श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ पठाण, गुलाम आणि सम्राज्ञी… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
चित्रपट संगीत श्रोत्यांच्या डोईवरचं ‘पठाणी’ कर्ज आणि आपल्याला स्वर‘सम्राज्ञी’ देणारा ‘गुलाम’!
संगीतातील ताल स्वरगंगेच्या प्रवाहावर स्वार होऊन स्वत:ला व्यक्त करीत राहतो. जाणकार म्हणतात की, ताल म्हणजे काल, मार्ग, क्रिया, अंग, ग्रह, जाती, कला, लय, यती व प्रस्तार अशा दहा प्राणांनी व्याप्तमान ठेका होय. आपल्या भारतीय शास्त्रीय संगीत मूळ बारा स्वरांच्या अंगाखांद्यावर क्रीडा करीत असते. परंतू प्रत्यक्षात आपल्या कर्णपटलांना अलगद स्पर्शून जाणिवेच्या पृष्ठभागास श्रवणाची अनुभूती देणारे नाद एकूण बावीस आहेत, असं म्हणतात. सर्वपरिचित सारेगमपधनी हे सप्तशुद्ध आणि रे, ग, ध, नी हे कोमल स्वर आणि तीव्र स्वर म्हणजे म! पण या द्वादश-स्वरांच्या अंतरंगात आणखी खोलवर बारा स्वरकमलं असतात. स्वरांच्या या खोल डोहात सहजी ठाव घेऊन पुन्हा श्वास राखून गाण्याच्या पृष्ठभागावर येणं फक्त एकाच मानवी कंठाला शक्य झालं… तो कंठ म्हणजे लता मंगेशकर यांचा कोकिळकंठ! लता शब्द उलट्या क्रमानं म्हणला तर ताल बनून सामोरा येतो !
हा ताल आणि ही स्वरलता रसिकांच्या हृदयउपवनातील एखाद्या डेरेदार वृक्षाला कवेत घेऊन आभाळापर्यंत पोहोचली असतीच केव्हा न केव्हा तरी. जसे कृष्णपरमात्मा धर्मसंस्थापनार्थाय कुणाच्या न कुणाच्या पोटी जन्मायचेच होते….. देवकी निमित्त्त झाल्या आणि यशोदा पालनकर्त्या !
विपरीत कौटुंबिक परिस्थितीमुळे लतादीदींना मुंबईत येणं भाग पडलं. आणि मनाविरुद्ध अभिनय करावा लागला. मनात गाणं असतानाही पोटातलं भुकेचं गाणं वरच्या पट्टीतलं होतं… त्यामुळे वीजेच्या प्रखर दिव्यांसमोर उभं राहून खोटं खोटं हसावं लागलं, रडावं लागलं आणि दुस-यांच्या स्वरांवर ओठ हलवत गावंही लागलं. पण हे सुद्धा मागे पडलं. रोजगारासाठी काहीतरी करणं भाग होतं आणि एकेदिवशी एका स्नेह्यांच्या पुढाकारानं गाण्याची संधी मिळाली. वसंत जोगळेकरांच्या ‘आप की सेवा में’ या हिंदी चित्रपटात दीदींना ‘पा लागू… कर जोरी…. कान्हा मो से ना खेलो होरी’ गायलं. हे त्यांचं पहिलं ध्वनिमुद्रीत हिंदी चित्रपट गीत. , वर्ष होतं १९४६. बडी मां या चित्रपटातही एक गाणं मिळालं होतं ‘मां तेरे चरनों में’! आणि पुढे सुभद्रा या चित्रपटातही एक भजन मिळालं होतं. पण या कामगिरीचा प्रभाव त्यावेळच्या हिंदी चित्रपट सृष्टीवर फारसा पडला नव्हता.. लता नक्षत्र अजून ठळकपणे उदयास यायला अवकाश होता. पुढे ज्या लव इज ब्लाईंड या हिंदी चित्रपटासाठी गाणी गायली तो चित्रपटच पूर्ण होऊ शकला नाही. हा इंग्लिश नावाचा हिंदी चित्रपट कायमचे डोळे मिटून बसला. त्यामुळे या चित्रपटासाठी ध्वनिमुद्रीत झालेली गाणी मूक झाली. पण याच वेळी एका पठाणाच्या कानांनी हा आवाज मनात साठवून ठेवला. या पठाणाच्या मूळ नावाचा शोध काही केल्या लागत नाही. खरं तर चित्रपटांसाठी मामुली भूमिका करणारे लोक (एक्स्ट्रा कलाकार) निर्मात्यांना पुरवणारा हा माणूस. पण त्याला संगीताचा कान असावा, हे विशेष आणि आपल्यासाठी आनंददायी ठरले. या माणसाने मास्टर गुलाम हैदर अली यांच्याकडे त्यावेळी केवळ अठरा वर्षे वय असलेल्या या कोवळ्या आवाजाची महती गायिली. गुलाम हैदर हे पाकिस्तानातून भारतात आले होते तेच मूळी संगीतकार म्हणून कारकीर्द करायला. आणि संगीत दिग्दर्शक म्हणून तर ते अतिशय उजवे होतेच. परंतू यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे नव्या आवाजांना संधी देणे. शमशाद बेगम, सुधा मल्होत्रा, सुरींदर कौर या गायिका मास्टर गुलाम हैदर यांनीच रसिकांसमोर आणल्या. आता त्यांच्या हातून एक अलौकिक रत्न चित्रपट-संगीत क्षेत्राला सोपवले जाणार होते…. लता मंगेशकर!
मास्टरजींनी लतादीदींना भेटीस बोलावण्याचा निरोप याच पठाण दादाच्या हाती धाडला. दीदींना त्यांना त्यांचेच एक गाणे ऐकवले… त्यांनी आणखी एक गाणे गा असा आग्रह धरला आणि मास्टर हरखून गेले. मात्र दीदींनी त्या ध्वनिमुद्रिकांत गायलेल्या गायिकांच्या आवाजाची नक्कल करीत ती गाणी हुबहू गायली होती. त्यांनी लतादीदींचा आवाज ध्वनिमुद्रीत केला आणि ते दीदींना घेऊन ताबडतोब दीदींना शशधर मुखर्जी या निर्मात्याकडे नेले. मुखर्जींनी लतांचे ध्वनिमुद्रीत गाणे ऐकले. मूळातच अतिशय कोवळा आणि विशिष्ट पातळीवर लीलया जाणारा आवाज, त्यात कोवळे वय. शशधर मुखर्जींच्या चित्रपटातील नायिका कामिनी कौशल वयाने लतादीदींपेक्षा मोठी होती आणि त्यामुळे हा पातळ आवाज त्या नायिकेला शोभणार नाही अशा अर्थाने त्यांनी यह आवाज नहीं चलेगी! असं म्हटलं असं म्हणतात. यात नायिकेसाठी हा आवाज चालणार नाही असं त्यांना म्हणायचं असावं! आणि ते खरेच होतं. कारण पुढे याच शशधर मुखर्जी यांनी अनारकली आणि नागिन या चित्रपटांसाठी दीदींकडून काही गाणी गाऊन घेतली!
परंतू यह आवाज नहीं चलेगी असं ऐकल्यावर मास्टर गुलाम हैदर रागावले. त्यांनी काहीशा तिरीमिरीनेच दीदींना स्वत:सोबत यायला सांगितले. एका स्टुडिओमध्ये एका चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं आणि त्या चित्रपटासाठी एक गाणं हवं होतं स्त्री गायिकेचं. दीदी आणि मास्टरजी रेल्वे स्टेशनवर पोहोचले. मास्टर्जींनी खिशातून ५५५ ब्रॅन्डचं सिगारेटचं पाकीट काढलं आणि त्यावर ठेका धरला. आणि दीदींना गाण्याचा मुखडा सांगितला… दिल मेरा तोडा…. हाय… मुझे कहीं का न छोडा! मुखर्जींनी बहुदा गुलाम हैदर यांचं दिल फारच जोरात तोडलं असावं! मग त्यांनीही जिद्दीनं जगाला कहीं का सोडलं नाही! रेल्वेगाड्यांच्या, प्रवाशांच्या, विक्रेत्यांच्या गदारोळात एक भावी गानसम्राज्ञी गात होती! मास्टर गुलाम हैदर त्यांनी त्याच दिवशी दीदींकडून काही गाणी गाऊन घेतली. चित्रपटाचं नाव होतं मजबुर (1948). मुन्नवर सुलताना नावाची अभिनेत्री या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होती. आणि तिच्यासाठी शमशाद बेगम किंवा नूरजहां यांचा आवाज मास्टर गुलाम हैदर वापरतील असा सर्वांचा होरा होता. परंतु त्यांनी तर लता मंगेशकर नावाच्या नव्या मुलीला हे गाणं देऊ केलं होतं. त्यामुळे निर्माते नाराज झाले होते. यावर मास्टरजींना अतिशय राग आला. आधीच शशधर यांनी नकारघंटा वाजवून मास्टरजींच्या पारखी नजरेवर प्रश्नचिन्ह उमटवलं होतंच! त्यांनी मी हा चित्रपट करणारच नाही असं सांगितलं आणि आपल्या साहाय्यकाला निर्मात्यांचे पैसे परत देण्यास फर्मावले. आणि त्याला त्यांना हे ही बजावून सांगायला सांगितलं की ही छोटी मुलगी पुढे गानसम्राज्ञी होईल हे लक्षात ठेवा! पण सुदैवाने निर्मात्यांनी गुलाम हैदर यांचे म्हणणे मान्य केले. आणि मजबूर ची गाणी लतादीदींना मिळाली. मास्टर गुलाम हैदर अतिशय कडक शिस्तीचे संगीतकार होते.. त्यांनी लतादीदींकडून अतिशय मेहनत करून घेतली. मास्टरजींकडे दीदींचं पहिलं गाणं जे ध्वनिमुद्रीत झालं ते मुकेश यांच्यासह गायलेलं होतं…. अब डरने की कोई बात नहीं… अंग्रेजी छोरा चला गया!
आता दीदींना आपला स्वत:चा आवाज गवसला होता. दिल मेरे तोडा या गाण्याच्या ध्वनिमुद्रणानंतर मास्टर गुलाम हैदर यांनी लतादीदींना सांगितलं… लोक नूरजहांला सुद्धा विसरून जातील तुझं गाणं ऐकल्यावर! मास्टरजींची भविष्यवाणी पुढे अक्षरश: प्रत्यक्षात उतरली हा इतिहास आहे. चित्रपट संगीताच्या राज्याची अनभिषिक्त सम्राज्ञी यशस्वीपणे जगापुढे आणण्याचं भाग्य लाभलेल्या या श्रेष्ठ संगीतकाराचं नाव गुलाम असावं हा योगायोग. आणि यांची भेट घडवून आणण्यात लोकांना व्याजानं पैसे देऊन ते दामदुप्पट वसूल करणा-या एका पठाणाची भूमिका असावी.. हा ही योगायोगच. या अर्थाने या पठाणाचे कर्ज रसिकांच्या माथी आहेच आणि ते कधीही फिटणार नाही! आणि मास्टर गुलाम हैदर… या गुलाम नावाच्या माणसाने आपल्याला गाण्याची राणी नव्हे सम्राज्ञी दिली हे ही खरेच. गुलाम या नावाचा अर्थ केवळ नोकर, सेवक, दास असा नसून स्वर्गातील देखणे, तरूण सेवेकरी असाही होतो! आपल्या चित्रपट संगीताच्या बाबतीत या गुलामाने मोठीच सेवा केली असं म्हणायला काही हरकत नाही, असं वाटतं. दस्तुरखुद्द लता दीदींनीच मास्टर गुलाम हैदर यांना त्यांचा ‘गॉडफादर’ म्हटलं आहे! मास्टर गुलाम हैदर नंतर पाकिस्तानात परतले. त्यांच्या पत्नीला लतादीदी मां जी म्हणून संबोधत आणि त्यांच्या मुलांना भाऊ मानत. मास्टरजी खूप आजारी पडले होते तेंव्हा त्यांना दीदींना भारतात उपचारांसाठी येण्याची विनंतीही केली होती आणि सर्व खर्चही करण्याची तयारी दाखवली होती.
लतादीदींबद्दल आणखी दोन तीन लेख होतील एवढं डोक्यात आहे. आपली पसंती समजली तर लिहावं असा विचार आहे.
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈