श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ एका शूरवीराचे शब्द ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
एका शूरवीराचे शब्द !
अर्थात… शूर नायक…कर्नल वसंथा वेणुगोपाल !
आसमंतात धुकं नुसतं भरून राहिलंय. माझ्या जवानांनी मस्तपैकी शेकोटी पेटवून ठेवलीये माझ्या खोलीतल्या शेकोटीच्या जागेत….छान ऊब मिळतीये काश्मिरातल्या त्या नाजूक लाकडांतून उठणा-या सडपातळ ज्वाळांची. मी अंगावर रजई पांघरूण पडलो आहे निवांत भिंतीला गुडघे टेकवून. सारं कसं धुंद आहे….आपण प्रेमात असतो ना तेंव्हा वाटतं तसं…सगळं मधाळ. केनेथ ब्रुस गोरलिक ज्याला सर्वजण केनी जी म्हणतात…त्याचं स्मूद जॅझ सॅक्सोफोन कानांवर हलकेच पडतं आहे….द मोमेंट वाजवतो आहे केनी.
पण खोलीच्या बाहेर रात्रीच्या अंधारात इकडून तिकडे सतत येरझारा घालणारा प्रकाशझोत आहे आणि त्याचा उजेड थोड्याथोड्या वेळाने खोलीत येऊन जातोय…..हा प्रकाश डोंगरावर काहीतरी शोधतो आहे डोळ्यांत तेल घालून. माझी एके-४७ माझ्या हाताशीच आहे….या शस्त्राचा तो थंड स्पर्श! यातून सुटणारा आगीचा लोळ क्षणार्धात समोरचा देह कायमचा थंड करणारा…..आणि म्हणूनच या सुंदर वातावरणात वास्तवाचं भान सुटता सुटत नाही. आणि ते सोडून चालणार नाही. मी इथं जीवनाचा आनंद घेण्यासाठी, सुट्टीवर आलेलो नाहीये. आपल्या सीमेत कुणीतरी घुसण्याच्या प्रयत्नांत आहे….शत्रू! आणि त्याला थोपवण्यासाठी,संपवण्यासाठी या जीवघेण्या थंडीतही अंगात ऊब टिकवून ठेवायला पाहिजे…..मी जागाच आहे.
आज पहाटे दोन वाजताच आम्ही शत्रूच्या मागावर निघालो होतो….सात वाजेपर्यंत चालू होता आजचा खेळ. आम्ही दबा धरून बसलो होतो….प्रचंड साचलेल्या बर्फात….अंगातील हाड न हाड गोठून चाललेलं….सर्वांच्या हातातील एके-४७ रायफल्स….एखाद्या बाळाला जसं हातांवर अलगद झुलवत रहावं तसं या रायफल्स खेळवत,सांभाळत सर्व सज्ज होतो! आम्ही त्यांची वाट पहात होतो….शिकार रायफल्सच्या टप्प्यात येण्याची वाट पहात बर्फात निजलेलो होतो….कसलाही आवाज न करता…आमच्या श्वासांचाही आवाज बहुदा होत नसावा…श्वासांना वेळकाळ समजते!
पण आज त्यांची शंभरी भरलेली नसावी बहुदा….आम्ही आयोजित केलेल्या या स्वागतसमारंभाकडे मंडळी फिरकलीच नाहीत….त्यांना बहुदा आमचा अंदाज आलेला असावा. किंवा मिळालेली गुप्त माहिती अपुरी असावी! असं होतं कित्येकदा. पण बेसावध राहून चालत नाही! आम्ही परत आलो आहोत! पण लवकरच त्या आगंतुक पाहुण्यांची गाठ पडणार हे निश्चित!
हे शब्द आहेत एका नीडर आणि तरीही मनाने अत्यंत कोवळ्या असलेल्या एका सैन्याधिका-याचे….आपल्या प्रिय पत्नीला सुभाषिणीला लिहिलेल्या एका पत्रातील. अशी चारशेपेक्षा अधिक पत्रं संग्रही आहेत वीरनारी सुभाषिणी वेणुगोपाल यांच्याकडे. आणि या पत्रांचे लेखक आहेत कर्नल वसंथा वेणुगोपाल.
वेणुगोपाल साहेब १९८९ मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीच्या ‘घातक नववी’ म्हणून ख्यातकीर्त असलेल्या नवव्या बटालियनमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले होते. त्यांची सैन्य कारकीर्द तब्बल १८ वर्षे बहरत राहिली. २००६ मध्ये वेणुगोपाल साहेबांना याच नवव्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर म्हणून जबाबदारी मिळाली….कर्नल वसंथा वेणुगोपाल यांच्या नेतृत्वात यावेळी ही बटालियन जम्मू-काश्मिरातील उरी येथे कर्तव्यावर होती. आणि बटालियनच्या प्रत्येक अतिरेकी विरोधी अभियानात कर्नल साहेब जातीने पुढे असत. एकदा त्यांच्या आईसाहेबांनी त्यांना विचारले होते….कर्नल दर्जाच्या अधिका-यास असं प्रत्येक वेळी प्रत्येक कामात पुढं असावंच लागतं का? त्यावर साहेबांनी मातोश्रींना हसत हसत सांगितलं होतं…अम्मा….माझी माणसं जिथं तिथं मी! जवानाचं नेतृत्व असं अग्रभागी राहूनच करावं असं मला वाटतं!
आजही असंच केलं साहेबांनी. ३० जुलै २००७…पाकिस्तानातून अतिरेक्यांचा एक मोठा गट उरीमध्ये घुसण्याच्या तयारीने सीमा पार करून आपल्याकडे घुसलेला आहे….ही खबर पक्की होती. साहेबांनी आपले कमांडो सज्ज केले आणि स्वत: पुढे निघाले. अतिरेक्यांसाठी भरभक्कम सापळा रचला. अतिरेकी रात्रभर बर्फाच्या कड्यांच्या आडोशाने लपत छ्पत पुढे येत होते….गुहांमध्ये लपत होते. पण आपल्या जवानांनी त्यांना नजरेने टिपलेच…
कर्नल साहेबांनी आता मात्र त्यांना चारी बाजूंनी घेरलं…त्यांना आपल्याकडे घुसू तर द्यायचेच नाही पण परत पाकिस्तानी सीमेत जिवंतही पळून जाऊ द्यायचे नाही….हा प्रत्येकाचाच निर्धार होता. प्रचंड बर्फ होतं…..वीस-तीस फुटांच्या घळी होत्या वाटेत. त्यांच्या निमुळत्या जागांमध्ये आडवे झोपून अतिरेक्यांच्यावर लक्ष ठेवून रहावे लागत होतं. वेणुगोपाल साहेबांना आपला वेढा करकचून आवळत आणला. साहेबांसोबत रेडिओ ऑपरेटर लान्स नायक शशिकांत गणपत बच्छाव नावाचा मर्दमराठा शूर गडी सावलीसारखा होता.
३१ जुलै,२००७ची सकाळ उजाडली होती…काही तासांपूर्वी तुफान गोळीबार करीत राहणारे अतिरेकी आता एकाएकी शांत झाल्याचे वाटले. म्हणून शशिकांत यांनी अर्धवट उभे राहून गुहेच्या दिशेने पाहिले तर तिकडून एके-४७ ची मोठी फैर शशिकांत साहेबांच्या छातीत घुसली….पण कोसळता कोसळता या पठ्ठ्याने समोरच्या अतिरेक्याला अचूक टिपून वरती पाठवले. आता मात्र वेणुगोपाल साहेब चवताळून पुढे सरसावले. अतिरेक्यांसमोर त्यांचा साक्षात मृत्यूच उभा ठाकला होता..
साहेबांनी एकाला तर अगदी समोरासमोर उडवला….पण इतर अतिरेक्यांनीही नेम साधले आणि साहेब गंभीर जखमी झाले आणि वीस फूट खाली कोसळले…जवानांनी त्यांना पुन्हा वर आणले व सुरक्षित जागी निजवले…पण तशाही स्थितीत साहेबांनी सूचना,नेतृत्व आणि स्वत: गोळीबार जारी ठेवला…रक्तस्राव सुरू असतानाही. वैद्यकीय मदत मिळायला अवकाश होता….! साहेबांनी अशाही स्थितीत आणखी दोन शत्रू टिपले….घातक नववी मराठा बटालियन आता अतिरेक्यांवर आवेशाने तुटून पडली….एकूण आठ अतिरेकी होते….कर्नल साहेब, शशिकांत साहेब आणि उर्वरीत कमांडोज यांनी मिळून हे आठ राक्षस निर्दाळले होते.
पण लान्स नायक शशिकांत गणपत बच्छाव जागीच वीरगतीस प्राप्त झाले होते तर कर्नल वसंथा वेणुगोपाल साहेब रूग्णालयात उपचार मिळेपर्यंत स्वत:चे प्राण राखू शकले नाही….प्रचंड जखमी झाल्याने त्यांच्या श्वासांचाही नाईलाज होता!
कर्नल साहेबांना मरणोत्तर अशोक चक्र सन्मान दिला गेला. लान्स नायक शशिकांत बच्छाव यांना मरणोत्तर वीरचक्राने सन्मानित करण्यात आले. २५ मार्च ही कर्नल साहेबांची जन्मतिथी. आज ते ५५ वर्षांचे असते आणि त्यांच्या आंतरीक इच्छेनुसार निवांत जीवन जगत असलेले असते…पण…असो. भावपूर्ण श्रद्धांजली…साहेब.
शहीद कर्नल वसंथा वेणुगोपाल यांच्या पत्नी श्रीमती सुभाषिणी वेणुगोपाल पती गमावल्यानंतरच्या अवघ्या तीनच महिन्यांत निश्चयाने उभ्या राहिल्या…त्यांनी सैनिकांसाठी काम सुरू केले आणि हे काम अतिशय उत्तम सुरू आहे.
कर्नल साहेबांच्या दोन्ही मुलींनी मिळून फॉरएव्हर फोर्टी नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात कर्नल साहेबांनी कुटुंबियांना लिहिलेल्या चारशेच्या वर पत्रांचा उल्लेख,संदर्भ आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्याची माझी इच्छा आहे. पुस्तक मागवले आहे. लवकरच त्याबाबतीत कार्यवाही सुरू करीन. कारण ही शूर आयुष्यं आणि त्यांच्या धीरोदात्त कुटुंबियांचा संघर्ष सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजेत…असं वाटत राहतं.
(वरील छायाचित्रात डाव्या बाजूला कर्नल साहेब आणि उभे असलेले लान्स नायक शशिकांत साहेब दिसत आहेत.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈