इंद्रधनुष्य
☆ सातारचे ‘कंदी’ पेढे – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का – सातारच्या पेढ्यांना “कंदी पेढे” असंच का म्हणतात?
गोष्ट आहे दीडशे वर्षापूर्वीची.
भारतात ब्रिटिश राजवट होती. साताऱ्यात छत्रपतींच्या संस्थानावर देखील ब्रिटिश रिजंट बसविण्यात आले होते. हे अधिकारी इंग्लंडवरून आलेले होते. त्यांना गोड खाण्याची सवय होती. मग ते कायम वेगवगेळ्या मिठाईच्या शोधात असायचे.
सातारा जिल्ह्यातील जो पाटणकडचा डोंगराळ भाग आहे तिथे त्या काळात शेतीचं प्रमाण कमी होतं. लोकांच उपजीविकेचं साधन मुख्यसाधन हे पशुधन होतं. तिथल्या गायी, म्हैशीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या रानावनात वाढलेल्या होत्या. विकतचा चारा हा प्रकार तिथे नव्हता. यामुळे त्यांचं दुध घट्ट आणि अस्सल असायचं. शिवाय ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं. हे दुध जवळचं मोठं शहर म्हणून सातारला पाठवून दिलं जायचं. काहींनी या दुधाला कढईत उकळून त्यात साखर किंवा गुळ टाकली. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे बनवले. ते एका करंडीमध्ये भरून ब्रिटीश अधिकाऱ्यांना पेश केले. ब्रिटिशांना ही मिठाई प्रचंड आवडली. त्यांना “करंडी” म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी त्याला “कँडी” म्हणायला सुरुवात केली. पुढे याच कँडीचं सातारकरांनी “कंदी” केलं.
साधारण याच काळात छत्रपतींच्या नवव्या वंशजानी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील खडकलाट या गावातून काही मिठाई बनवणाऱ्या कुटुंबाना साताऱ्यात आणून वसविलं होतं. त्यांनी बनविलेले कंदी पेढे लोकप्रिय होत गेले. पुढे त्यांनाच “लाटकर” असे ओळखलं जाऊ लागलं.
कंदी पेढ्याला युरोप मध्ये नेलं ते मात्र तुळजाराम मोदी या हलवायांनी.
त्यांनी सत्तर वर्षापूर्वी विमानात, लंडनमधील सुप्रसिद्ध ठिकाणी या कंदी पेढ्यांच्या जाहिराती लावल्या. त्यामुळेच हा पेढा कानाकोपऱ्यात पोहोचला.
आजही एवढ्या वर्षांनी एवढी तंत्रज्ञानात सुधारणा होऊन देखील मोदी आणि लाटकर हलवाई मात्र कंदी पेढ्याचा खवा आजही कढईतच भाजतात व प्रत्येक पेढा हातावरच वळला जातो. खव्याची भाजणी विशिष्ट प्रकारे केल्यामुळे पेढ्याची पौष्टिकता, चव व टिकाऊ पणा वाढतो. म्हणूनच गेली १०० वर्ष सातारच्या कंदी पेढ्यांची चव आणि गुणवत्ता तशीच टिकून आहे.
भारतात अनेक ठिकाणचे पेढे प्रसिद्ध आहेत. पेढ्याची जन्मभूमीच मथुरा ही आहे. उत्तरेतून ठाकूर राम रतन सिंह यांनी हे पेढे दक्षिणेत धारवाड येथे आणले. त्यांना धारवाडी पेढे म्हणून ओळखलं जातं.
महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणचे पेढे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यात कोल्हापूरचे फिक्के पेढे, कुंतलगिरीचे पेढे, वाडीचे पेढे व इतर खूप काही. मात्र इतर पेढ्यांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात. कमी साखर हे या पेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिणामी हा पेढा सहा ते आठ दिवस सहज टिकतो.
सातारच्या कंदी पेढ्याची सिक्रेट रेसिपी म्हणजे हे पेढे डबल म्हणजे खरपूस भाजलेले, आणि तुपात परतलेले आहेत. हे पेढे सह्याद्रीतल्या रानातला चारा खाणाऱ्या गाई म्हशीपासून बनलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या पेढ्यांमध्ये सातारच्या माणसांचा “स्वॅग” मिक्स झालाय.
या सगळ्यामुळे सातारच्या पेढ्याचा ब्रँड जगात प्रसिद्ध झाला.
माहिती प्रस्तुती : अनंत केळकर
लेखक : अज्ञात
संग्राहक : अनंत केळकर