श्री प्रसाद जोग
इंद्रधनुष्य
☆ पहिली भारतीय रेल्वे ☆ श्री प्रसाद जोग ☆
१६ एप्रिल,१८५३ रोजी मुंबई ते ठाणे या ३४ किलोमीटर मार्गावर १४ डब्यांची पहिली रेल्वे गाडी चालवली गेली. आणि भारतीय रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरवात झाली.
ही गाडी ओढण्यासाठी साहिब, सिंध आणि सुलतान या नावाची तीन वाफेची इंजिने जोडली होती.या गाडीच्या पहिल्या वहिल्या प्रवासासाठी अख्ख्या भारतातून ४०० मान्यवर मुंबईला आले होते. या गाडीला मानवंदना देण्यासाठी २१ तोफांची सलामी देण्यात आली होती.
सामान्य माणसाला लांब पल्ल्याचा प्रवासासाठी आणि सामानाच्या वाहतुकीसाठी बैलगाडय़ातून प्रवास करावा लागत असे; ही;खडतर बाब ओळखून जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे यांनी देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या ध्यासापायी ग्रेट ईस्टर्न कंपनीची स्थापना १८४३ साली केली. या कंपनीचे कार्यालय गिरगावातील नानांच्या वाडय़ात होते. नानांच्या दहा वर्षाच्या अथक प्रयत्नांमुळेच १६ एप्रिल १८५३ दिवशी बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावरून केवळ भारतातलीच नव्हे, तर आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली. या उद्घाटन सोहळय़ाला प्रमुख पाहुण्यांचा व त्यामधुन प्रवास करण्याचा मान हा इंग्रजांनी नानांना दिलाच, पण त्याशिवाय प्रथम वर्गाचा सोन्याचा पास देऊन त्यांचा सन्मान देखील केला.तेव्हापासूनच नाना शंकरशेठ यांना भारतीय रेल्वेचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले. मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या (सीएसएमटी) प्रवेशद्वाराच्या भिंतीवरील नानां शंकरशेठांचा पुतळा त्यांची साक्ष देतो.
१६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईकरांचा गोंधळ उडाला होता. आज ते एक चमत्कार पाहणार होते. साहेबाचे पोर बिनबैलाची गाडी हाकणार होते. या दिवसासाठी मोठमोठे साहेब, स्थानिक लोक उपस्थित होते. १४ डबे आणि तीन महाकाय इंजिन असलेल्या या पहिल्या रेल्वे प्रवासाचा आनंद लोकांना मिळाला. आपापल्या दर्जानुसार लोक गाडीत बसले होते. नामदार यार्डली,जज्ज चार्लस् जॅक्सन तसेच नाना शंकरशेठ ही मंडळी उपस्थित होती.
आणि दुपारी ३.३० वाजता इतिहास घडला. तोफांची सलामी देण्यात आली. गार्डने शिट्टी वाजवून हिरवा बावटा दाखविल्याबरोबर त्या राक्षसी आकाराच्या तीन इंजिनांनी कर्णभेदी भोंगे वाजवले. त्या इंजिनांच्या धुरांचे लोळ ढगांप्रमाणे दिसत होते. काळे पोषाख घातलेले खलाशी इंजिनाच्या पोटात,फावड्याने कोळसा आगीत लोटत होते. त्या तीन राक्षसी अजस्र इंजिनांनी चमत्कार घडवला. ती गाडी चक्क पुढे जाऊ लागली. लोक बोलू लागले की, आपण पुराणकाळातल्या अद्भूत चमत्काराच्या गोष्टी नुसत्याच ऐकतो. पण आता कलियुगात इंग्रज त्या प्रत्यक्षात करून दाखवतात. इंग्रज म्हणजे देवाचा अवतार,अशी लोकांची समजूत झाली. परिणामी ते अद्भूत दृश्य पाहून लोकांनी हात जोडून लोटांगण घातले. गाडीचा वेग,शिट्ट्यांचा आवाज याने लोक भयचकित तर झालेच,पण गायी, बैल भेदरले आणि कुत्री पिसाळल्यासारखी भुंकू लागली .एकीकडे लष्करी बँडही वाजत होता. बैल-घोडयासारख्या जनावराकडून न ओढताच धावू शकणारे हे अजब यंत्र हा लोकांना चमत्कार वाटत होता.
सामान्य माणसे आगगाडीमध्ये बसायला घाबरायची.त्यांची भीती घालवण्यासाठी सामान्य नागरीकांनी प्रवास करावा म्हणून प्रवास करणाऱ्याला १ रु. बक्षीस देण्यात येईल हे जाहीर केले आणि लोक रेल्वेप्रवास करू लागले.
बोरीबंदर ते-ठाणे हे अंतर २१ मैलांचे (३४ किमी) आहे. हे अंतर कापायला गाडीने तब्बल १ तास १२ मिनिटे घेतली. यामध्ये गावागावात लोक तिच्या स्वागताला तयार होते. गाडी भायखळ्याजवळ आली तेव्हा तिच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती. लोक दाटीवाटीने गच्चीवर ,डोंगरावर उभे राहून या चमत्काराला नमस्कार करत होते आणि दुपारी ४.५८ वाजता गाडी ठाणे स्टेशनावर पोहोचली ,तेव्हा तिच्या स्वागतासाठी ठाण्यात भव्य शामियाना उभारण्यात आला होता. ठाणे रेल्वे स्थानकावरही ही गाडी पाहण्यास लोकांनी गर्दी केली होती. त्या काळी ठाणे स्थानक छोटं आणि कौलारू होतं. सर्व पाहुण्यांना शाही मेजवानी देण्यात आली. तेथे प्रतिष्ठितांची भाषणे होऊन संध्याकाळी ६.३० वाजता ठाणे सोडून बरोबर ५५ मिनिटांनी गाडी पुन्हा बोरिबंदर स्टेशनावर पोहोचली.
असा होता पहिल्या आगगाडीचा प्रवास. कोणत्याही चमत्काराला देवत्व बहाल करणा-या भारतीयांनी या गाडीचे नामकरण केले, ‘चाक्या म्हसोबा’. पहिल्या रेल्वे गाडीला १४ डबे होते. तिस-या वर्गाचे डबे फारच गैरसोयीचे होते. त्यात बसण्यासाठी बाकेच नव्हती. प्रवाशांना उभं राहूनच प्रवास करावा लागत होता. खिडक्याही इतक्या उंचीवर होत्या की, प्रवाशांना उभे राहिल्यानंतरही खिडकीतून बाहेरचे दृश्य दिसत नसे. त्यामुळे स्वाभाविकपणेच या गाडीला ‘बकरा गाडी’ असे संबोधले जात असे.
काळ बदलला तसे रेल्वेचे रूप बदलत गेले. एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्याचे साधन असलेल्या रेल्वेने ऐश आराम करण्यासाठी सुद्धा रेल्वे सुरु केल्या. सध्या भारतात अश्या ७ खास गाड्या चालवल्या जातात
१) महाराजा एक्सप्रेस
२) पॅलेस ऑन व्हील्स
३) रॉयल राजस्थान ऑन व्हील्स
४) दि गोल्डन चॅरिओट
५) डेक्कन ओडिसी
६.रॉयल ओरियंत ट्रेन
*७.फेयरी क्वीन एक्सप्रेस
स्वप्नवत वाटणारा जम्मू-बारामुल्ला रेल्वेमार्ग हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यात बांधला जात असलेला रेल्वेमार्ग प्रकल्प आहे. याचे अधिकृत नाव जम्मू उधमपूर श्रीनगर बारामुल्ला लोहमार्ग असून ह्याद्वारे काश्मीर खोरे उर्वरित भारतासोबत रेल्वेमार्गाने जोडले जाईल.
आता सुपर फास्ट रेल्वेचा जमाना आला. त्यातूनच राजधानी एक्सप्रेस,शताब्दी एक्सप्रेस या सुपरफास्ट गाड्या सुरु झाल्या. आता वंदे भारत या संपूर्ण भारतीय बनावटीच्या आधुनिक रेल्वे विविध मार्गावरून धावू लागल्या आहेत. कोलकात्यात हुगळी नदीखालून बोगदा निर्माण करून पाण्याखालून देखील भारतीय रेल्वे धावू लागली आहे. येत्या काही काळात बुलेट ट्रेन देखील सुरु होत आहे.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांना देखील या रेल्वेची भुरळ पडली, त्यांचे निरीक्षण देखील अफलातून, त्यातून त्यांनी ‘ काही अप्स आणि काही डाऊन ‘ ही भन्नाट गोष्ट लिहिली.
रेल्वे सुरु झाली आणि त्याची मोहिनी नंतर सुरु झालेल्या चित्रपट सृष्टीला पडली नसती तर नवलच.कितीतरी चित्रपटांच्या कथा रेल्वेला जोडल्या गेल्या. असंख्य गाणी रेल्वेवर लिहिली गेली .
मधू दंडवते यांनी कोकण रेल्वेचे स्वप्न उरी बाळगले होते , त्यासाठी त्याचा पाठपुरावा करत होते आणि शेवटी सगळ्या आडचणींवर मात करत कोकण रेल्वे सुरु झाली आणि या कोकण गाडीवर गाणे देखील लिहिले गेले.
आली कोकण गाडी दादा, आली कोकण गाडी
भारतीय रेल्वेने त्यांचे गाणे तयार केले, उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी ते गायले आहे.
१७० वर्षाच्या इतिहासात दिवसेंदिवस रूप बदलणाऱ्या भारतीय रेल्वेच्या महाकाय जाळ्याला सलाम ,सलाम,सलाम !! .
© श्री प्रसाद जोग
सांगली
मो ९४२२०४११५०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈