श्रीमती अनुराधा फाटक
प्रकाशित साहित्य – बालसहित्य- कथा संग्रह 18, किशोर कादंबरी 3, काव्यसंग्रह 2,
संकीर्ण 1
प्रौढ साहित्य – काव्यसंग्रह 3, कथासंग्रह 12,कादंबरी 11, वैचारिक 11
पुरस्कार 18
☆ इंद्रधनुष्य : कासव …. ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆
कासव!
समुद्रमंथनाच्या प्रसंगी मंदार पर्वताला आधार देण्यासाठी भगवान विष्णूनी कूर्मावतार- कासवावतार घेतला होता. त्या प्रसंगाचे प्रतिक म्हणून बहुतेक देवालयात, सभामंडपात किंवा अन्यत्र दगडात कासवाची आकृती खोदलेली दिसते. उंच शिखरयुक्त मंदिर म्हणजे मंदार पर्वत होय. त्याला आधारभूत म्हणून कासव रुपात विष्णूची प्रतिमा असते. देवत्व प्राप्त झालेले हे कासव लहान मुलांना प्रिय असते.
मंद चालीच्या कासवाची आणि सशाची पैज लागली असता गडबडीने धावणाऱ्या सशाने फाजील आत्मविश्वासापोटी विश्रांती घेतली आणि तोवर कासव पुढे गेले.गडबडून जाऊन स्वतःची फजिती करून घेण्यापेक्षा विचारपूर्वक केलेले काम कासवाप्रमाणे यशस्वी हो कितीही संकटे आली तरी सर्व संकटांना खंबीरपणे तोंड देऊन यशस्वी होणारी माणसं कासवाच्या पाठीची असतात मात्र अशा कासवाच्या पाठीच्या माणसांना थोडीसुद्धा कासवदृष्टी म्हणजे दया नसते, तर कासव पाठीप्रमाणं ही माणसं कठीण,कठोर अंतःकरणाची असतात.संतानी मात्र सर्वांकडे कासव दृष्टीने म्हणजे दयाळू अंतःकरणाने पाहिले.
पाण्यात व पाण्याबाहेर रहाणाऱ्या कासवाच्या पाठीचा उपयोग ढालीसारखा होत असे त्यामुळे पाठीची ढाल करणे म्हणजे संरक्षणासाठी लढणे हा वाक्प्रचार रूढ झाला असावा.
कासवाच्या पाठीपासून विविध वस्तू बनवितात.कासवाच्या पाठीसारखे टणक असणारे शिवधनुष्य सीतास्वयंवरात ‘पण ‘ म्हणून ठेवले होते.’ बहु कठो म्हणे धनु जानकी, निपट कासव पृष्ठ समानकी l असा उल्लेख सीतास्वयंवरात आढळतो.
आयुष्याच्या शेवटच्या क्षणी माणसाची सर्व गात्रे आवळली जातात.सर्व कारभार आटोपतो त्याला ‘ कासवासमान ‘ गाड्डा( गात्रे) आवुळली म्हणतात.
एखादा श्रीमंत माणूस अडचणीत असताना दुर्दैवाने त्याला गरिबाला जामीन रहाण्यासंबंधी विनंती करावी लागते.अशा अवस्थेला कोकणी भाषेत ‘ कासवाक कोंबो जमान ‘म्हणतात.
कासवाच्या पिलाची भूक कासवाच्या प्रेमळ नजरेने भागते असे म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात,’ कासवाचे बीळ आहे कृपादृष्टी ,दुधा नाही भेटी अंगसंगे। ‘
सशाच्या शिंगाप्रमाणेच कासवाचे तूप ही गोष्ट असंभवनीय असल्याने,जेव्हा असंभवनीय गोष्टीबद्दल चर्चा होते,तेव्हा तो प्रकार म्हणजे कासवाचे तूप आणण्याचाच प्रकार होतो.
कासवाच्या पाठीचा उपयोग पोटातले म्हणून जो रोग होतो त्यावर औषधासारखा होतो तर बस्तीप्रदेश ताणला जाऊन त्याच्याअंगी जे कठीण्य येते त्याला ‘ कासव्या रोग ‘ म्हणतात.
कासव काशिंदा या प्रकारचे एक झुडुप असून तरवडापेक्षा त्याची पाने बारीक असतात.
हातास किंवा पायास पाणी असलेला जो फोड होतो त्याला कासवफोड’ म्हणतात.प्रामुख्याने काटा टोचल्याने जे कुरुप होते त्यास ‘ कसवकुरुप’ म्हणतात.
पाण्यात राहून माशाशी वैर न करता पाण्यातील घाण खाऊन पाणी स्वच्छ करून प्रदूषणाचा समतोल राखणारे कासव आजही देवपण टिकवून आहे.
© श्रीमती अनुराधा फाटक
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
आज कासवाचा खरा शोध लागला.??
खूप छान माहिती मिळाली.
अच्छी रचना