?इंद्रधनुष्य? 

☆ जेव्हा टायटॅनिक स्वत: आपली दिशा बदलू पाहतं – सुश्री मनीषा कोठेकर☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

स्त्रियांच्या  स्थितीत बदल होऊन आपण खूप पुढे आलो आहोत.तरी देखील  अजून स्त्रियांचे प्रश्न सुटले आहेत असे म्हणता येत नाही. नवनवीन समस्या आपल्यासमोर येतच आहेत. अशावेळी आजच्या  स्त्रीची नेमकी स्थिती काय हे जाणून घेणे याची गरज भासते.

समाज हे एका अर्थी टायटॅनिक सारखे अवाढव्य आकाराचे जहाजच. त्याची दिशा बदलायची तर बाहेरून  खूप मोठी शक्ती(external force ) लावायला हवी. मात्र ज्यावेळी टायटॅनिकच्याच प्रत्येक कणाला आपली दिशा बदलावी असे वाटते व ते सर्व मिळून प्रयत्न करतात तेव्हा कुठल्याही बाह्यशक्ती विनाही हे सहज शक्य होऊ शकतं.

असाच एक प्रयोग महिलांसंबंधीच्या अध्ययनाबाबत झाला . ‘भारतातील महिलांची स्थिती ‘ हे  भारतातील महिलांच्या स्थितीचा वेध घेणारे  देशव्यापी अध्ययन नुकतेच महिलांच्या संबंधी कार्य करणा-या ‘दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र’ द्वारा करण्यात आले.  

भारत हा सर्वदृष्टीने विविधतेने नटलेला देश. संस्कृती, भाषा, शैक्षणिक -सामाजिक -आर्थिक स्थिती, समस्या या सगळ्यांच्या वेगवेगळया. अशा वेळी महिलांच्या स्थितीचे आकलन करावयाचे म्हणजे सगळ्या प्रकारच्या स्थितीतील महिलांपर्यंत पोहोचणे व त्यांची स्थिती जाणून घेणे गरजेचे होते. शिवाय अशाप्रकारचे अध्ययन  खूप काळ सुरू राहिले तर ते कालबाह्य किंवा असंगत होऊ शकते .त्यामुळे कमीत कमी वेळात एवढे प्रचंड मोठे सर्वेक्षण करावयाचे तर त्यासाठी तेवढेच मनुष्यबळही गरजेचे. आज भारतातील विविध संघटनांमध्ये कार्यरत  महिला कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड आहे. या कार्यकर्त्यांनी निर्णय केला की आपण हे काम करावे. यापैकी अनेक संघटनांचे कार्य देशव्यापी आहे, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून देशातील कानाकोपऱ्यात पोहोचून महिलांची स्थिती व त्यांच्या समस्या जाणून घेणे शक्य होते.

शिवाय कार्यकर्त्यांच्या द्वारे सर्वेक्षण होणार म्हटल्याने त्या क्षेत्राची त्यांना नीट माहिती होती. स्थानिक कार्यकर्ते असल्याने भाषेचा अडसर नव्हता. या सगळ्यांनी हा अध्ययनाचा ‘द्रोणागिरी पर्वत’ उचलून धरला.

अध्ययनाचे केंद्र नागपूर ठरले.वेगवेगळया प्रकारच्या समित्या ठरल्या. प्रकल्प संचालक म्हणून डॉ.मनीषा कोठेकर वर जबाबदारी दिल्या गेली. एक तज्ञांची एक केंद्रीय समिती स्थापण्यात आली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात आले.

देशभरात सर्व २९ राज्ये व ५ केंद्रशासित प्रदेश व ६४%  जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण झाले.यात आंतरराष्ट्रीय सीमावर्ती जिल्हे देखील मोठ्या प्रमाणात होते.  साधारण ६००० महिला कार्यकर्त्यांनी यात भाग घेतला. ८०,०००हजाराच्या जवळपास महिलांच्या मुलाखती घेऊन सर्वेक्षणाचे काम पूर्ण केल्या गेले.

२०१६ मधे अध्ययनासंबंधी निर्णय झाला व १७ मधे कामाची पूर्ण आखणी होउन १८ मधे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले.त्यानंतर डाटाएन्ट्री , त्याचे विश्लेषण ,रिपोर्ट लिहिणे व छपाई हे संपूर्ण काम नागपूरातून झाले.२४ सप्टेंबर २०१९ला दिल्लीला प.पू.सरसंघचालक मा.मोहनजी भागवत,मा.निर्मला सितारामन व मा.शांताक्काजींच्या प्रमुख उपस्थितीत या अध्ययनाचे दोन खंड,executive summery व महिलांच्या  विशिष्ट स्थितीवरील अध्ययनावरील २६ पुस्तकांचे विमोचन झाले.

महिलांना जेव्हा आपली स्थिती बदलावी असं स्वत: वाटतं व त्या एकसुराने आणि  एकदिलाने काम करायचे ठरवतात तेव्हा स्थिती बदलण्याच्या दिशेने त्यांनी टाकलेले ते दमदार पाऊल असतं अन् मग त्यांना त्यांच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी कुणीही थांबवू शकत नाही .

ले. : मनीषा कोठेकर

संग्राहक : सुनीत मुळे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments