श्री मोहन निमोणकर
इंद्रधनुष्य
☆ “आज आमचा नंबर आहे … पण उद्या ?” – लेखक : डॉ. प्रकाश कोयाडे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
गेल्या दोन दिवसांपासून आमचं कुटुंब एका विचित्र परिस्थितीमधून जात आहे. हे फार गंभीर आहे आणि तुमच्या सोबत हे घडू नये म्हणून हे इथं मांडतोय… २९ तारखेला दुपारी ३.२० वाजता माझ्या बायकोच्या व्हाट्सअपवर एक मेसेज आला !
मी ड्युटीवर होतो म्हणून डिटेल्स काही न सांगता ती एवढंच म्हणाली की, ‘ लवकर घरी या फार महत्त्वाचं बोलायचं आहे.’ चार वाजता घरी आलो तर तिने रडायला सुरुवात केली. आधी तिला समजावून सांगितले, शांत केलं आणि काय झालं आहे याबद्दल स्पष्ट विचारलं तेव्हा जे समजलं ते मलाही शॉकिंग होतं. कुठल्यातरी अनोळखी नंबर वरून तिला पैशाच्या मागणीसाठी मेसेज आला होता, ज्यामध्ये —
‘तुमचा आठशे रुपयांचा EMI बाकी आहे आणि तो भरा अन्यथा तुमचा फोटो व्हायरल करु’ अशी धमकी होती.
आधी बायकोला पैसे मागितले तेव्हा त्यात काही वाटलं नाही पण समोरच्या व्यक्तीने एक मॉर्फ केलेला फोटो पाठवला. तेव्हा मात्र तिने एका सेकंदात तो फोटो डिलीट केला आणि तो नंबर ब्लॉक करून डिलीट केला.
पॅनिक न होता हे प्रकरण हाताळणं आवश्यक होतं, तिला धीर देणं त्याक्षणी सर्वात महत्वाची गोष्ट होती. समाधानाची गोष्ट हीच होती की, घाबरून जाऊन बायकोने समोरच्या व्यक्तीला पैसे पाठवले नव्हते!
आम्ही सायबर क्राईम ऑफिसला जाऊन कंप्लेंट केली. तसेच एक कंप्लेंट जवळच्या पोलिस स्टेशनलाही केली. तसं पाहिलं तर पोलिसांसोबत संपर्क रोजचाच पण आजचं कारण वेगळं होतं. त्यांनी फार शांतपणे सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या आणि समजावून सांगितल्या. काहीही झालं तरी पॅनिक व्हायचं नाही आणि कोणालाही पैसे पाठवायचे नाहीत हे सांगितले… अर्थात आम्ही तेवढे स्ट्रॉंग होतोच!
काल दुपारी आणखी एका नंबरवरून साडेतीन हजार रुपयांची मागणी केली. तसेच ‘तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील प्रत्येकाला फोन/मेसेज करून पैसे मागू’ अशी धमकी दिली. तो नंबर आणि डिटेल्सही पोलिसांना पाठवले. आणखी आठ दहा दिवस हे होतच राहणार आहे. बायकोने याबद्दल व्हाट्सअपवर स्टेटस ठेवलं आणि संपर्कातील जवळपास सर्वांना स्वतः सांगितलं जेणेकरून त्यांनाही याबाबत कळावं, त्यांना काही अडचण येऊ नये.
तिने कोणतंही लोन ऍप्लिकेशन डाऊनलोड केलेलं नव्हतं. एक गोष्ट मात्र नक्की की, मोबाईल वापरतेवेळी तिच्याकडून कुठेतरी चूक झाली होती, एखाद्या अनोळखी लिंकवर क्लिक झालेलं असणार आहे.
आम्हाला हेही माहीत नाही की, समोरील व्यक्ती पुरुष आहे की स्त्री! बिहार, झारखंड या भागातील लोक असावेत. पोलिसांनी सांगितलं की दिवसाला किमान चार ते पाच केस आपल्याकडं अशा दाखल होत आहेत. सध्या याचं खूप प्रमाण वाढत आहे.
या प्रकरातून एक गोष्ट तर समजली आहे की, ते लोक माईंड गेम खेळत असतात. आपलं घाबरून जाणं हे त्यांचं भांडवल असतं. आपला मेंदू या गोष्टींसाठी तयार नसतो, बदनामीची भीती असते. हे लोक याच गोष्टींचा फायदा घेतात. जे लोक कोणाला याबाबत बोलत नाहीत, गोष्ट लपवून ठेवतात ते आणखी अडकत जातात. एका पोलिस मित्राच्या म्हणण्यानुसार काही प्रकरणं आत्महत्येपर्यंत सुद्धा पोहोचली आहेत.
व्हाट्सअपवर स्टेटस ठेवलेलं बघून माझ्याच ओळखीच्या दोघांनी त्यांच्याबद्दल घडलेले असेच किस्से सांगितले. त्यापैकी एका मुलीने एका मेसेज मुळे घाबरून जाऊन पंचवीस हजार रुपये समोरच्याला दिले होते.
हे सर्व इथं का लिहितोय तर त्याला दोन कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आमचा संदर्भ देऊन कोणी पैसे मागत असेल, धमकी देत असेल तर कोणी लक्ष देऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कोणासोबत असं घडू नये आणि समजा घडलंच तर त्या जाळ्यात अडकू नये!
‘जमतारा’ ही वेब सीरीज ज्यांनी पाहिली असेल त्यांना माहीत असेलच हे सर्व. सीरीजच्या नावातच त्यांनी लिहिलं आहे… सबका नंबर आयेगा ! आपल्या मोबाईलमधली माहिती सुरक्षित नाही. कोणतंही ऍप्लिकेशन घेताना, काहीच न वाचता आपण ‘I Agree’ करतो. कोणत्याही लिंक नकळत उघडतो आणि हे चक्र सुरू होतं.
आज आमचा नंबर आहे उद्या कोणाचाही असू शकतो… so be careful!
लेखक : डॉ.प्रकाश कोयाडे
संग्राहक : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈