श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘शिवथर घळ’ … लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

एकदा सहज म्हणून शिवथर घळीत गेलो होतो. राहायला नेहेमी मिळते तशी मोफत खोली मिळाली… आज फारसे भाविक नसल्याने व्यवस्थापकांनी अजून कुणाला तरी माझ्याच खोलीत विनंती करून राहावयास पाठविले. एक चांगली जाडजूड वजनदार सॅक घेऊन एक चाळिशीच्या पुढचे गृहस्थ आत आले ! “हाय ! मी भोपळे !” ओळख करून दिली गेली. मनुष्य पेहेरावावरून मॉडर्न वाटत होता… इतक्यात त्यांनी पँटच्या खिशातून खचाखच भरलेल्या  काही इक्विपमेंट्स काढून टेबलावर मांडली… माझी उत्कंठा ताणली गेली.. “हे काय आहे ?” “ही जीपीएस मशीन्स आहेत … डू यू नो व्हॉट जीपीएस इज ?” 

माझ्यातला सुप्त शास्त्रज्ञ जागा होऊ लागला ! “येस, आय नो… पण आपण इतकी सारी जीपीएस यंत्रे का वापरता ?” हसत हसत ते म्हणाले “मी जीपीएस व्हेंडर आहे. माझा तो व्यवसायच आहे ” असे म्हणत त्यांनी माझ्या उत्कंठित चेहर्‍यावरचे भाव ओळखत लॅपटॉप बाहेर काढला आणि म्हणाले – “हे जे प्रेझेंटेशन आहे जे मी आता तुम्हाला दाखविणार आहे याचे मी बाहेर किमान ५-५० हजार रुपये घेतो ! पण तुम्ही समर्थ भक्त आहात म्हणून तुम्हाला हे ज्ञान मोफत !” असे म्हणत त्यांनी सुमारे एक तास अतिशय सखोलपणे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम अर्थात जीपीएसची इत्थंभूत माहिती मला सांगितली … ज्ञानात चांगलीच भर पडली ! आता तुम्ही म्हणाल याचा आणि शिवथर घळीचा काय संबंध ? मलाही तोच प्रश्न पडला ! पण खरी गंमत तर पुढे आहे ! वाचत रहा !

भोपळे म्हणाले “चलो यंग मॅन, आता थियरी खूप झाली, आता थोडे प्रॅक्टिकल करूयात…” असे म्हणत ती सर्व यंत्रे घेऊन आम्ही बाहेर आलो… उघड्या आकाशाखाली…  कारण जीपीएसला ओपन स्काय अर्थात खुले आकाश लागते ! त्या आकाशातील उपग्रह या आपल्या हातातील यंत्राला त्याची पोझिशन, स्थान सांगत असतात ! आता माझी परीक्षा सुरु झाली !

भोपळे : बरं, वर पहा, किती डिग्री आकाश खुले आहे ?

मी : “९० तरी असेल.”

भोपळे : “गुड.. मग मला सांगा आता या स्पेस मध्ये साधारण किती सॅटेलाईट्स असतील ?”

मी : “तुम्ही मघाशी सांगितलेत त्याप्रमाणे ३० एक तरी असावेत.”

भोपळे: “करेक्ट! लेट्स व्हेरीफाय !”

असे म्हणत त्यांनी जमिनीवर मांडलेली सर्व यंत्रे एक एक करत सुरू केली. कुणी २० उपग्रह पकडले (उपग्रहांची रेंज पकडली), कुणी २४, कुणी २८… नियमानुसार २४ उपग्रह असतील तर एक मीटरपर्यंत अचूक स्थान सांगता येते तसे त्या यंत्रांनी सांगितलेही !

भोपळे :” मी जगभरातील अनेक देश फिरलोय… सगळीकडे या यंत्रांचे असेच बिहेवियर असते”. आता मात्र मला रहावेना. मी म्हणालो – “भोपळे सर, आपण इतके उच्चशिक्षित आणि शास्त्रसंपन्न आहात तर या इथे खबदाडात, खनाळात कसे काय वाट चुकलात ?”

“तीच तर गंमत आहे!” भोपळे हसत हसत म्हणाले – “इथे रायगड पोलीस स्टेशनच्या वायरलेसचे काम करायला आलो होतो. म्हणजे सर्वेक्षणच होते .. आणि अचानक एक चमत्कार गवसला !”

मी अति उत्सुकतेने ऐकत होतो !

“डू यू वाँट टू विटनेस इट ? या माझ्या सोबत !” असे म्हणत ते मला शिवथर घळीच्या तोंडापाशी घेऊन गेले. 

भोपळे : “वर पहा, किती आकाश आहे ?”

मी :” ७० अंश तरी आहेच आहे.”

भोपळे :” मग किती उपग्रह दिसावेत ?”

मी : निदान २०-२५ ?

भोपळे : “करेक्ट, नाऊ लेट्स चेक…” असे म्हणत त्यांनी पुन्हा सर्व यंत्रे खुल्या आकाशाखाली मांडून सुरू केली … आणि काय आश्चर्य ! जर्मन, चायनीज, जपानी, अमेरिकन, ब्रिटिश, कोरियन अशा सर्व बनावटीच्या एकाही यंत्राला एकाही उपग्रहाची रेंज येईना ! चमत्कारच हा ! उपग्रह नजरेच्या टप्प्यात होते ! पण यंत्रांना मात्र सापडत नव्हते. म्हणजे त्या घळीभोवती असे काहीतरी क्षेत्र होते जे उपग्रहांच्या फ्रिक्वेन्सीज खाली पोहोचूच देत नव्हते !

भोपळे म्हणाले “पूर्ण जग फिरलो परंतु absolutely frequency less अशी केवळ हीच एक जागा पाहिली !” …. आणि मग मला समर्थांच्या शिवथर घळीचे वर्णन करणा-या ओळी झर्रकन स्मरल्या !

…. ‘ विश्रांती वाटते येथे। यावया पुण्य पाहिजे !! ‘                                      

विश्रांती ! शांतता ! कंपनरहित अवस्था ! निर्विचार स्थिती ! अशा स्थितीत केवळ आपल्याच मनातले विचार ऐकू येणार ! त्यात भेसळ होणे नाही ! आणि म्हणूनच समर्थांनी दासबोध लिहायला ही जागा निवडली असणार ! …. म्हणूनच हा ग्रंथ शुद्ध समर्थांचाच आहे !

अंगावर काटा उभा राहिला, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या… भोपळेंचे मनापासून आभार मानत घळीत पाय ठेवला… समर्थांच्या पायावर लोटांगण घातले… आज तिथे भासणारी शांतता अधिक खोल होती… अधिक गंभीर होती… अधिक शांत होती ! भ्रांत मनास विश्रांती खरोखरीच वाटत होती !

आधुनिक विज्ञानास जे गवसले ते माझ्या या माऊलीला ४०० वर्षांपूर्वीच केवळ अंतःस्थ जाणीवेने समजले होते !

दासबोधाचे जन्मस्थान म्हणजे रायगडाजवळील शिवथरची घळ हे समीकरण आता सर्वांनाच माहिती आहे ! परंतु ही अद्भुत घळ आपण प्रत्यक्षात पाहिली आहे का हो ? नसेल … तर अगदी अवश्य पहा ! आणि सर्वांना सांगा !

!! जय जय रघुवीर समर्थ !! 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments