डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ श्रीमद्भगवद्गीता — अध्याय आठवा — अक्षरब्रह्मयोग — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागा: ।
यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये ।।११।।
*
वेदज्ञानी म्हणती ज्या परमपदा अविनाशी
प्रवेशती ज्यात यत्नशील महात्मा सन्यासी
आचरती ब्रह्मचर्य इच्छुक ज्या परमपदाचे
कथन करितो तुज श्रेष्ठत्व त्याचि परमपदाचे ॥११॥
*
सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।
मूर्ध्न्याधायात्मन: प्राणमास्थितो योगधारणाम् ।।१२।।
*
ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् ।
य: प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ।।१३।।
*
सर्वद्वारांना संयमित करुन हृदयात मना स्थिरावून
जित मनाने योग धारणे प्राणा मस्तकात स्थापून
ॐकाररूपी एक अक्षरी ब्रह्म करुनिया उच्चारण
देहासी त्यागता परम गती आत्म्यासी प्राप्त प्रसन्न ॥१२,१३॥
*
अनन्यचेता: सततं यो मां स्मरति नित्यश: ।
तस्याहं सुलभ: पार्थ नित्ययुक्तस्य योगिन: ।।१४।।
*
अनन्य चित्ते स्थिर मज ठायी स्मरण माझे सतत
एकरूप त्या योग्याला होतो मी सुलभ प्राप्त ॥१४॥
*
मामुपेत्य पुनर्जन्म दु:खालयमशाश्वतम् ।
नाप्नुवन्ति महात्मान: संसिद्धिं परमां गता: ।।१५।।
*
अशा महात्म्या पुनरपि नाही पुनर्जन्म गती
दुःखाने भरलेल्या देहाची पुनश्च नाही प्राप्ती ॥१५॥
*
आब्रह्मभुवनाल्लोका: पुनरावर्तिनोऽर्जुन ।
मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ।।१६।।
*
आब्रह्मलोक समस्त असती पुनरावर्ती अर्जुन
ष्राप्ती कोण्या लोकाची तरीही त्यांना पुनर्जन्म
मी असल्याने कालातीत प्राप्ती माझी थोर
त्यानंतर मग कोणलाही नसतो पुनर्जन्म घोर ॥१६॥
*
सहस्रयुगपर्यन्तमहर्यद्ब्रह्मणो विदु: ।
रात्रिं युगसहस्रान्तां तेऽहोरात्रविदो जना: ।।१७।।
*
सहस्रयुगे कालावधी एक विरंचीदिनाचा
तितकाच काळ प्रजापतीच्या एका निशेचा
योग्याला ज्या झाले याचे आकलन ज्ञान
कालतत्व ते पूर्ण जाणती ज्ञानी योगीजन ॥१७॥
*
अव्यक्ताद्व्यक्तय: सर्वा: प्रभवन्त्यहरागमे ।
रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके ।।१८।।
*
ब्रह्मदेव दिन उजाडता होते उत्पन्न
समस्त जीवसृष्टी अव्यक्तापासुन
रात्र होता प्रजापतीची भूतसृष्टी विरुन
अव्यक्तातच पुनरपि जाते होऊन लीन ॥१८॥
*
भूतग्राम: स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते ।
रात्र्यागमेऽवश: पार्थ प्रभवत्यहरागमे ।।१९।।
*
प्रकृतीच्या वश असतो जीव समुदाय
दिवसा होई उत्पन्न रात्रीस पावतो लय ॥१९॥
*
परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातन: ।
य: स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ।।२०।।
*
अव्यक्ताच्या या अतीत सनातन भाव अव्यक्त
सर्वभूत जरी नष्ट जाहले दिव्य षुरुष तो अनंत ॥२०॥
☆
अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈