श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ माझ्या भावाला माझी माया कळू दे ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
एक गाणारं तळं होतं आणि त्यात राजहंसांची पाच सुरेख पिलं होती. पण दुर्दैवानं यातलं एक पिलू काहीसं अधू होतं शरीरानं. तळ्यातल्या पाण्यात विहार करायचा तर पाय तर पाहिजेत ना भक्कम? पण नेमके हेच तर शल्य होतं त्या राजहंसाच्या तनमनाचं! या पिलांचे आई-बाबा स्वत:च प्रपंचाच्या लाटांचे तडाखे साहीत कसेबसे तरंगत होते जीवनाच्या या पाण्याच्या पृष्ठभागावर….त्यांच्या पायांतील आणि पंखांतील शक्ती क्षीणक्षीण होत जाणारी! यातला वडील राजहंस तर अकालीच उडून गेला! आई पक्षिणीसह सारेच राजहंस केविलवाणे झाले. कल्पवृक्ष लावून गेलेल्या बाबाचा वंश पुढे चालवणारा राजहंस पायांनी चालू शकत नव्हता आणि आई पक्षिणी करून करून करणार तरी किती?….त्यावेळी ती स्वत:हून पुढे झाली आणि त्या पिलाची जणू आईच झाली.
जागृती,स्वप्नी सुषुप्ति या तिन्ही अवस्थांमध्ये भगवदभक्त जसा देवाच्या सान्निध्यात असतो तशी ती त्याला आपल्या अंगाखांद्यावर वागवू लागली….पाऊलं थकली तरी तिला तिच्या कडेवरचं हे पिलू कधी ओझं नाही वाटलं. गाय जसं आपलं वशिंड सहज वागवते तशी ती या बाळाला मिरवत होती.
बाकी सारं घर स्वरांच्या साधनेत मग्न असताना ती मात्र प्रपंच्याच्या व्यवहारात आपलं गाणं शोधत असे. अस्सल गवय्याची लेक…गळा असा सुनासुना राहीलच कसा? पण एकाजागी बसून गाणं शिकावं,ऐकावं आणि सादर करावं असं तिचं काही नसायचं. घर,अंगण झाडून काढताना,भांडी घासताना आणि अगदी कपडे धुवत असतानाही बाळ तिच्या अंगाशीच असायचा. बघणाराला यांच्याकडे पाहून चित्रातल्या गाय-वासराची आठवण व्हावी! बाळाच्या दुधासाठी भराभरा चरणारी गाय आणि तिच्या पायांत घुटमळत चालणारं वासरू….पण हे वासरू मात्र स्वत: चालू शकत नसायचं त्यावेळी.
दोन-चार मैलांवरच्या नदीपात्रात कपडे धुवुन येताना तिच्या एका हातात ओल्या कपड्यांचं ओझं असायचं आणि कडेवर बाळ. पायांखाली फुफाटा…तापलेला. रस्त्यावर सावली नावाची पुसटशी रेघही नाही. वाटेच्या सोबतील दुसरं कुणीही नाही. पडक्या आसमंताची साथ आणि ही दोन पावलं दूरवरच्या घराकडे निघालीत…आपल्याच धुंदीत. कडेवरच्या बाळाच्या पायांपासून तापल्या धुळीची धग एक हात दूर. चालणारी जेमतेम दहा वर्षांची तर कडेवरचं बालक पाचेक वर्षांचं. त्याची पावलं तिच्या गुडघ्यापर्यंत पोहोचणारी आणि त्यामुळे चालणं तसं मंदगतीनं. पोटात भूकेचं काहूर माजलेलं आणि तिची पावलं थकलेली…तरी कडेवरचं ओझं हे ओझं नव्हतं वाटत तिला….तिचा जीवलग होता तो.
ती अजूनही तशी अल्लड वयातच होती. त्यात सावली धरणारा राजहंस परलोकी निघून गेल्यानं या आयुष्याकडे कटाक्षानं पाहणारंही कुणी नव्हतं तसं…थोरल्या बहिणीशिवाय. ती सुद्धा बालपणातच कपाळावर पोक्तपणाचा गंध लेवून सगळ्यांची आई झालेली पोर. फाटलेलं आभाळ सांधता सांधता तिच्याही हातून एखादा धागा चुकून निसटून गेला असावा. दिवस मागे पडले आणि या पिलांची आभाळं बदलत गेली. बाळ आता थोडा स्वतंत्र उभा राहू शकत होता,चालू शकत होता. त्याच्या पायांत तिनेच बळ भरले होते बहुदा.
तो अजूनही तिच्यासोबतच चालत होता…पण एका वळणावरून ती अचानक दिसेनाशी झाली. तिच्या भावविश्वातल्या एका लुभावणा-या पायवाटेनं तिला जणू मंत्र टाकून आत खोल वनात ओढून नेलं होतं. आता बाळ तसा आधाराविना राहिला होता आणि मग त्यालाही मोठेपणाचा अंगरखा चढवावा लागलाच. आयत्यावेळी कुणी आधी ठरलेला नट आलाच नाही तर घरातल्याच कुणीतरी ती भूमिका वठवायची असं कित्येकवेळा झालेलं होतं त्यांच्या नाट्यप्रयोगांमध्ये. हा तर प्रत्यक्ष आयुष्याचा मंच…इथं घरचाच पुरूष असायला पाहिजे!
तिचं असं अचानक निघून जाणं कुणालाच झेपलं नाही. पण कुणीही तिच्या आठवणींशिवाय झोपलं नाही कधी बिनघोर. ठेच लागलेलं पायाचं बोट जसं चालताना एकदा तरी ठेचकाळतंच…आंधळं बोट म्हणतात त्याला ते काही उगाच? दूर वनातून तिने हाक दिली आणि बाळ तिच्यासाठी धावत गेला…त्याच्या पायांत आता जबाबदारीची ताकद आली होतीच. ती संसाराच्या चटक्यांनी हैराण झालेली होती आणि त्या वणव्यातून निसटू पहात होती. फक्त तिला कुणीतरी हात देणारं पाहिजे होतं. फसलेल्या पायवाटेवरून ती पुन्हा हमरस्त्यावर आली आणि तिला सावली गवसली.
माहेरी गाणं कानांमागे टाकणारी ती आता गाण्यानेच जगाचे कान तृप्त करीत होती. गीतकार जणू तिचेच शब्द तिलाच गायला लावत होते…आणि ती भान विसरून गातही होती….गाण्यांमधून ती जशी जगली तशी दिसू लागली होती….अल्लड,खोडकर,नीडर….तर कधी दुखावलेली,दुरावलेली आणि काही तरी गमावलेली! ती नेमकी कशी हे ताडणं कुणालाही कधीही न जमलेलं.
अब के बरस भेज भैय्या को बाबूल…सावन में लीजो बुलाय रे! बाबा…या श्रावणात तरी दादाला पाठवा ना मला माहेरी घेऊन यायला! माझ्या मैत्रिणी येतील मला भेटायला…आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातील…श्रावणसरी बरसतील…..आपल्या घरच्या आठवणींनी मी व्याकुळ झाले आहे….यौवनानं बालपण चोरलं माझं….माझी बाहुली हरवून टाकली….तुमची किती लाडकी होते ना मी…मग? किती दिवस झाले…नव्हे जणू युगं उलटलीत….दादाला पाठवा!
माई,दादा आणि सर्व भावंडं या सासुरवाशीनीच्या मागे उभी राहिली. ती बाळच्या आयुष्यात परतली आणि त्याचेही सूर त्याला गवसले. बाळला आता कडेवर बसण्याची गरज नव्हती….पण तिने त्याचे सूर तिच्या कडेवर अंगा खांद्यावर घेतले. त्याने सुरांना तिचा आवाज मागितला आणि इतरांना दुर्बोध वाटणारे शब्द तिच्या कंठातून सुगम होऊ लागले.
लहानपणी तिने त्याला कधी दटावलेले असेल की नाही माहित नाही पण आता हा मोठा झालेला बाळ शिकवताना कठोरपणाची छडी हाती घेऊन तिच्या मागे उभा. तिनंही ते सारं निभावून नेलं. तिच्या जीवलगा….राहिले रे दूर घर माझे…. म्हणण्यात प्रत्येकाला आपला जीवलग भेटू लागला. तिच्या स्वरांच्या आवर्तनांमध्ये रात्री उलटून गेल्याचं अगदी पहाटेपर्यंत लक्षातही आलं नाही. चालींच्या मधाळपणात कुणी स्वत:ला हरवून बसले तर काहीचं आभाळ अगदी अंगणात उतरू आलं. प्राणाची तळमळ सागराच्याही काळजात उतरली…पिकलेल्या जांभळांचा सडा कुणाच्या ओट्यांमध्ये पडला तर कुठे समईच्या शुभ्र कळ्या…..देवघरात उमलल्या!
लतादीदी जर गोड आरोह असतील तर आशाताई मुलायम अवरोह म्हणूयात. गायनी कळा धन्य करणा-या या भावंडांनी संगीत विश्वाला मोहिनी घातली ते अविनाशी आहे. यात आशाताईंचं आयुष्य म्हणजे एक दीर्घ काव्य…जी वाचणं सोपं पण भोगणं कठीण. हृदयनाथांबरोबरचं आशताईंचं नातं म्हणजे भावा-बहिणीतल्या नात्याचं एक विलोभनीय चित्र. बालपणी स्वत:च्या पायांनी ‘चाल’ अशक्य असणारे हृदयनाथ पुढे गाण्यांच्या ‘चालीं’नी रसिकांच्या श्रवणाचा मार्ग प्रशस्त आणि श्रीमंत करीत गेले. आणि ते स्वत:च्य हिंमतीवर ते केवळ चाललेच नाहीत तर दीनानाथांच्या संगीत परंपरेच्या वारशाचे भक्कम आधारही झाले.
माझ्या भावाला माझी माया कळू दे असं आशाताई एका गाण्यात म्हणाल्यात…. आई बाबांची सावली सरं…छाया भावाची डोईवर उरं! आशाताईंनी त्यांच्या ‘बाळा’च्या डोईवर धरलेल्या छायेबद्द्ल ह्र्दयनाथ यांनी लिहिलेलं वाचताना असं वाटतं की….त्यांना बहिणीची माया खरंच कळली आहे.
(आजच्या दैनिक सकाळ वृत्तपत्रातील सप्तरंग पुरवणीत ह्र्दयनाथ मंगेशकरांनी आशाताईंविषयी जे काही लिहिलं आहे ते अगदी हृदयाच्या तळापासूनचं आहे..त्यामुळेच ते अस्सल आहे. ते वाचून हे मी माझ्या शब्दांत मांडलं आहे.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈