डाॅ. शुभा गोखले
इंद्रधनुष्य
☆ हृदयस्पर्शी भाग-१ – लेखिका : वर्षा कुवळेकर ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆
एका शहरात लहानाची मोठी झालेली, सुसंस्कृत, सुशिक्षित, सधन घरातील एक मुलगी होती. सुयोग्य शिक्षण झाले आणि सरकारी नोकरीत छान स्थिरावली, बढती घेत मोठी झाली, सर्वार्थाने. पक्षी निरीक्षण, गिर्यारोहण, सामाजिक काही उपक्रम आवडीने जोपासत होती. सख्यांसह त्याचा आनंद उपभोगत होती. पारमार्थिक बैठक निश्चित असावी आतून, ती तोवर दृगोचर झाली नव्हती. एकदा दोन जिवाभावाच्या मैत्रिणींसह नर्मदा परिक्रमेला जायचे ठरवते. संपूर्ण चालत प्रदक्षिणा. नेत्रचक्षू आणि अंतर्चक्षू दोन्ही सजग ठेवून परिक्रमा करताना, मैयाचा भक्तिभाव मनात असताना तिच्या लक्षात येते आजूबाजूची वास्तविकता. परिक्रमा करणाऱ्या लोकांची सेवा करणारे सामान्य जन, त्यांचा सेवाभाव, प्रचंड गरिबी, अभावातील त्यांचे जगणे पाहताना या मुलीच्या मनाला चटका लावून गेले ते तेथील मुलांचे भविष्याचे विचार. एकतर शाळेत जातच नसणारी आणि जात असली तरी अक्षर ओळखही नसणारी ही मुले. यांचे भविष्य काय असेल? कशी जगतील ही? प्रश्न तर मोठेच पडले. साधारणपणे परिक्रमा, यात्रा वगैरे करताना असे विचार बरेच जण करत असतील. परंतु स्मशान वैराग्य जसे अल्पकालीन असते तसे हे विचारही आपल्या आपल्या पूर्वायुष्यात आल्यावर सहज उडून जातात. हा स्वानुभव ही आहे.
ही मुलगी याला अपवाद ठरली. उचललेली परिक्रमा पूर्ण करून आपल्या शहरात परत येईपर्यंत एक निश्चित विचार हिच्या मनात तयार झाला होता. आल्यावर आधी नोकरीचा राजीनामा दिला. त्याची सर्व नियमानुसार पूर्तता केली. बाकी घरची व्यवस्था लावली आणि दोन कपडे आणि अगदीच आवश्यक गोष्टी बॅगेत टाकून ही मुलगी मध्यप्रदेश मधील लेपा मध्ये येऊन पोहोचली. कोणतीही पूर्व यथायोग्य व्यवस्था नव्हती, कोणी खंबीर आधार नव्हता केवळ आणि केवळ अंतर्मनाच्या हाकेला ओ देऊन ती इथे आली.
अतिशय लहानसे खेडे, तिथे राहून काय काय या मुलीने केले, स्थानिक लोकांच्या मनात स्वतः बद्दल कसा विश्वास निर्माण केला, किती काय कसे प्रयत्न केले हे सगळे प्रत्येकाने निदान जाणून घ्यावे, वाचावे एव्हढे नक्की. तर या अथक प्रयत्नातून उभे राहिले “नर्मदालय”.
आज दीडशे मुले तिथे राहत आहेत. त्यांचे संगोपन ही मुलगी करते आहे. या जगावेगळ्या मुलीचे नाव आहे पूर्वाश्रमीची भारती ठाकूर आणि संन्यास स्वीकारल्यानंतर “परिव्राजिका विशुध्दानंदा”.
या नर्मदालयात फेब्रुवारी महिन्यात नर्मदा जयंतीनिमित्त नर्मदा महोत्सव असतो. भारती ताईची पुस्तके वाचल्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष जावे अशी इच्छा मनात जागी झाली होती. या कारणाने तिकडे जायचे ठरवले. प्रख्यात विदुषी धनश्री ताई लेले यांच्याशी एक स्निग्ध नाते जुळले आणि त्यांच्या निमित्ताने छान सुहृद मंडळी आयुष्यात आली. माझे आजवरचे जगणे एका वेगळ्याच टप्प्यावर गेले असे मी आनंदाने म्हणेन. अशा पंधरा सोळा जणांच्या गोतावळ्यासोबत प्रस्थान ठेवले.
जरी पुस्तक वाचले होते तरी येणाऱ्या दोनतीनशे पाहुण्यांची व्यवस्था कशी काय होईल याबाबत मन साशंक होतेच. नर्मदालयात रोज राहणारे दीडशे आणि हे पाहुणे. पाहू आता जे जसे होईल तसे चालवू, असाच विचार करून आले मी. रात्री नऊच्या नंतर आम्ही बसने पोहोचलो. व्यवस्थित रजिस्ट्रेशन काउंटर होता. तिथे नोंदणी करून सुरुवात होणार होती, पण चला आता आधी गरम जेवा, मग करा हे काम असा प्रेमळ आग्रह झाला. भव्य मंडपात ओळीने भोजनाची सुरेख व्यवस्था होती. टेबल खुर्च्या, स्वच्छ मांडणी आणि साधे स्वादिष्ट जेवण. सलामीच अशी दणदणीत झाली. आजूबाजूला आपोआप बघत होतो. मंडपा समोर सुरेख इमारत. त्याच्या अंगणात खुर्चीवर भारतीताई खुद्द जातीने व्यवस्थेवर लक्ष ठेवून होत्या. आलेले सर्वच त्यांना भेटायला जात होते. आपुलकीने चौकशी होत होती. प्रत्येकजण भारावून जाताना पुढील चार दिवस मी रोज पाहिला. चारही दिवस तिन्ही त्रिकाळ खानपान व्यवस्था उत्तम होती.
रजिस्ट्रेशन करताना प्रत्येक अभ्यागताला बिल्डिंग आणि खोली नंबर दिला गेला. ओळखपत्र मिळाले. आमच्या खोलीत पोहोचल्यावर पंधरा जणांची छान सोय दिसली. प्रत्येकी कॉट, गादी, उशी आणि मध्यप्रदेशच्या थंडीत निभाव लागेल अशी ब्लँकेटस, चार्जिंग पॉइंट्स, पंखे अगदी विचारपूर्वक केलेली व्यवस्था. इतकी खरंच अपेक्षाच केली नव्हती. शेजारी स्वच्छ बाथरूमस्.
दुसऱ्या दिवशी पासून असणाऱ्या कार्यक्रमांचे वेळापत्रक रूम बाहेर दर्शनी होते. कुठेही गोंधळ नाही. नाश्ता करून सत्र सुरू होत. तीनही दिवस धनश्री ताई लेले, शरद पोंक्षे, उदय निरगुडकर, ऐवज भांडारे अशा मातब्बर व्यक्तींची भाषणे/ कीर्तन होते. आपापल्या विषयातील उत्तम अनुभव त्यांनी आम्हाला घडवला. घडवला असेच म्हणेन कारण उदाहरणार्थ सांगायचे झाले तर नामदेव यांच्याविषयी धनश्री ताई अशा समरसून बोलल्या की खरंच मुक्ताबाई सूनावते आहे त्यांना आणि नामदेव विठ्ठलाच्या पायाशी जाऊन बसलेत, दिसूच लागले जणू. चांगदेव महाराजांना, ” अजून गेलाच नाही का रे भेद तुझ्या मनातला?” विचारणारी धिटुकली, ज्ञानी मुक्ती भिडलीच आम्हाला. हे सगळे होतेच तिथे. त्याचा सर्वोत्तम आनंद घेतलाच पण त्याशिवाय जे मिळाले ते शब्दात पकडण्याचा प्रयत्न करते आहे.
– क्रमशः भाग पहिला
लेखिका : वर्षा कुवळेकर
संग्राहिका : डॉ. शुभा गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈