श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ आईन्स्टाईनचा देव — लेखक : बरूच डी. स्पिनोझा ☆ श्री सुनील देशपांडे

काही जण कधी कधी चुकीचा किंवा खोटा म्हणा हवं तर, नॅरेटिव्ह सेट करतात. बरेच जण भाषणाच्या ओघात सांगून जातात, आईन्स्टाईननी सुद्धा शेवटी देव मानला होता.  ऐकणारे भक्ती भावाने विश्वास ठेवतात. तपासून पहाण्याची कोणी काळजी घेत नाही. अशी स्टेटमेंट ऐकणाऱ्यांसाठी आणि करणाऱ्यांसाठीही आईन्स्टाईनचा देव कसा होता हे वाचा.

— सुनील देशपांडे.

आईन्स्टाईन अमेरिकेतील कित्येक विद्यापीठांमध्ये विविध परिषदांना जात असत, तेव्हा विद्यार्थी त्यांना प्रश्न विचारत. 

त्यात वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, 

“तुमचा देवावर विश्वास आहे का?” 

यावर त्यांचे नेहमीचे उत्तर असायचे,

 “माझा स्पिनोझाच्या देवावर विश्वास आहे.” 

बरूच डी स्पिनोझा हे सतराव्या शतकात पोर्तुगीज-ज्यूईश मूळ असलेले एक डच तत्त्वज्ञ होते.

 ते आणि रेनी डेकार्टस हे दोघे त्या काळातील सर्वश्रेष्ठ बुद्धिवादी विचारवंत मानले जात. 

 स्पिनोझा यांनी जी देव संकल्पना मांडली तिचे स्वरूप खालीलप्रमाणे सांगता येईल…

देव असता तर मानवाला म्हणाला असता, 

“हे उठसूठ प्रार्थना करणं आणि पश्चात्तापदग्ध होऊन आपली छाती बडवणं आता पुरे झालं… थांबवा ते. 

या जगात तुम्ही मनसोक्त हिंडा, नाचा, गा, मजा करा.

 मी दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटा, एवढंच मला अपेक्षित आहे.”

“त्या उदास काळोख्या आणि थंडगार मंदिरात जाणं आधी बंद करा.

खरंतर ती तुम्हीच बांधलेली आहेत, 

आणि त्याला तुम्ही म्हणता की ही देवाची घर आहेत!

 माझी घरं असतात डोंगरदऱ्यांत, रानावनांत, नदी-नाल्यांवर, समुद्रकिनाऱ्यांवर! 

तिथे राहतो मी आणि तिथे राहून तुमच्यावरच प्रेम व्यक्त करतो मी.

 आपल्या हीनदीन आणि दुःखी आयुष्यासाठी मला दोष देणं सोडून द्या आता.

‘तुम्ही पापी आहात’ असलं काही कधीच सांगितलेलं नाही मी तुम्हाला.

सतत मला घाबरून जगणं सोडून द्या आता.

मी काही तुमचा न्यायनिवाडा करत नाही की तुमच्यावर टीकाही करत नाही की तुमच्यावर कधी संतापतही नाही.

मला कशाचाही त्रास होत नाही. 

मी शिक्षा वगैरेही देत नाही. 

कारण मी म्हणजे शुद्ध प्रेम आहे.” 

“येता-जाता माझ्यासमोर क्षमायाचना करणे बंद करा एकदम.

 क्षमा मागण्यासारखं काही नसतं. 

मी तुमची निर्मिती केली आहे असं जर तुम्ही मानत असाल तर तुमच्यामध्ये जे जे आहे ते ते मीच तर दिलेलं आहे तुम्हाला. 

आनंद, दुःख, गरजा, मर्यादा, विसंगती… हे सारं काही मीच दिलेलं असेल आणि यातून तुमच्या हातून काही घडलं तर मी तुम्हाला दोषी कसा ठरवू? 

तुम्ही जसे आहात त्यासाठी मी तुम्हाला शिक्षा का म्हणून करू?

 आपल्या लेकरांच्या चुकांसाठी त्यांना मारता-झोडता यावे म्हणून एखादी भयंकर जागा मी तयार केली आहे असं खरंच वाटतं का तुम्हाला? 

कोणता देव करेल असं?”

“ईश्वरी आदेश, दैवी नियम, कायदे वगैरे काहीही नसतं. 

काढून टाका डोक्यातून तुमच्या ते. 

तुम्हाला ताब्यात ठेवण्यासाठी, तुमच्याकडून हवं ते करून घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लुप्त्या आहेत त्या.

 त्यांच्यामुळे तुमच्यात अपराधीपणाची भावना निर्माण व्हावी हाच माझे मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्यांचा हेतू असतो.”

“तुम्ही आपल्या बांधवांना योग्य तो मान द्या. 

जे स्वतःच्या बाबतीत होऊ नये असं वाटतं तुम्हाला तेच दुसऱ्याच्या बाबतीतही करू नका. 

मी फक्त एवढेच सांगेन की, आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष द्या.

तुमची सदसद्विवेकबुद्धी हीच तुमची एकमेव मार्गदर्शक असू द्या.

स्वतःशी प्रामाणिक रहा. 

कारण अस्तित्वात असलेली एकमेव गोष्ट गोष्ट म्हणजे हे आयुष्य.

 ते इथं आहे आणि आत्ता या क्षणाला आहे.

मी तुम्हाला पूर्ण मुक्त बनवलेलं आहे.

तुमच्यासाठी कसली बक्षीसंही नाहीत आणि शिक्षाही नाहीत. 

कसली पापही नाहीत आणि कसली पुण्येही नाहीत. 

कोणी तुमच्या कृत्याचा हिशोब मांडत नाही की तुमच्या बर्‍यावाईटाची नोंदही करून ठेवत नाही.

आपल्या आयुष्याचा स्वर्ग बनवायचा की नरक करायचा हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे.”

“हे आयुष्य संपल्यावर पुढे काय हे मी तुम्हाला सांगू शकत नाही; 

पण एकच सांगतो की, या आयुष्यात नंतर पुढे काहीच नाही असं समजून जगा. 

अस्तित्वात राहण्याची, प्रेम करण्याची, आनंद लुटण्याची ही एकमेव संधी आहे असे समजून जगा. 

नंतर काहीच जर नसेल तर मी तुम्हाला दिलेल्या संधीचे सोने तुम्ही करायला नको का?

 आणि नंतर काही असेल तर मी तुम्हाला तुम्ही योग्य वागलात की अयोग्य असलं काहीही विचारणार नाही. 

मी एवढंच विचारीन: आवडलं ना तुम्हाला आयुष्य? 

मजा आली की नाही? केव्हा सर्वात जास्त मजा आली? 

काय काय शिकलात?”

“… तर माझ्यावर विश्वास वगैरे ठेवू नका.

 विश्वास ठेवणे म्हणजे मानणं, तर्क करणे, कल्पना करणे. 

मला तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायला अजिबात नको आहे.

 तुम्ही माझा स्वाद घ्यावा, माझी अनुभूती घ्यावी असं मला वाटतं.

 प्रिय व्यक्तीच्या ओठांवर ओठ ठेवताना, आपल्या चिमुकल्या बाळाशी खेळताना, आपल्या कुत्र्याचे लाड करताना, समुद्राच्या लाटांमध्ये डुंबताना मला अनुभवा तुम्ही.”

“माझ्यावर स्तुतिसुमने उधळून माझी खुशामत करणे बंद करा. 

कसला आत्मकेंद्री आणि अहंमन्य देव समजता तुम्ही मला?

 तुमच्या भजन स्तोस्त्रांनी किटून गेलेत माझे कान… 

त्या चिकट प्रशंसाशब्दांनी पार वैतागून गेलोय मी.

 *तुम्हाला माझ्या विषयी कृतज्ञता व्यक्त करायचीच असेल तर काळजी घ्या आपल्या आरोग्याची, काळजी घ्या आपल्या नातेसंबंधाची, काळजी घ्या भोवतालच्या जगाची. 

आनंदित रहा, आनंद व्यक्त करा. 

माझी प्रशंसा करण्याचा… मला प्रसन्न करण्याचा हाच एक योग्य मार्ग आहे.”

“एक गोष्ट खात्रीची आहे, 

ती म्हणजे तुम्ही इथे आहात…,

जिवंत आहात, 

आणि हे जग विविध विस्मयकारक गोष्टींनी ओसंडतंय. 

आणखी कसले चमत्कार हवेत तुम्हाला?

 कशासाठी इतक्या अपेक्षा?” 

 

“मला कधीही आपल्या बाहेर शोधू नका.

 मिळणारच नाही कधी मी.

 आपल्या अंतर्यामी शोधा मला तुम्ही. 

तिथे मात्र माझी स्पंदने तुम्हाला निश्चितपणे जाणवतील!” 

– बरूच डी स्पिनोझा.

(नेटवर सर्च करून स्पिनोझाचे तत्वज्ञानाचा अवश्य अभ्यास करावा. त्याला आस्तिक म्हणावं का नास्तिक हेही ज्याने त्याने ठरवावे. पण स्पिनोझाचा देव सर्वांनीच अंगिकारावा. त्या देवाचे आस्तिक व्हावे. आस्तिक आणि नास्तिक यामधील दरीच नष्ट होऊन जाईल.) 

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments