श्री मोहन निमोणकर
इंद्रधनुष्य
☆ “एक अद्भुत अनुभव – नामस्मरणाच्या शक्तीचा…” – लेखक : डॉ. डी. जी. लवेकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
— अनेस्थेशियाशिवाय शस्त्रक्रिया
“We dare.. we care“
हे वाक्य खरेतर सर्व डॉक्टरांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. आम्ही सर्वजण रुग्णाचा जीव वाचवण्यासाठीच नेहमी प्रयत्न करीत असतो. परंतु पेशंटच्या आग्रहाखातर काही वेळेस आम्हाला अधिकच धैर्य दाखवून उपचार करावे लागतात. असाच एक मला आलेला अनुभव येथे आपणास कथन करीत आहे.
सुमारे वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल आमच्या गुरुदेव रानडे संप्रदायातील एक निष्ठेने नामसाधना करणारे ज्येष्ठ व श्रेष्ठ साधक श्री दादा तेंडुलकर मानेवर एक मोठे काळं पुडीबेंड (Carbuncle with Abscess) झाल्यामुळे सुश्रुत हॉस्पिटल चिंचवड येथे डॉक्टर कानिटकरांकडे ऍडमिट होते. डॉक्टर कानिटकर यांनी त्यांच्या सर्व तपासण्या करून मला सर्जन म्हणून त्यांचे ऑपरेशन करण्यासाठी बोलावले होते. मी त्यांना तपासले व बेंण्ड अर्थातच खूप मोठे असल्यामुळे त्यांना शस्त्रक्रियाही पूर्ण भूल ((General Anaesthesia) देऊन करावी लागेल असे सांगितले. मानेचा बराच भाग खराब झाल्याने व त्यामध्ये पू (pus) झाल्याने लोकल अनेस्थेशिया देणे सुद्धा शक्य नव्हते. 80 वर्ष वय,आटोक्यात नसलेला मधुमेह, ब्लड प्रेशर,वगैरे सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास भूलेमध्ये व शस्त्रक्रियेत असलेला सर्व धोका त्यांना व नातेवाइकांना समजावला. जखम भरण्यास वेळ लागेल हे देखील सांगितले होते.
“डॉक्टर तुम्ही माझे ऑपरेशन भूलेशिवाय निर्धास्तपणे करावं .. मला काही होणार नाही, मी मान देखील हलवणार नाही. मला भूलही नको आणि वेदनाशामक इंजेक्शनही नको. ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी मात्र तुम्ही मला ‘ आता मी सुरु करणार आहे ‘ असे सांगा. मग मी अगदी स्तब्ध राहीन आणि माझे नामस्मरण चालू ठेवीन “ असे त्यांनी आम्हाला निक्षून सांगितले.
डॉक्टर अस्तिक कानिटकर यांसारख्या अत्यंत अनुभवी भूलतज्ञ डॉक्टरांकडूनही भूल घेण्यास ते अजिबात तयार नव्हते अथवा कोणतेही इंजेक्शन घेण्यास तयार नव्हते. बेंड खूप मोठे होते व त्यांना दुखल्यास आणि त्यांनी मान हलवल्यास जवळपासच्या मानेच्या महत्वाच्या नसा, रक्तवाहिन्यांना इजा होण्याचा धोका होता. कितीही समजावून सांगितले तरी दादा अनेस्थेशियासाठी तयार होईनात. तेव्हा सर्व धोका पत्करून High risk consent घेऊन इमर्जन्सी सर्व इंजेक्शन वगैरे तयार ठेवून त्यांना ऑपरेशनसाठी टेबलवर घेतले. एका कुशीवर त्यांना झोपवले. पेंटिंग, ड्रेपिंग, वगैरे सर्व तयारी करून ‘ दादा मी आता ऑपरेशन सुरू करतो ‘असे सांगितले.
“ ठीक आहे. तुम्ही सर्व ऑपरेशन निर्धास्तपणे व्यवस्थित करा व संपले की मला सांगा. तोपर्यंत मी मान हालवणार नाही “ असे म्हणून त्यानी डोळे मिटून त्यांचे नामसाधन शांतपणे चालू ठेवले. त्यांचे बेंड कापून त्यातील सर्व पू व खराब भाग काढून टाकून नंतर औषधांची पट्टी भरेपर्यंत जवळपास अर्ध्या तासाने आता त्यांना ऑपरेशन संपले आहे असे सांगितले. संपूर्ण ऑपरेशन संपेपर्यंत डॉक्टर कानेटकर मॉनिटरवर त्यांचे parameters पहात होते, एकदाही त्यामध्ये कोणताही बदल झाला नाही. तसेच पेशंटला कोणतेही वेदनाशामक अथवा भुलीचे इंजेक्शन द्यावे लागले नाही.
“ संपले का ऑपरेशन ? हरकत नाही “ असे सांगताना त्यांच्या डोळ्यात ना अश्रू होते ना चेहऱ्यावर दुःखी भाव होते. ते सर्व पाहून आम्ही दोघेही नतमस्तक झालो. नंतरच्या ड्रेसिंगच्या वेळेस देखील त्यांनी कधीही हू का चू केली नाही.
सद्गुरूंकडून मिळालेल्या सबीज नामाचे अत्यंत निष्ठेने, चिकाटीने, सातत्याने अंतकरणापासून साधन केल्यास गुरुकृपेने विज्ञानाला देखील अगम्य असलेल्या सुप्त शक्ती साधकाला प्राप्त होतात व ईश्वर साक्षात्कारही होतो असे श्री गुरुदेवांनी व आपल्या संतांनी अनुभवातून सांगितलेल्या गोष्टींची अशी त्यांच्या शिष्यांकडून प्रचिती मिळते तेव्हा आपली श्रद्धा नक्कीच द्विगुणित होते. संत रामदासांनी दासबोधात नामस्मरण भक्ती समासात म्हटलेच आहे —
नामे विघ्ने निवारती , नामे संकटे नासती,
नामे होय उत्तम गती अंतकाळी.
……I feel that we doctors should accept —–
— We dare..We care & HE (God) CURES..
लेखक : डॉक्टर संजीव दात्ये
जनरल सर्जन, चिंचवड.
लेखक : डॉ. डी. जी. लवेकर
संग्राहक : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈