इंद्रधनुष्य
☆ शापित आहे श्रीकृष्णाचा गोवर्धन पर्वत – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
वृंदावनमध्ये गोवर्धन पर्वताचा खास महिमा आहे. वैष्णव लोक या पर्वताला श्रीकृष्ण समान मानतात. मान्यतेनुसार, गोवर्धन पवर्ताची परिक्रमा आणि पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. पृथ्वीवर गोवर्धन पर्वत स्वतः श्रीकृष्णाचे धाम गोलोकमधून आला होता. मान्यतेनुसार, एका शापामुळे या पर्वताची हळू-हळू झीज होत आहे.
गोवर्धन पर्वताला का देण्यात आला होता शाप ??
कथेनुसार श्रीकृष्णाच्या प्रेरणेने शाल्मली द्वीप मध्ये द्रोणाचल पत्नीच्या गर्भातून गोवर्धन पर्वताचा जन्म झाला. गोवर्धनला परमेश्वराचे रूप मानून हिमालय, सुमेरु इ. पर्वतांनी त्याची गिरीराज रुपात पूजा केली. एकदा तीर्थयात्रा करत पुलत्स्य ऋषी गोवर्धन पर्वताच्या जवळ आले. पर्वताचे सौंदर्य पाहून ऋषी मंत्रमुग्ध झाले आणि द्रोणाचल पर्वताला म्हणाले की, मी काशीला राहतो आणि तुम्ही तुमचा मुलगा गोवर्धन मला द्या. मी त्याला काशीमध्ये स्थापित करून तेथेच त्याचे पूजन करेल.
द्रोणाचल मुलाला देण्यासाठी तयार नव्हते परंतु गोवर्धन ऋषीसोबत जाण्यास तयार झाला. त्यापूर्वी गोवर्धन पर्वताने ऋषींना एक अट घातली. तुम्ही मला ज्या ठिकाणी ठेवाल त्या ठिकाणी मी स्थापित होईल. पुलत्स्य ऋषींनी गोवर्धनची अट मान्य केली. गोवर्धन पर्वत ऋषींना म्हणाला की, मी दोन योजन उंच आणि पाच योजन विस्तीर्ण आहे. तुम्ही मला कसे घेऊन जाल?
पुलत्स्य ऋषींनी सांगितले की, मी तुला माझ्या तपोबलावर हातावर उचलून घेऊन जाईल. त्यानंतर ऋषी गोवर्धनला घेऊन निघाले. वाटेत वृंदावन आले. वृंदावन पाहून गोवर्धनची पूर्वस्मृती जागृत झाली आणि त्याला आठवले की, याठिकाणी श्रीकृष्ण आणि देवी राधा बाल्यावस्था आणि तारुण्य काळात विविध लीला करणार आहेत. हा विचार करून गोवर्धन पर्वताने स्वतःचा भार आणखी वाढवला. यामुळे ऋषींना विश्राम करण्याची आवश्यकता वाटू लागली आणि त्यांनी गोवर्धनला हातावरून खाली ठेवले. गोवर्धन पर्वताला या मार्गात कोठेही ठेवायचे नाही, ही अट ऋषी विसरले.
काही काळानंतर ऋषी पर्वताजवळ आले आणि उचलण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा गोवर्धनने सांगितले की आता मी कोठेही जाऊ शकत नाही. मी तुम्हाला निघतानाच माझी अट सांगितली होती. त्यानंतर ऋषींनी गोवर्धनला सोबत येण्याचा खूप आग्रह केला परंतु गोवर्धनने नकार दिला. त्यानंतर संतप्त झालेल्या ऋषींनी गोवर्धन पर्वताला शाप दिला की, तुझ्यामुळे माझे कार्य अपूर्ण राहिले त्यामुळे आजपासून दररोज तीळ-तीळ तुझी झीज होईल आणि काही काळानंतर तू या जमिनीत सामावाशील. तेव्हापासून गोवर्धन पर्वत झिजत आहे. कलियुगाच्या अंतापर्यंत हा जमिनीमध्ये सामावलेला असेल…….
लेखक : अज्ञात
संग्राहक : अनंत केळकर