श्री सुनील देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ एआय – मदतनीस की स्पर्धक… भाग – 2 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
(आर्थिक व्यवहार प्रचंड वाढले. या वाढीव आर्थिक व्यवहारांना सहजपणे तोंड देईल अशी बँकिंग प्रणाली विकसित झाली.) – इथून पुढे
पूर्वी प्रत्येक व्यवहार बँकेत जाऊन करावा लागे तिथे आता तसे करण्याची गरज उरली नाही. बँकेत कॉम्पुटर आले तशी जॉब जातील अशी ओरड करणाऱ्या युनियन्सचे देखील या ऑटोमेशनच्या रेट्यापुढे काहीही चालले नाही. देशाचे बजेट काही हजार कोटींचे असे ते काही लाखो कोटींचे झाले. ग्राहकाला बँकेत जाण्याची गरज नसल्याने ब्रांच मधील स्टाफ कमी झाला असला तरी बँकांची आणि ब्रांचेसची संख्या वाढल्याने बँक क्षेत्रात बेकारी वाढली नाही. पैसा खेळू लागला त्यामुळे बँकेचा स्टाफ जो कांऊटर बसून व्यवहार करत होता तो कार लोन, होम लोन,बिझनेस लोन देण्यसाठी मार्केटिंग करत फिरू लागला. ऑटोमेशनमुळे बँकेत जाऊन व्यवहार करण्याची गरज संपली तशी कॅश व्यवहार करण्याची गरज देखील संपली. अगदी १० रुपयांची वस्तू घेण्यास पैसे जवळ बाळगण्याची गरज देखील संपली. QR कोड नावाची जादुई गोष्ट प्रत्येक दुकानात फेरीवाल्याकडे आली. आर्थिक देवाणघेवाण गरिबच काय अशिक्षित देखील सहज करून लागला. सुट्या पैशांचा प्रश्न तर सुटलाच. पण उरलेले किती द्यायचे घ्यायचे ही वजाबाकी (होय काही सुशिक्षित तरुणांना देखील ही वजाबाकी अवघड जात असे) करण्याचा प्रश्न पण संपला. बँकेत एके काळी राजकीय पक्षांच्या लोन वाटपाच्या योजनांसाठी लागणारी झुंड बंद झाली आणि सामान्य व्यावसायिक आत्मनिर्भर होऊ लागला. त्याचा क्रेडीट स्कोर तयार होऊ लागला. लोन देण्यसाठी बँक पुढे येऊ लागली कारण लोन बुडणार नाही याची खात्री बँकेला झाली.
इतके दिवस ऑटोमेशन मानवी कष्ट कमी होतील किंवा कमीत कमी मानवी कष्टात जास्तीत जास्त उत्पादकता मिळावी या साठी होती. उत्पादकतेबरोबरच गुणवत्ता आणि अचूकता हा देखील उद्देश होता. आता हे ऑटोमेशन मानवी क्षमताच्या आणि भावभावनांच्या ताबा घेऊ लागले आहे किंवा त्यावर मात करू लागले आहे. उदा. गाडी चालवणे ही केवळ मानवी क्षमता असे आजवर आपण मानत आलो आहोत. कारण गाडी चालवताना कान आणि डोळे या ज्ञानेंद्रियांकडून जे ज्ञान होते, त्या ज्ञानाचे मेंदूंत अतिशय वेगाने पृथक्करण करून ड्रायव्हरला गाडीचा वेग वाढवणे, कमी करणे,आपत्कालात प्रसंगी क्षणात ब्रेक दाबणे, जरुरी इतके डावीकडे वा उजवीकडे वळणे इत्यादी क्रिया आपला मेंदू इतर अवयावांकडून सहजतेने घडवून आणतो. एकदा गाडी चालवण्याचे तंत्र शिकले की गाडी केव्हाही हातात घ्या आपला मेंदू आणि इतर अवयव एकमेकांशी संवाद साधून आपण अपघातरहित गाडी चालवतो. हे केवळ मानवाला दिलेले ईश्वरी वरदान आहे असा आपला आजवरचा समज. अर्थात गाडी चालवताना मेंदू आणि अवयव यांच्यातील संवाद काही कारणाने वा लक्ष विचलित झाल्याने तुटला तर अपघात हमखास. हे लक्ष विचलित होणे ही चूक मानवाच्या हातून होणे ही सहज प्रवृत्ती आहे. पण ही चूक प्राणांतिक ठरू शकते. ए-आय या मानवी चुकांपलीकडे काम करण्याची क्षमता ठेवते. यात कारला चहू बाजूने कॅमेरे लावलेले असतात. या कॅमेर्यांनी घेतलेल्या फोटो एका कृत्रिम मेंदूकडे पाठवले जातात हा मेंदू (CPU) या इमेजेसचे तत्काळ पृथक्करण करून गाडीत असलेल्या वेगवेगळ्या मोटोर्सना (अवयव) आज्ञा देऊन काय action घ्यायची हे घडवून आणतो. हे काम मानवी मेंदू आणि त्यांचे अवयव ज्या तत्परतेने करतात त्यापेक्षा अधिक वेगाने आणि अचूक घडू शकते. आता ड्रायव्हरची गरजच नाही. ए-आयला मानवी भावभावना नसल्याने चित्त विचलित होण्याचा प्रश्नच नाही. शिकवलेले काम मुकाट्याने करायचे. रस्त्यात सुंदर मुलगी दिसली म्हणून चित्त विचलित झाले. घरी बायकोशी भांडण झाले म्हणून आज गाडी अवास्तव वेगात नेली आणि धडकवली हा प्रश्नच नाही. आता भावभावनांच्या कल्लोळातून अपघात होण्याचा प्रश्न टळला. कोणत्याही नव्या डेव्हलपमेंटनवे प्रश्न उपस्थित नको का व्हायला? मग अशा ए-आय चलित गाड्या आल्या तर ज्या लाखो ड्रायव्हरांना नोकऱ्या मिळतात त्यांच्या बेकारीचे काय. ग्राहकाला नाकारणे, अवास्तव पैसे मागणे, उर्मटपणे बोलणे हे दुर्गुण घेऊन जर ड्रायव्हर ग्राहकाशी वागणार असतील तर उद्या OLA UBER अशा गाड्या घेऊन रस्त्यावर आल्या तर काय हा प्रश्न आहे. अशा गाड्या महाग आहेत आणि फक्त अतिश्रीमंतांना त्या परवडतील त्यामुळे काळजी नाही असा जर आपला समज असेल तर तो खोटा आहे. आज गाडीच्या भोवती लावलेले कॅमेरे गाडी चालवताना चालकाला अपघाताची क्षमता असलेल्या जागेची सूचना देऊ लागल्या आहेत. अगदी ५० फुटावर असलेला स्पीड ब्रेकर गाडीला ओळखता येतो. किंवा रस्त्यावरचे खड्डे ओळखून गाडीतील लोकांना त्रास होणार नाही नाही या नुसार गाडीचा वेग कमी होऊ शकतो अशी वाहने बाजारात सहज उपलब्ध होत आहेत. तेव्हा ए-आय आधारित स्वस्त कार्स फार दूर नाहीत. वर कारचे उदाहरण दिले आहे. अशा अनेक जागा ए-आय माणसाकडून हिसकावून घेते आहे. अनेक रेस्टॉरंटमध्ये वेटर्सची जागा ए-आय रोबोट्सनी घेतली आहे. डिलिव्हरीबॉय डिलिव्हरीड्रोन घेतायत. जगातले अनेक संशोधक नवनव्या कल्पनांना मूर्त स्वरूप देऊन या कामात आपली creativity दाखवत आहेत. ए-आय हे केवळ शाप की वरदान हा निबंध लिहिण्याइतकेच मर्यादित नाही तर त्यापलीकडे मानवी जीवनावर परिणाम साधणारे आहे. यात केवळ ड्रायव्हर, डिलिव्हरीबॉय आणि वेटर्सचे जॉब जाणार नाहीत तर चित्रकार, कलाकार, व्हाईस artist, actors, क्लार्क, शिक्षक, मॅनेजरस् अशा अनेकांना आपले स्कील वा ज्ञान ए-आयच्या पलीकडे अद्ययावत ठेवावे लागणार आहे. हा तंत्रज्ञानाचा रेटा कोणीच रोकु शकणार नाही. रेल्वेत, मेट्रोमध्ये बुकिंग क्लार्क आता लागतच नाहीत. तंत्रज्ञानामुळे मेट्रोमध्ये विदाऊट तिकीट तुम्ही जाऊच शकत नाही. रस्त्यावर ट्राफिक नियमांचे केलेलं उल्लंघन तुमच्या मोबाईलवर त्याचे चलन येते कारण कॅमेरे तुम्हाला गुन्हा करताना ओळखतात. ‘उपरवाला सब देख रहा है’ ही उक्ती आता प्रत्यक्षात आली आहे ती ए-आयमुळे. अमेरिकेत येणाऱ्या परदेशी प्रवाशांना तपासणीमधून जावे लागत नाही ए-आय कॅमेरे तुम्हाची ओळख पटवून घेतात नी तुम्हाला अमेरिकेत प्रवेश द्यायचा की नाही हे ठरवतात. कारण तुमची ओळख ए-आय कॅमेरे ज्या अचूकतेने घेतो ती मानवाच्या दृष्टीतून कधीतरी सुटू शकते. बेकायदेशीर मानवी तस्करी,गुन्हेगारांचा शोध ए-आय सहज घेऊ शकते. पोलिसांना ए-आय वरदान ठरणार आहे. उद्या ए-आय स्वयंपाकघरात येणार आहे. गृहिणीचा वा गृहस्थाचा सुगरणपणा ए-आय माध्यमातून काय स्वयंपाक करायचा आणि चव कोणती आणायची हा असणार आहे.
ए-आय हा मानवाचा मदतनीस असणार त्यापेक्षा जास्त स्पर्धक असणार हे निश्चित. इतकी वर्षे ऑटोमेशन मशीनपुरते मर्यादित होते. आता एआयमुळे ते मानवापर्यंत येऊन ठेपले आहे. या स्पर्धाकाशी मुकाबला सोपा नाही. गेली २५ वर्षे softwareक्षेत्राने मध्यम वर्गाला उच्च मध्यम वर्ग अथवा श्रीमंतीचे दिवस आणले. त्यांचा गर्व देखील हे एआय उतरवणार आहे. Software coding आता एआय करू लागले आहे. एके काळी मॅट्रीक पास होण्याच्या जोरावर नोकरी मिळवणे आणि ती रिटायर होईपर्यंत टिकवणे शक्य होई. आता ही मंडळी आता भाग्यवान वाटू लागली आहेत. छोट्याश्या ज्ञानाच्या भांडवलावर संसार ४-४ मुलाबाळांची लग्ने केली. आता आपले आज कमावलेले ज्ञान उद्या निकामी आणि निरुपयोगी ठरणार आहे. ज्ञानाची कुशलतेची expiry date पाच वर्षांच्या आत येते आहे. कशी टक्कर देणार याला हा मोठा प्रश्न आहे. आपली विनयशीलता,कार्यक्षमता, बुद्धिमत्ता, चातुर्य या गुणांवर काही प्रमाणात टक्कर देणे शक्य आहे. मत्सर, इर्षा,भांडखोरवृत्ती, उर्मटपणा सोडला आणि एकमेकांना धरून या स्पर्धेवर मात करावी लागेल. नाहीतर बायको/नवऱ्याचा प्रेयसी/प्रियकराचा स्वभाव फार किरकिरा आहे म्हणून कोणी एआय ड्रिव्हन अलेक्सा अथवा जॉन बरोबर रहाणे पसंत करू लागले तर ही स्पर्धा कुठपर्यंत जाईल हे सांगता येणार नाही. काळजी घेऊयात. नाहीतर…..पस्ताओगे.
असो. ऑटोमेशनविषयी सध्या इतकेच.
– समाप्त –
© श्री श्रीकांत कुलकर्णी
मो ९८५००३५०३७
Shrikaant.blogspot.com; Shrikantkulkarni5557@gm
प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे
पुणे
मो – 9657709640 Email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈