सुश्री सुनीला वैशंपायन
इंद्रधनुष्य
☆ फलटणमधील ‘सीतामातेचा डोंगर’… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆
– श्री क्षेत्र सोमनथळी
फलटणमधील ‘सीतामातेचा डोंगर’…
चला आपल्या फलटणबद्दल थोडेसे जाणून घेऊयात
राम रावणाच्या युद्धानंतर जेव्हा राम अयोध्येला परत आले तेव्हा लोकांनी सीतेबद्दल शंका घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे नाईलाजाने रामाला सीतेचा त्याग करावा लागला. त्याने लक्ष्मणाला आज्ञा केली की सीतेला दूर कुठेतरी नेउन सोड. लक्ष्मण सीतेला घेऊन अयोध्येपासून खूप दूर आला. त्याने सीतेला एका ठिकाणी सोडलं आणि तो अयोध्येला निघून गेला…
लक्ष्मणाने सीतेला ज्या ठिकाणी सोडलं होतं ते ठिकाण आपल्या फलटणच्या शेजारी आजही ‘ सीतामातेचा डोंगर ‘ या नावाने प्रसिद्ध आहे. आजही हजारो स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी या ठिकाणी सीतामातेला वाणवसा घ्यायला जातात…
याच आपल्या पावन भूमीत लव-कुश यांचा जन्म झाला. रामाने ज्यावेळी अश्वमेध यज्ञ केला त्यावेळी या यज्ञाप्रसंगी जो घोडा सोडलेला होता तो लव-कुशने पकडला… त्यानंतर लव-कुश यांच्याबरोबर लक्ष्मण, शत्रुघ्न, भारत, सुग्रीव यांनी युद्ध केलं.. मारुतीही या युद्धाच्यावेळी उपस्थित होते. मात्र त्यांना समजलं की ही दोन्ही मुले रामाचीच आहेत. त्यामुळे त्यांनी युद्धात सहभाग घेतला नाही. लव-कुशने हनुमंताला एका अस्त्राने एका लिंबाच्या झाडाला बांधून टाकलं …
हे युद्ध ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणाचा उल्लेख रामायणमध्ये ” फलपठठनपूर ” असा केलेला आहे. ज्याचा अपभ्रंश होऊन आज ते ठिकाण फलटण या नावाने ओळखल जातं …
रामायणामध्ये असा उल्लेख आहे कि लव-कुशने हनुमंताला ‘सम्स्थलि’ बांधलेले…
‘सम्स्थळ’ म्हणजे समान जागा, जिथे चढ-उतार जास्त नाहीत अशी…
त्या ‘समस्थळचा’ अपभ्रंश होऊन आज ते ठिकाण ‘सोमन्थलि’ या नावाने प्रसिद्ध आहे.
खूप वर्षांपूर्वी या ठिकाणी एका स्त्रीला एका लिंबाच्या झाडाखाली पडलेल्या गाईच्या गोवरीमध्ये हनुमानाचे दर्शन झाले… ती बेशुद्ध होऊन पडली… काही लोक तिला पाहायला गेले तर त्यांनाही हनुमंताचे दर्शन मिळाले. ही वार्ता गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली… त्या काळच्या एका प्रसिद्ध ब्राह्मणाकडून याबद्दलची माहिती काढण्यात आली. त्यावेळी हे तेच ठिकाण निघालं जेथे हनुमानाला बांधलेलं होत…मग लोकांनी भक्तिभावाने या ठिकाणी हनुमानाचे मंदिर बांधले. या मंदिराच्या पाठीमागे एक लिंबाचे झाड आहे. असे म्हणतात की हे लिंबाचे झाड मोठे होऊन जेव्हा मरून जातं तेव्हा त्याच ठिकाणी नवीन झाड उगवते. मारुतीचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालताना पाठीमागच्या या झाडाला मिठी मारून दर्शन घेण्याची पद्धत आहे. नवसाला पावणारा हा मारुती दक्षिणमुखी आहे….चैत्र शुद्ध पौर्णिमेला सोमंथळी मध्ये मोठी यात्रा भरते… मित्रानो समर्थ रामदासांनी ११ मारुतींची स्थापना केली हे सर्वाना माहित आहे… मात्र हा मारुती स्वयंभू आहे. याची स्थापना केली गेली नाही… सोमंथळी मध्ये तो स्वतः: प्रगट झाला आहे…
” श्री स्वयंभू दक्षिणमुखी मारुती मंदिर, श्री क्षेत्र सोमंथळी ” या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू याचबरोबर इतरही अनेक राज्यातून लोक येथे दर्शनाला येतात…
मात्र याच मातीतल्या बऱ्याच लोकांना या ठिकाणाची माहिती नाही… कारण आपण रामायणाची पारायणे करतो .. मात्र मनापासून कधी वाचत नाही.
एव्हढा पौराणिक आणि सांस्कृतिक वारसा असणाऱ्या ठिकाणी आपण वावरतोय याचा थोडा तरी अभिमान असू द्या…
|| जय श्री राम ||
|| जय हनुमान ||
माहिती प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈