श्री सुनील शिरवाडकर
इंद्रधनुष्य
☆ बुवा… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
ट्रकने मुंबईत प्रवेश केला तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. एका साध्या टपरीवजा हॉटेलपाशी ट्रक थांबला. बुवा ड्रायव्हर शेजारीच बसले होते. ड्रायव्हरनं खाली उडी मारली. बुवांनाही जाग आली. रात्रभर म्हणावी तशी झोप लागलीच नव्हती. आणि रात्रभरच्या ट्रक प्रवासात ते शक्यही नसतं. पहाटे कुठं डोळा लागला तर मुंबई आलीच.
बुवांचं वय झालं होतं. त्यांना ट्रकच्या केबिन मधुन खाली उडी मारणं शक्य नव्हतं. ड्रायव्हर सोबतच्या माणसानं कशीतरी कसरत करुन बुवांना खाली उतरवलं. टपरीपुढे एक लाकडी टेबल होता.. आणि चार लोखंडी खुर्च्या. बुवा तेथे टेकले. प्लास्टीकच्या जगमधुन पेल्यात पाणी ओतले. खळखळुन चुळ भरली.. तोंडावर पाणी मारलं. खांद्यावरच्या पंच्याला तोंड पुसलं.
टवके उडालेल्या कपात एका पोरानं चहा आणुन दिला. त्या गरम चहाचा पहिला घोट घेतल्यावर बुवांना जरा बरं वाटलं. थोडी तरतरी आली.
ट्रक ड्रायव्हर नंतर चहाचे पैसे दिले.. ते ठरलेलंच असायचं. बुवांची परिस्थिती ड्रायव्हरला माहीत होती. म्हणुन तर तो नेहमी बुवांना कोल्हापूर पासुन मुंबई पर्यंत घेऊन यायचा.. काहीही पैसे न घेता. जातानाही तसंच.. त्याच ट्रकमधून बुवा पुन्हा कोल्हापुरला जायला निघायचे.
चालत चालत बुवा निघाले.. आणि पंधरा मिनिटांत आकाशवाणी केंद्रावर आले. त्यांचा अवतार बघून खरंतर गेटवर त्यांना अडवायला पाहिजे होतं.. पण बुवांना आता तिथे सगळे जण ओळखत होते. चुरगळलेला सदरा.. गाठी मारलेलं धोतर.. झिजलेल्या वहाणा.. पण दाढी मात्र एकदम गुळगुळीत. काल रात्री निघण्यापूर्वीच बुवांनी दाढी केली होती.
आकाशवाणी केंद्राच्या प्रतिक्षा गृहात बुवा आले. नेहमीच्या सोफ्यावर बुवांची नजर गेली. तो रिकामाच होता. बुवांना जरा बरं वाटलं. तिथे कुणी बसायच्या आत बुवा घाईघाईने गेले.. आणि सोफ्यावर चक्क आडवे झाले. दोनच मिनिटांत बुवा छानपैकी घोरु लागले.
एवढा आटापिटा करून कोल्हापुराहुन मुंबईला येण्याचं काय कारण? तर केवळ पैसा..
बुवांची परिस्थिती खुपच हलाखीची होती. साक्षात सवाई गंधर्वांचा आशिर्वाद मिळालेल्या कागलकर बुवांची सध्या ही अशी परिस्थिती होती. एकेकाळी सवाई गंधर्वांचे शिष्य म्हणून त्यांना कोण मान होता. पण आर्थिक नियोजनचा अभाव. कुणीतरी सांगितलं.. मुंबई आकाशवाणीवर गाण्याचा कार्यक्रम केला की साठ रुपये बिदागी मिळते. त्यांनी आकाशवाणी केंद्रावर चकरा मारायला सुरुवात केली.
तिथं त्यांना सांगण्यात आलं.. ’ तुम्ही कोल्हापूरचे.. त्यामुळे पुणे केंद्रावर जा. ’
पण झालं होतं काय.. पुणे केंद्रावर कलाकारांची गर्दी.. तिथं नंबर लागणं कठीण.. शिवाय बिदागी पण कमी.. म्हणून मग मुंबई केंद्रावर चकरा.
अखेर कुणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी मुंबईचा असाच एक डमी पत्ता दिला.. आणि आपण मुंबईकर आहोत असं सिद्ध केलं. मुंबई केंद्रावर त्या वेळी रविंद्र पिंगे अधिकारी होते. त्यांनीही समजुन घेतलं. वर्षाकाठी पाच सहा कार्यक्रम देण्याची व्यवस्था केली.
आकाशवाणी केंद्रावरच्या माणसांनी बुवांना जागं केलं. बुवांच्या रेकॉर्डिंगची वेळ झाली होती. बुवा उठले चुळ भरली.. तोंडावर पाणी मारलं.. ताजेतवाने झाले.. आणि रेकॉर्डींग रुममध्ये आले.
गळ्यात दैवी सुर घेऊन जन्मलेले कागलकर बुवा गायला बसले.. आणि..
.. त्यांच्या अलौकीक गायनानं सगळा रेकॉर्डींग रुम भारुन गेला.
अर्ध्या तासाचं रेकॉर्डींग झालं.. बुवा बाहेर आले. केंद्रावर असलेल्या कॅन्टीन मध्ये एक रुपयात राईस प्लेट मिळत होती. तिथे जेवण केलं. साठ रुपयांचा चेक खिशात टाकला.. आणि डुलत डुलत पुन्हा कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले.
उमेदीच्या काळात मिळालेला पैश्यात भविष्य काळाची तरतूद करणं सगळ्यांना तरच जमतं असं नाही. मग म्हातारपणी त्यांची ही अशी अवस्था होते. कागलकर बुवांचं नशीब थोडंफार चांगलं.. त्यांना आकाशवाणीनं मदतीचा हात दिला.
कागलकर बुवा ज्याला त्याला अभिमानाने सांगत.. पु. ल. देशपांडे यांनी माझा गंडा बांधला होता. आता पु. ल. तर बालगंधर्वांच्या गायकीचे चहाते.. मग सवाई गंधर्वांचे शिष्य असलेल्या कागलकर बुवांचा गंडा ते कसे बांधणार?
हाच प्रश्न एकदा रविंद्र पिंगे यांनी पु. लं. ना विचारला.
पु. ल. देशपांडे म्हणाले..
मी तेव्हा बेळगावात रहात होतो. कागलकर बुवा पण तेव्हा बेळगावातच रहात होते. मी बुवांची परिस्थिती पाहिली. दोन पैसे मिळावेत म्हणून त्यांनी गाण्याचा क्लास काढला होता. पण त्यांना विद्यार्थी मिळेनात.
मी विचार केला.. मी जर बुवांचा गंडा बांधला, तर बुवांचा जरा गाजावाजा होईल.. त्यांना विद्यार्थी मिळतील. केवळ म्हणून मी बुवांचा गंडा बांधला.. त्यामुळे मला अपेक्षित असलेला बोलबाला झाला.. त्यांच्याकडे बरेच विद्यार्थीही आले हे खरं.. पण माणूस मात्र खुपच गुणी.. त्यांच्यासारख्या थोर गायकाला अश्या परिस्थितीतला सामोरं जावं लागलं हे दुर्दैव..
आणि हे आम्हाला पाहायला लागतं आहे.. हे आमचं दुर्दैव!
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈