान रचतात आणि दोन दिवसांसाठी वरिष्ठांच्या नकळत त्याला सगुनाला भेटायला कसं पाठवतात, याचं मोठं खुसखुशीत वर्णन कथेत येतं. हे सारं प्रत्यक्षच वाचायला हवं. तो रात्री तिला भेटतो. ती अर्थातच त्याचं बोलणं धुडकावून लावते. मग तो त्याचा रहात नाही. फळं कापायची सूरी तो तिच्या पोटात खुपसतो आणि आपल्या कॅम्पसवर निघून येतो.
नंतर त्यांची पहिली टर्म संपते. सगुना सुखरूप असल्याचे त्याला कळते. त्याला आनंद होतो. सगुणा-आदित्यचं लग्नं होतं, हे कळल्याने त्याला दु:ख होतं. घरी आल्यावर सगुनाला एकदा तरी बघावं, म्हणून तो तिच्या घराजवळ रेंगाळतो. त्याला एकदा रिक्षात ती दिसते. त्याला पहाताच ती आदित्यला अधीकच खेटून बसते. त्यावेळी तो दोन प्रतिज्ञा करतो. एक म्हणजे तो आजन्म अविवाहित राहील आणि कधी तरी आपल्या विरह-व्यथेवर एक कथा लिहील, पण त्यात सगुना आदित्यला खेटून बसणार नाही, तर त्याच्यापासून दूर सरकून बसेल. वरील दोन्ही कथांमधून कठोर कथानायकांच्या निरागसतेचं मोठं मनोज्ञ दर्शन घडतं.
‘चिलब्लेन्स’ म्हणजे हिमदंश. या कथेत ‘दर्ददपुरा’ या कुपवाड शहरापासून सुमारे ७० की.मीटर अंतरावर असणार्या खेड्याची आणि त्याच्या ‘दर्द’ची म्हणजे दु:खांची कहाणी येते. गाव इतकं सुंदर, जसं काही भोवतालच्या पहाडांनी आपले बाहू पसरून स्वर्गालाच कवेत घेतलय. पण गावाची दु:खे अनेक. वीज नाही. डॉक्टर नाही. उपचारासाठी लोकांना थेट कुपवाडाला जावं लागतं. मेजर नीलाभचा फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड असलेल्या माजीदचं हे गाव. आपल्या दोन सुंदर मुलींना, शायर नवर्याला, भरल्या संसाराला सोडून माजीदची बायको एका जिहादीबरोबर गेलीय. गावात घरटी एक तरी जिहादी. त्यामुळे तरुण मुले बरीचशी गारद झालेली. उपवर मुलींसाठी मुलेच नाहीत. हे दु:ख तर काश्मीर घाटीतल्या अनेक ठिकाणांचे.
माजीदच्या वडलांच्या डाव्या हाताला चार बोटे नाहीत. त्याचे कारण नीलाभने विचारले असता, त्याला कळते, हिमदंशामुळे बोटात होणार्या वेदानांपासून सुटका करून घेण्यासाठी त्याने स्वत:च केलेला हा उपचार आहे. बोटंच तोडण्याचा. नीलाभला वाटतं, सगळा ‘दर्ददपुरा’ आपल्याकडे बघून रडतो आहे. तो तिथून परत येताना ठरवतो, ‘हेडक्वार्टरकडे प्रस्ताव द्यायचा, की कंपनीच्या. डॉक्टरांनी आठवड्यातून दोन वेळा ‘दर्ददपुरा’ गावाला व्हिजीट द्यावी आणि त्याला वाटतं ‘दर्ददपुरा’ आता आपल्याकडे बघून हसतोय.
‘द बार इज क्लोज्ड ऑन च्युजडे. ही एक अगदी वेगळ्या प्रकारची कथा. रहस्यमय अशी ही भूतकथा तीन तुकड्यातून आपल्यापुढे येते आणि शेवट तर भन्नाटच. प्रत्यक्ष वाचायलाच हवा असा.
दुसरी शहादत, हैडलाईन, हीरो, आय लव्ह यू फ्लाय बॉय, अशा एकूण 21 कथा यात आहेत. अनेक विषयांवरच्या या सगळ्याच कथा वेधक आहेत. लेखकाची चित्रमय शैली, स्थल, व्यक्ती, घटना-प्रसंग यांचा साक्षात् अनुभव देणारी आहे. याला बिलगून आलेले काव्यात्मकतेचे तरल अस्तर, कथांना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं. ‘गर्ल फ्रेंड’, ‘हॅशटॅग’, ‘एक तो सजन …’ सारख्या काही कथा वाचताना वाटत राहातं, यावर उत्तम दर्जेदार चित्रपट होऊ शकतील. यातील कथांबद्दल किती आणि काय काय लिहावं? प्रत्येकाने प्रत्यक्षच वाचायला आणि अनुभवायला हवा, हिरव्या हास्याचा कोलाज.
– समाप्त –
© सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 9403310170, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈