श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ …आणि मृत्यूही गहिवरला !!! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
समर्थांनी दासबोधातील एक अख्खा समास मृत्यूवर खर्च केला आहे, याचा अर्थ मृत्यूचे आपले जीवनातील महत्व वादातीत आहे. आज मा. मनोहर पर्रिकरांच्या मृत्यूची बातमी येऊन थडकली आणि मनात पहिला विचार मनात आला की आज मृत्यूही गहिवरला असेल.
यमाने तर आपले यमदूत अनेक दिवस त्यांच्या मागावर धाडले होते. अनेक युक्त्याप्रयुक्त्या करुन ते यमदूत त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होते. आज मात्र त्यांनी घाला घातला. यमदूतांचे काम यमाचा आदेश पाळणे, त्यामुळे त्यांचा काही दोष आहे, असे म्हणणे योग्य होणार नाही.
या धरतीवर अनेक जीव जन्मास येतात आणि यथाकाल आपले जीवन संपवतात. पण काही लोक नुसते जगत नाहीत तर आपली ‘पात्रता’ वाढवत जातात. अशा लोकांचा मृत्यू सुद्धा एका वेगळ्या अर्थाने ‘सोहळा’ होतो. आज यमाच्या दरबारात आनंदोत्सव असेल कारण आज एक ‘कर्मयोगी’ मृत्यूलोकातून यमलोकात प्रवेश करीत असेल.
एक तरुण साधारण २५-३० वर्षांपूर्वी IIT सारख्या नामांकित संस्थेतून पदवीधर होतो आणि नोकरीसाठी परदेशात न जाता परत गोव्यात येतो. त्याकाळी उपेक्षित असलेल्या राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतो आणि अनेक साथीदार सोबत घेऊन, चांगले संघटन करून गोव्याची सत्ता ताब्यात घेतो आणि एखाद्या चित्रपटाच्या कथेला लागू होईल असे जीवन जगतो. हे सर्व विलक्षण नव्हे काय ?
मुख्यमंत्री झाल्यावर ही पोशाख न बदलणारा पर्रिकरांसारखा एकमेव मुख्यमंत्री असावा. त्यांनी ना कधी आपला पोशाख बदलला ना कधी आपले माणूसपण बदलले. हे लिहायला जितके सोपे तितके आचरणात आणायला भयंकर अवघड!!. पण मा. पर्रिकरांनी ते ‘जगून’ दाखवले.
स्कुटर वर फिरणारा, सर्वाना सहज उपलब्ध होणारा मुख्यमंत्री असा लौकिक त्यांनी मरेपर्यंत टिकवला, नव्हे तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला असे म्हणता येईल.
“कार्यमग्नता’ जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती” हे काव्य मा.मनोहर पंतांनी जगून सिद्ध केले. मनुष्याचे काम बोलते हे वचन आणि अशी अनेक वचने त्यांच्या जीवनाची अविभाज्य भाग होती असेच म्हणावे लागते. त्यांच्या बद्दल बोलताना माझे शब्दभांडार अपुरे पडत आहे पण लिहिणारा हात थांबायला तयार नाही.
आज मृत्यू ही त्यांच्या आत्म्यास नेताना गहिवरला असेल. या आधी जेव्हा जेव्हा यमदूत त्यांना न्यावयास आले असतील तितक्या वेळा परममंगल अशा भारतमातेने त्या यमदूतांस नक्कीच अडवले असेल. ती म्हणाली असेल, “माझ्या या लाडक्या लेकास नको घेऊन जाऊ.” पण शेवटी नीयतीच्या पुढे कोणाचेच चालत नाही, हेच खरे…!!
श्री मनोहर पंतांचे सारे जीवन भारतमातेच्या सेवेत खर्ची पडले.
इंग्रजी मध्ये एक ‘म्हण’ आहे.
It’s very easy,
To give an Example,
But
It’s Very Difficult,
To become an Example.Try to be an Example.
मा. मनोहरपंत असेच जगले. त्यांच्या जीवनचारित्रास मी ही शब्द सुमनांजली अर्पण करीत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.
© श्री संदीप रामचंद्र सुंकले
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈