सुश्री वर्षा बालगोपाल
इंद्रधनुष्य
☆ “मदारी… एक बोधकथा…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
एक मदारी असतो. तो आपल्या माकडाला घेऊन गावोगावी फिरायचा, माकडाचे खेळ करून दाखवायचा आणि त्यातून येणाऱ्या पैशातून आपला उदरनिर्वाह करायचा.
ते माकड सुद्धा अगदी छान काम करायचे. कोलंट्या उड्या मारायचे, पाणी आणून द्यायचे आणि मालक सांगेल तसे सगळे काम करायचा. त्याने त्या माकडाचे नाव रघुवीर ठेवले होते.
सगळे त्याला म्हणतात अरे याचे नाव रघुवीर का ठेवलेस? हे तर श्री रामांचे नाव आहे ना? याचे नाव हनुमान, मारुती असे काही तरी ठेव.
यावर त्या मदाऱ्याने खूप छान उत्तर दिले. तो म्हणाला कामात राम असतो. मग माझे माकडाचे खेळ करून दाखवणे हे काम म्हणजे रामाचे झाले ना? दुसरे असे की त्या निमित्ताने माझ्या तोंडून श्रीरामाचे नाव दिवसातून 1000 वेळा तरी घेतले जाते. तेवढाच रामाचा जपही होतो आणि श्रीरामाचे स्मरणही होते.
मग श्रीरामाचे स्मरण करणारा मीच हनुमान होतो. मग मला आठवतात हनुमंताच्या लीला आणि त्या लीला मी माझ्याशी पडताळून पहातो.
मग हनुमानाने सीता माईने घातलेल्या मोत्याच्या माळेत श्री राम आहेत का ते बघितले होते तसे मी या रघुवीरला सांगितलेल्या कामात राम शोधतो आणि मला तो गवसतो. जर गवसला नाही तर मग माझे काही चुकले आहे असे मला समजते आणि मी ते सुधारतो आणि मग मला माझा राम सापडतो.
हनुमानाने आपली छाती फाडून तेथे श्री राम वास करत असल्याचे दाखवले होते. मला खात्री आहे मी माझ्या कामाप्रती श्रद्धा ठेवली असल्याने आणि माझे काम हे ईश्वराचे काम मी मानत असल्याने माझ्याही ह्रदयात श्रीराम वास नक्कीच आहे.
हनुमंताने श्रीरामाची सेवा मनोभावे केली तशी मी माझ्या या रघुवीरची करतो. त्याने दिवसभर माझे काम केले असले तरी मी रात्री त्याचे पाय चेपतो, त्याला चांगले न्हाऊमाखू घालतो आणि हो मला स्वतःला मी कपडे नाही घेतले तरी मी नेहमी याच्यासाठी नवे कपडे घेतो. अशी मी त्याची सेवा माझा राम म्हणून करतो.
मला खात्री आहे की तुम्ही कोणतेही काम करत असाल तर ते काम ईश्वराचे काम समजून केले, आपल्या कामाबद्दल निष्ठा आणि श्रद्धा ठेवली, आपल्या मालकावर पूर्ण विश्वास ठेवला तर कोणत्याही कामात सफलता मिळाल्या शिवाय राहणार नाही. तुमच्या बाबतीत चांगले घडल्या शिवाय राहणार नाही.
श्रद्धा असेल तर भक्ती नकळत होते आणि अशी निस्वार्थ, निष्काम भक्ती केली तर तुमचे चांगलेच होणार.
आयुष्यात राम मिळावा असे वाटत असेल तर तुम्ही हनुमान व्हायला पाहिजे.
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈