श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ ऑपरेशन रांदोरी बेहाक…. अर्थात थेट भेट गनिमांना ! ☆
जपानी युद्धसदृश खेळांमध्ये प्रतिस्पर्धी एकमेकांवर सर्व शक्तिनिशी चालून जातात… निकराचा हल्ला चढवतात…. आपल्या जीवाची पर्वा न करता… कारण शत्रूही तसाच चालून आलेला असतो… एखाद्या मस्तवाल रानडुकरासारखा. या युद्धप्रकाराला रांदोरी म्हणतात बहुदा.
एप्रिल, २०२० मधील ही घटना आहे. लोकांना आपल्या जीवाची भ्रांत असल्याने इतर ठिकाणी काय सुरू आहे, याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती!
कोरोनामुळे सर्व जगासारखाच हिंदुस्थानही थांबला होता. जीवघेण्या रोगाच्या भीतीने रस्ते ओस पडले होते…. पण सीमेवर गस्त सुरू होती. हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर तुफान बर्फवृष्टी होत होती. दोन्ही देशांच्या सीमांना एकमेकांपासून अलग करणारी काटेरी तारांची कुंपणेही बर्फात गाडली गेलेली होती. आसमंतात बर्फाच्या पांढऱ्या रंगाशिवाय दुसरे काहीही दिसत नव्हते. पण अत्याधुनिक यंत्रांना बरेच काही दिसत होते.
अत्यंत कमी दृश्यमानता असल्याचा आणि सीमेपलीकडून झालेल्या फायरींगचा आडोसा घेत पाच प्रशिक्षित पाकिस्तानी अतिरेकी भारतीय सीमा ओलांडून कश्मिरात दाखल झालेही होते… रक्तपात घडविण्यासाठी…
स्थळ कुपवाडा सेक्टर मधील केरन भाग. भारताच्या Unmanned Ariel Vehicle अर्थात छोट्या चालक विरहीत विमानांत बसवलेल्या कॅमेऱ्यांनी आणि इतर उपकरणांनी शत्रूच्या त्या पाच जणांच्या पावलांचे ठसे अचूक टिपले आणि नियंत्रण कक्षाला पाठविलेही होते… दिवस होता १ एप्रिल,२०२०.
अधिकाऱ्यांनी त्वरीत योजना आखली. आदेश दिले गेले आणि जवान त्या तसल्या भयावह हवामानात अतिरेक्यांच्या मागावर निघाले. बर्फवृष्टी, तुफान वारा आणि कमी प्रकाश याची तमा न बाळगता आपले वाघ पिसाळलेल्या लांडग्यांच्या मागावर निघाले. त्यादिवशी अतिरेकी टप्प्यात आले नाहीत. दोन आणि तीन एप्रिल या दोन्ही दिवशी ही शोधमोहिम सुरू राहिली. या दिवशी मात्र एकदा नव्हे तर दोन-तीन वेळा आपले जवान आणि अतिरेकी यांच्यात गोळीबाराच्या फैरी झडल्या…पण त्या अवलादी निसटून जाण्यात यशस्वी ठरल्या. पण पळून जाताना त्यांना त्यांच्याजवळची जड हत्यारे टाकून पळावे लागले होते.
रांदोरीचा आजचा पाचवा दिवस. लांडग्यांना सीमेपलीकडे पळूनही जाऊ द्यायचे नव्हते आणि आपल्या सीमेत घुसूही द्यायचे नव्हते…. त्यांना वर पाठवणे गरजेचे होते.
ते पाचही जण एक नाल्यात लपून बसले. आधुनिक दळणवळण साधने, खाण्या-पिण्याचे मसालेदार पदार्थ, मद्य, वेदनाशामक औषधे, दारूगोळा…. असा सगळा जामानिमा करून आली होती मंडळी.
त्यांचा ठावठिकाणा लक्षात आला. पण एकतर शेकडो मीटर्स उंचीवरची रणभूमी. गळ्याइतके बर्फ साठलेले. श्वास घेणे महाकठीण. आता रामबाण सोडायला पाहिजे असे लक्षात आले….
पॅरा एस.एफ. अर्थात स्पेशल फोर्स कमांडोज मैदानात उतरवण्याचे ठरले. भीती आणि अशक्य या शब्दांची साधी तोंडओळखही न झालेले नीडर, उच्च दर्जाचे आणि शारीरिक, मानसिक क्षमातांची अंतिम कसोटी पाहणारे प्रशिक्षण प्राप्त केलेले सहा-सहा कमांडोंचे दोन गट हेलिकॉप्टरमधून अतिरेक्यांच्या लपण्याच्या संभाव्य ठिकाणाच्या जवळ उतरवण्यात आले. शस्त्रसज्ज असलेले हे बहाद्दर जमिनीवर उतरले तेंव्हा त्यांच्या कमरेपेक्षा जास्त उंचीचा बर्फ तिथे साठलेला होता.. जणू ते एखाद्या सरोवरातच उतरलेले असावेत.
एका तुकडीचे नायक होते सुभेदार संजीव कुमार साहेब. सोबत पॅराट्रूपर बाल कृष्णन, पॅराट्रूपर छत्रपाल सिंग, पॅराट्रूपर अमित कुमार, हवलदार दवेंद्र सिंग आणि ….
दिवसभर माग काढला गेला…. रात्र पडली आणि उलटून जाण्याच्या बेतात होती.
पहाट झाली. रस्ता कसा होता? मूळात रस्ताच नव्हता. प्रचंड चढ-उतार, काही ठिकाणी गळ्याइतके बर्फ, तर काही ठिकाणी जीवघेणी खोली असलेल्या दऱ्या. एका दरीच्या किनाऱ्यावर जमा झालेले बर्फ घट्ट होऊन दरीच्या बाजूस साठून राहिलेलं. जमीन ते दरीची किनार यातील फरक लक्षात येणं अशक्य झालेलं. पण अतिरेक्यांच्या पावलांचे ठसे तर त्याच आसपास दिसले होते… ते तिथेच लपून बसलेले असावेत!
सुभेदार संजीवकुमार साहेब नेतृत्व करीत पुढे पावले टाकीत होते… सावधानतेने. त्यांच्या अर्धा पाऊल मागे बाल कृष्णन आणि छत्रपाल सिंग होते… त्यांचे एकत्रित वजन त्या बर्फाच्या तुकड्याला पेलवले नाही आणि ते तिघेही दीडशे फूट खाली कोसळले….. अत्यंत वेगाने. त्यांच्या शरीरातील अनेक हाडं तुटली…..
पण त्यांना आपल्या वेदनांचा विचार करायला सवडच मिळाली नाही! त्यांच्या समोर ते पाच अतिरेकी उभे होते… म्हणजे ते लपून बसलेले अतिरेकी ही तीन शरीरं आपल्या पुढ्यात अचानक कोसळलेली पाहून ताडकन उभे राहिले होते. यांच्या रायफल्स सज्ज होत्या… नेम धरण्याची गरज नव्हतीच. काही फुटांचंच तर अंतर होतं…. त्यांनी अंदाधुंद फायरींग सुरू केलं. या तिन्ही जखमी वाघांनी डरकाळी फोडत प्रत्युत्तर दिलेच….
गोळीबाराचा आवाज ऐकून वर असलेल्या वीरांनी आपल्या सहकाऱ्यांच्या रक्षणार्थ त्या तेवढ्या उंचीवरून बेधडक खाली उड्या घेतल्या…. त्यात पॅराट्रूपर सोनम शेरींग तमंग सुद्धा होते.
सुभेदार संजीवकुमार साहेब आणि अमितकुमार समोरच्या लांडग्यांवर तुटून पडले होते… जखमी हातांनी मारामारी सुरू केली…. त्यांच्या शरीरात तोवर पंधरा गोळ्यांनी प्रवेश केला होता. इतर दोघांची गतही काही वेगळी नव्हती…
तमंग यांनी एका अतिरेक्याला अगदी जवळून टिपले. एकावर हातगोळा टाकला. अमित कुमार जागीच हुतात्मा झाले होते. संजीवकुमार साहेब गंभीर जखमी होतेच. तमंग यांनी त्यांना मागे खेचलेही होते…. पण उशीर झाला होता. पण या पाचही वाघांनी स्वर्गाकडे प्रयाण करताना त्या पाच जनावरांना नरकात नेऊन फेकण्यासाठी स्वत:च्या दातांत घट्ट धरले होते…!
एक अतिरेकी तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला… पण आपल्या इतर जवानांच्या गोळ्या तो चुकवू शकला नाही.
आपल्या सहकाऱ्यांचा पराक्रम सांगण्यासाठी दैवाने पॅराट्रूपर सोनम शेरींग यांना सुखरूप ठेवले होते जणू! पण देशाने पाच वाघ गमावले होते. देशाने या पाचही योद्ध्यांचा मरणोत्तर यथोचित गौरव केला.
सोनम शेरींग यांना मा. राष्ट्रपती मा. श्री.रामनाथजी कोविंद साहेबांच्या हस्ते शौर्य चक्र स्विकारताना आपल्या हुतात्मा सहकाऱ्यांच्या आठवणींनी गहिवरून आले होते!
५ एप्रिल, २०२३ रोजी या बलिदानाला तीन वर्षे झाली! भारतमातेच्या पांढऱ्या शुभ्र हिमभूमीवर आपल्या लालभडक रक्ताचे शिंपण करणाऱ्या या वीरांचे स्मरण होणं साहजिकच आहे, नाही का?
सामान्य लोकांना या असामान्य बलिदानाची पुन्हा माहिती व्हावी म्हणून हे सामान्य लेखन. प्रतिक्रिया देताना या हुतात्म्यांचं एकदा स्मरण आणि त्यांच्या आत्म्यांच्या कल्याणासाठी आराध्य देवतांकडे प्रार्थना तुम्ही करालच, याची खात्री आहे.
🇮🇳 जय हिंद. जय हिंद की सेना. 🇮🇳
सोबत दिलेले छायाचित्र शेरींग साहेबांचे आहे. पुरस्काराचे वेळी घडलेल्या प्रसंगाचे थोडक्यात वर्णन केले जाते. ते ऐकत असतानाची त्यांची ही भावमुद्रा आहे !
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈