सौ अंजली दिलीप गोखले
इंद्रधनुष्य
☆ दुःखद सुख… लेखक – श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
तंत्रज्ञान, बदलत्या प्रथा यामुळे बरच बदलून जातं आणि अनेक गोष्टी, धंदे, माणसं हरवून जातात कालौघात. परवा काही कारणाने आळंदीला गेलो होतो तेंव्हा तिथे वासुदेव दिसला घाटावर. तसंही शहरात तो पूर्वी फार दिसायचा असं नाही पण धूमकेतूसारखा अधून मधून दिसायचा. पोलिसाचा किंवा इतर कुठला वेष घेऊन येणारे बहुरूपी तर आता दुर्मिळ झाले. सगळं खोटं आहे हे माहीत असलं तरी त्यांच्या मागून हिंडायला मजा यायची. वासुदेवाच्या टोपीत ती धूळ खालेल्ली मोरपिसं तो बदलतो कधी की तो मुगुट तो तसाच धुतो असा मला प्रश्न पडायचा. श्रावणात ‘आsssघाडा, दुर्वा, फुलं’ अशी हाक भल्या पहाटे यायची. ‘सुया घ्ये, पोत घ्ये, मनी घ्ये, फनी घ्ये’ अशी -हिदम असलेली हाळी तर किती वर्षात ऐकलेली नाही. आपल्या अंगणात फतकल मारून बसून गोधडी शिवून देणा-या बायका गायब झाल्या.
अप्पा बळवंतला एका लाकडी फळीवर रेमिंग्टन, गोदरेजचे टाईपरायटर ठेवून वन प्लस फोर अशा कॉप्या काढणारे कधीच अस्तंगत झाले. त्यांची कडकट्ट चालणारी बोटं आणि कागद वर सरकवून परत पहिल्या जागी मशीन घेऊन यायचा स्पीड मी बघत बसायचो. स्टुलावर बसून मान पाठ एक करून कडेच्या कागदात डोकावत किंवा आधी मॅटर काय ते समजून घेऊन टाईप करून द्यायचे ते. कुठे गेले असतील, काय काम केलं असेल नंतर त्यांनी. लहानपणी मला कंडक्टर झालो तर खूप पैसे मिळतील असं वाटायचं. असतात एकेकाच्या विक्षिप्त कल्पना, मला कुठलाही धंदा बघितला लहानपणी की वाटायचं, हे काम जमेल का आपल्याला, यात साधारण श्रीमंत होण्याएवढे पैसे मिळत असतील का? जाकीट घालून रस्त्यात मिळेल त्या जागी बसून आपल्या कळकट्ट भांड्यांना ब्युटी पार्लरमधे नेऊन आणल्यासारखे कल्हई करणारे कल्हईवाले गायब झाले. लहानपणी चाळीत तो फकीर यायचा रात्री, हातातल्या धुपाटण्यावर ती उद आणि धुपाची पावडर फिसकारली त्याने की जो पांढरा धूर आणि वास येतो तो अजून विसरलेलो नाही.
रात्री दहाच्या सुमारास एकजण पान विकायला यायचा. मस्स्स्साला पान दहा पैसे, स्पेशल मस्स्साला पंधरा पैसे. जेमतेम अर्ध पान, चुना, काताचा, सुपारीचा तुकडा, बडीशेप, स्पेशल मधे गुलकंद अत्तर लावल्यासारखं असायचा. एकजण तळलेले पापड विकायचा. सणसणीत मोठे पापड असायचे, दहा पैशाला एक, पाच पैसे दिले तर अर्धा पापड. चोपटण्याने अंगण करण्यात मजा होती. एसटी स्टँडवर तांब्याची कानकोरणी घेऊन फिरणारे दिसत नाहीत आता. काय तन्मयतेने ते काम करायचे. भुयारातून काहीतरी नक्की निघणार अशा आशेवर असलेल्या इतिहास संशोधकासारखे ते कानात डोकवायचे. रस्त्यात कुठल्या तरी झाडाखाली मोठी पेटी घेऊन सायकल दुरूस्तीवाले बसायचे. दोन्ही बाजूला एकेक दगड ठेऊन तो हवा भरायचा पंप उभा ठेवलेला असायचा. एकेकाळी पीसीओच्या त्या चौकोनी ठोकळ्याबाहेर लोक रांग लावून उभी रहायचे. आतल्याचं बोलणं लवकर संपावं आणि माझ्यानंतर बाहेर कुणाचाही नंबर असू नये हे प्रत्येकाला वाटायचं.
शाळेच्या बाहेर एक म्हातारी बसायची वाटे लावून, चिंचा, चन्यामन्या, बोरं, काळी मैना, भाजके चिंचोके, पेरू, बाहुलीच्या गोळ्या असायच्या. एक काला खट्टा, रिमझिम, ऑरेंज, लेमन, वाळा अशी सरबताची गाडी असायची. बर्फाचे गोळे विकणारे क्वचित दिसतात अजून. छत्री दुरुस्त करणारे कुठे गेले काय माहीत. एखादी टेकस मारली चपलेला तर पैसे न घेणारे पूर्ण पिकलेले चप्पल दुरुस्तीवाले आजोबा तर कधीच गेले. चार आणे तास मिळणारी सायकलची दुकानं गायब झाली. आपल्याला नको असलेले कपडे घेऊन चकचकीत भांडी देणा-या बार्टर सिस्टीम फॉलो करणा-या बोहारणी कुठे गेल्या असतील? सीताहरणाला कारण ठरलं म्हणून अंगात चोळी न घालता आपल्या पाटा, वरवंटा, जात्याला टाकी लावून द्यायच्या त्या वडारणी दिसणं शक्य नाही. कडेवर एक पोर आणि डोक्यावर विक्रीसाठी पाटा वरवंटा असायचा. त्या वरुटा म्हणायच्या त्याची मजा वाटायची. काही शब्द पण गायब झाले याची खंत वाटते. मायंदाळ, वळचण, हाळी, बैजवार, औंदा, बक्कळ असे अनेक शब्द असतील. मूळ विषय तो नाही, त्यावर परत कधी.
‘बाई, तुझं मन चांगलं आहे, तू देवभोळी आहेस, मनात पाप नाही, दानी आहेस पण तुला यश नाही’ अशी पाठ केलेली कॅसेट लावणारे कुडमुडे ज्योतिषी कंटाळवाणी दुपार हसरी करायचे. चाळीत तुम्हांला सांगतो, वल्ली असायच्या एकेक. एका ज्योतिषाला ‘लग्न कधी होईल सांगा’ म्हणत दोघींनी हात दाखवला, त्याने पण सहा महिन्याच्या आत पांढ-या घोड्यावर बसून राजकुमार येईल एवढं सोडून सगळा सोनसळी भविष्यकाळ रंगवला. घसघशीत दक्षिणा मिळणार म्हणजे अजून घरं फिरायची गरज नाही हे त्याच्या चेह-यावर दिसत होतं. ‘तुझा मुडदा बशीवला भाड्या’ म्हणत त्यांनी आजूबाजूला खेळणारी आपापली पोरं दाखवली आणि त्याला हुसकवून लावलं. दक्षिणा बुडली त्यापेक्षा आपलं ढोंग उघडकीला आलं याचा राग त्याने मार बसणार नाही इतपत शिव्या देऊन काढता पाय घेतला. बाबाजी का बायोस्कोप मधे ‘मेरा नाम जोकर’मधे दिसला तेंव्हा आठवला. क्षणिक खेळ असायचा पण डोळ्यांभोवती दोन्ही हात धरून त्या नळकांड्यात डोकावण्यात अप्रूप होतं.
फक्त दिवाळीला पोस्त मागणारे गुरखे नाहीसे झाले. रात्री फिरताना क्वचित दिसायचे. क्वचित येणारं कार्ड देणारे आमचे पोस्टमन इंदोंस अशी हाक मारायचे. आमचा पत्त्यातला चाळ नंबर कितीही चुकीचा टाकलात तरी पत्र यायचंच आमच्याकडे. त्यांनी कधीही आमच्याकडे पोस्त मागितली नव्हती. सायकलच्या मधल्या दांड्याला ग्राईंडिंग व्हील लावून मागच्या कॅरिअरवर बसून पेडल मारत चाकू, सुरे, कात्र्यांना धार लावणारे गायब झाले. आता भंगार कच-यात टाकतो पण आधी भंगारवाले यायचे, द्याल ते घायचे. प्लास्टिक बाटल्या, बरण्या, पत्र्याचे डबे, ते देतील ती किंमत. स्टोव्ह रिपेअरवाले एक वेगळीच गंमत असायची. दुरुस्तीत फार रॉकेल संपू नये ही काळजी असायची बाईला आणि हा बाब्या फारफार पंप मारून बर्नर तापवून लालबुंद करायचा. आतली काजळी काढून बर्नर फिट करून हवा भरून पिन मारली की बोर्नव्हिटा प्यायल्यासारखा स्टोव्ह झळाळता पेटायचा पण त्याचा आनंद अल्पकाळ साजरा व्हायचा आणि महिनाभर रॉकेल पुरवायला हवं या काळजीने ती बाई किल्ली सोडून पहिल्यांदा स्टोव्ह बंद करायची.
या सगळ्यात रात्री दारोदार फिरून ‘अन्न वाढा हो माय’ म्हणणारे भिकारी नाहीसे झाले याचा मला आनंद आहे खूप. सगळे काही उपाशी मेले नसतील, जगण्यासाठी, पोटाची आग भागवण्यासाठी त्यांनी काहीतरी तजवीज केली असेलच. पण ती हाक बंद झाली ते बरं झालं. आम्ही चाळीत रहायचो तिथे रात्री साधारण नऊनंतर एक बाई यायची. तुम्ही द्याल ते ती घ्यायची. ती कुणाच्या दरवाज्यासमोर उभी रहायची नाही, सर्वसमावेशक अशी ती हाळी द्यायची, मग ज्याच्याकडे उरलं असेल तो तिला हाक मारून ते द्यायचा. पोळी, भाकरी, भातासाठी एकच पिशवी असायची. भाजी, आमटी जे काही असेल ते सगळं ती एकाच वाडग्यात घ्यायची. संतमहात्म्यांचे किस्से आपण ऐकतो की ते सगळं अन्न एकत्र करून खायचे पण इथे चव काय आहे यापेक्षा भुकेची आग मोठी होती. कालौघात काही गोष्टी नष्ट होतात ते बरच आहे. चांगल्या गोष्टी नाहीशा होतात या दुःखापेक्षा वाईट गोष्टी संपतात त्याचा आनंद जास्त असतो.
ही किंवा आत्ता लगेच न आठवलेली माणसं हरवली म्हणून अडून काहीच राहिलं नाही पण गतायुष्याचा ती एक भाग होती. मागे वळून पहाताना काही नेमकं आठवतं तसंच भारंभार संदर्भ नसलेलं ही आठवत राहतं. त्या प्रत्येक गोष्टीशी काही ना काही तरी चांगली वाईट आठवण जोडलेली असते. माणसाला अमरत्व नाही हे वरदान आहे. किती गर्दी झाली असती नाहीतर. आयुष्याच्या प्रवासात अशा अनेक गोष्टी हरवतात. माणसं हरवतात ते वाईट.
प्रत्येकजण या प्रवासात उतरून जाणार मधेच कधीतरी हे माहित असतं, काहीजण काही न सांगता घाईने उतरून जातात, काही लपून बसतात, काही दिसतात पण आपण त्यांना हाक मारू शकत नाही. न सांगता उतरून गेलेल्या, सोडून गेलेल्या, दुरावलेल्या, हरवलेल्या माणसांच्या आठवणींनी मन सैरभैर होतं. डोळ्यात नकळत पाणी दाटतं. अशावेळी काय करायचं? प्रवासात करतो तेच करायचं. खिडकीतून बाहेर बघायचं, हलकेच डोळे पुसायचे आणि दिसतंय त्यात हरवून जायचं. आपणही कुणाच्या तरी विश्वात त्यांच्या दृष्टीने हरवलेले असू शकतो या वाटण्यात पण एक दुःखद सुख आहे.
आपल्यासारखंच कुणाच्या डोळ्यात पाणी असतंच की, माणसं काही फक्त आपलीच हरवत नाहीत.
लेखक – श्री जयंत विद्वांस
संग्रहिका : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈