डाॅ. शुभा गोखले
इंद्रधनुष्य
☆ हृदयस्पर्शी भाग – २ – लेखिका : वर्षा कुवळेकर ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆
प्रास्ताविक करताना नर्मदालय काय आहे हे स्वतः भारती ताईंनी सांगितले. सुरुवात कशी झाली, घटनाक्रम कसा होत गेला, आज काय आहे आणि भविष्यातील उद्दिष्टे काय डोळ्यासमोर आहेत हे मितभाषी ताईंनी अगदी नेमक्या शब्दात जरी सांगितले तरी प्रत्यक्ष तिथे असल्यामुळे तो प्रचंड आवाका मला जाणवत गेला. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या मुलीला आजूबाजूचे लोक पाहत होतेच पण एका नागा साधूने ताईंच्या कामाची विशेष दखल घेतली . स्वतः हुन या साधुबाबा नी आपली पाच गुंठे जमीन दान केली. नवल वाटून ताई म्हणाल्या ,” मला नाही गरज,” तेव्हा साधू म्हणाले ,” तुला नाहीच देत मी जमीन, ज्या छोट्या मुलांसाठी तू काम करते आहेस त्यांच्यासाठी देतोय.” एक महान काम उभे राहायची ती सुरुवात होती. खडबडीत जमिनीवर झोपडीत ही राहणाऱ्या ताईंनी कष्ट सुरू केले. ते पाहून लोकाश्रय मिळाला. आजवर कोणतीही सरकारी मदत न घेणाऱ्या या संस्थेने महान काम करून दाखवले ते केवळ कष्ट, तळमळ, प्रामाणिक व्यवहार या जोरावर. समविचारी लोक मदतीला उभे राहिले. आज चार मोठ्या इमारती उभ्या आहेत, पाचवी तयार होते आहे. शिक्षणाची वेगवेगळी दालने त्यातून सज्ज झाली आहेत. सरकारी अभ्यासक्रम तर आहेच पण स्वावलंबी करणारे शिक्षण प्रामुख्याने दिले जाते आहे. छोट्या छोट्या मुलांची जबाबदारी घेणारी ही एक भगव्या कफनीतील तपस्विनी किती विलक्षण खंबीर आहे हे मला आत कळत गेले. एका जंगलात राहून असंख्य अडचणीला तोंड देणारी, छोट्या मुलांना उराशी कवटाळून त्यांना सुरक्षित आयुष्य देणारी ही स्त्री मनाने किती हळवी आहे हे त्यांचे मनोगत ऐकताना प्रकर्षाने जाणवले. त्यांचा दिग्विजय, गोलू, शंकर, जितेन अशी मुले काय काय करतात हे त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळाले. लहान लहान सात आठ वर्षांची ही मुले ताईंना मिळाली. आज विशी बाविशितील ही मुले हे चमत्कार आहेत. गोलू तेरा चौदा वर्षाच्या मुलांना मदतीला घेऊन इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या मंडळींचे नाश्ता, जेवण तयार करत होता. ही मुले गोशाळा सांभाळतात, दैनंदिन व्यवहारात संपूर्ण मदत करतात, छोट्या मुलांची सगळी जबाबदारी पेलतात. एव्हढे काहीच नाही तर नवीन इमारतीतील तेवीस टॉयलेट्स या मुलांनी स्वतः केली. टाइल्स बसवल्या प्लंबिंग पूर्ण केले. . सायन्स मधील वेगवेगळी आव्हाने मुले स्वीकारत आहेत. टाटा, बी ए आर सी , व्ही एन आय टी सारख्या संस्थांनी यांच्या कामाचे कौतुक करून त्यांच्या संस्थेसोबत affiliation आनंदाने दिले आहे. रुरल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट यातून अनेक नवीन प्रशिक्षणे सुरू आहेत. व्यवसायाभिमुख शिक्षण कसं असावं ते ताईंनी प्रत्यक्षात आणले आहे. आज ही मुले निश्चित पायावर खंबीर उभी होत आहेत.
हे सगळे सांगत असताना गेल्यावर्षी म्हणजे सप्टेंबर 2023 ला आलेल्या पुरात या आठ दहा मुलांनी अतुलनीय साहस दाखवून जे काम केले ते सांगताना भरती ताई सद्गदीत झाल्या. गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवणे, त्यांची सर्व व्यवस्था हे झालेच परंतु लेपा पासून आठ दहा किमी वर भट्ट्याण येथे आणखी एक आश्रम शाळा तिथल्या मुलांसाठी सुरू केली आहे. निवासी मुलं नाहीत तिथे तरी जवळपास एकशे सत्तर मुलं शिकायला येतात. ती शाळा नदीच्या पात्रापेक्षा भरपूर उंचीवर असूनही अतिरेकी पावसाने धोक्यात आली. एखादा फूट अजून चारी बाजूंनी माती ढासळली असती तरी शाळा धाराशायी झाली असती. मुलांना तिथे पाठवणे अजिबातच सुरक्षित नव्हते. ही शाळा वाचवण्यासाठी या लहान मुलांनी स्वतः च्या जीवावर उदार होवून पंधरा दिवसरात्र जे काम यशस्वी पणे करून दाखवले त्याबद्दल बोलताना ताईंनी प्रयासाने हुंदका आवरला. हे सारे ऐकताना आधी एका बोटाने डोळ्यातले पाणी थोपवणारे आम्ही अनावर होऊन डोळ्यांना रुमाल लावून बसलो. या मुलांना सर्वांच्या साक्षीने शौर्य पुरस्कार दिले. किती कौतुक करावं हो, शब्द थिटे आहेत.
कोणताही क्लास, शिकवण्या न लावता 92 @% मार्कस मिळवणाऱ्या मुलांचे कौतुक झाले. धनश्री ताई ऑनलाईन संस्कृत शिकवत होत्या . त्याचे चीज 99 मार्क या विषयात मिळवून मुलांनी करून दाखवले. एक मुलगा तर फक्त संस्कृत विषयात पास झाला.हे ऐकून तर फारच विशेष वाटले. एखादा शिक्षक आवडला तर काय आश्चर्य घडू शकते त्याचे हे द्योतक आहे. मला स्वतः ला एक सत्कार विशेष हृद्य वाटला. एक सातवी मधील मुलगा . त्याला मंचावर बोलावले. ताई म्हणाल्या हा माझा विशेष आवडता मुलगा. एका दूरवरच्या खेडेगावात डोंगरावर याचे एकट्याचे घर आहे. कमालीची गरिबी. ताईंजवळ असतो. अभ्यासात अजिबात गती नाही . तो आपणहून गोशाळेत कामाला पळायचा. दिवस दिवस तिथेच. त्याच्या शिक्षकांवर ताई नाराज झाल्या , की आधीच तो अभ्यासात बरा नाही त्याला कशाला तिकडे पाठवता? ते सगळे म्हणाले आम्ही नाही duty दिली तो आपणच जातो. गोशाळा आणि स्वयंपाकघर ही त्याची आवडीची ठिकाणे . इथेच तो रमतो. हे जाणून ठीक आहे, हे कर तू, पण अभ्यास ही करायला हवास हे ताईंनी ठसविले मनात . आणि यंदा हा मुलगा सर्व विषयात 42/43 % मिळवून पास झाला. बेस्ट स्टुडंट चे पारितोषिक त्याला दिले. त्याच्याकडे बघून वाटले की इतक्या सर्वांसमोर माझा सर्वात आवडता मुलगा असं ताई म्हणाल्या, यापेक्षा इथून पुढे सर्वोत्तम होण्यास बळ मिळायला काय हवे ? 42 टक्के ही सन्मानाचे असू शकतात हा अनुभव श्रोत्यांना ही धडा होता.
नर्मदालयातील मुले उत्तम गातात, त्यांचा वाद्यवृंद आहे. त्यांनाही सुयोग्य व्यासपीठ मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जीवनाच्या सर्व अंगांना भिडायचे, यश मिळवायचे, आनंद घ्यायचा, द्यायचा किती किती गोष्टी सहज कृतीतून मुलं शिकत आहेत. शाळेतील सर्वात लहान मुले भारती ताईंच्या जवळ राहायला असतात. थोडी मोठी झाली की मोठे भय्या त्यांना सांभाळतात. एकही मूल केविलवाणे नाही. जशी आपली घरातील मुले तशी उत्साहाने निथळणारी, आनंदी मुलं. माझ्या नातवाशी फोनवर बोलायला बोलावले मी जवळ . खूप आनंदाने प्रत्येकाने आपली ओळख करून दिली. नंतर मलाही बिलगली ती . त्यांच्या डोक्यावरून हात फिरवताना इतके छान वाटले. छान तेल लावून भांग पाडलेली, तयार होऊन आली होती. जी ताई, जी ताई करून प्रेमानी आदराने बोलणारी ही मुले आमच्या मुलांनी, नातवंडांनीही पाहायला हवीत असं वाटले.
त्यांच्या दिग्विजयची दोन छोटी मुलं जन्मापासून तिथे आहेत. धाकटे पिल्लू सुध्दा मीठ वाढायला आले तर भरून आले एकदम. मोठा अभ्युदय ढोलकी वाजवतो. ढोलकी पेक्षा मूर्ती लहान आहे. पण त्या गाणाऱ्या चमूत आहे. सगळे बसलेत, भारती ताई एकेकाशी बोलत आहेत , मध्येच दिग्विजयचे शेंडेफळ जवळून दौडत जाते, सहज ताई प्रेमाने ओढून जवळ, मांडीवर घेतात. तेही पिल्लू आरामात त्यांच्या वक्षावर टेकून हातपाय उडविण्याचा आपला कार्यक्रम सुरू ठेवते हे माझ्या मनावर कोरले गेलेले दृश्य आहे, जे कधीही विस्मरणात जाणार नाही.
– समाप्त –
लेखिका : वर्षा कुवळेकर
संग्राहिका : डॉ. शुभा गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈