श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

श्रीरामांच्या वंशातील लढवय्या राजपुत्र ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

श्री.भवानी सिंग (महावीर चक्र विजेते)

महर्षी विश्वामित्र अयोध्येत राजा दशरथांच्या दरबारात पोहोचले. आणि त्यांनी दशरथांकडे एकच मागणी केली….ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा! यज्ञात विघ्न निर्माण करणा-या राक्षसांचा नि:पात करण्यास आणि माझ्या यज्ञाचे रक्षण करण्यास हाच सर्वथा योग्य आहे! आणि राजस सुकुमार राजपुत्र श्रीराम धनुष्य-बाण धारण करून सज्ज होऊन भ्राता लक्ष्मणासह निघाले सुद्धा! 

१९४७ मध्ये भारत स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आला आणि लगोलग शत्रूंनी घेरलाही गेला. या राष्ट्ररूपी यज्ञाचे रक्षण करण्यास अशाच श्रीरामांची आवश्यकता होती. स्वातंत्र्यापूर्वी हिंदुस्थानात कित्येक स्वतंत्र राज्ये होती. त्यांचे राजे आणि राजकुमार आणि सैन्यही होते. या सर्वांमधून स्वतंत्र भारताच्या सैन्यात सैन्याधिकारी म्हणून सर्वप्रथम प्रत्यक्षात सामील होण्याची हिंमत दाखवली ती प्रभु श्रीरामचंद्रांचे सुपुत्र कुश यांचे तीनशे सातवे वंशज श्री.भवानी सिंग (महावीर चक्र विजेते) यांनी! वयाच्या अवघ्या एकवीसाव्या वर्षी राजपुत्र भवानी सिंग भारतीय सेनेच्या पायदळात थर्ड कॅवलरी रेजिमेंट मध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले. पुढच्या तीनच वर्षांत भवानी सिंग साहेबांची महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या अंगरक्षक दलात नेमणूक झाली. तब्बल नऊ वर्षे ते या दलाचा भाग होते. यानंतर साहेब ५०,पॅरा ब्रिगेडमध्ये सामील झाले. १९६४ ते १९६७ या तीन वर्षात त्यांनी देहराडून मिलिट्री अ‍ॅकॅडमी मध्ये ‘अ‍ॅज्युटंट’ म्हणून सेवा केली. १९६७ मध्ये त्यांनी स्वेच्छेने पॅरा कमांडो युनिट मध्ये प्रवेश केला आणि मग त्यांना पुढच्याच वर्षी या युनिटचे कमांडींग ऑफिसर म्हणून जबाबदारी मिळाली. केवळ नामधारी असलेल्या राज्याचा राजपुत्र आता खरोखरीच्या रणांगणावर देशसेवा करण्यासाठी सज्ज होता. 

पुढील तीनेक वर्षातच भारत-पाकिस्तान दरम्यान सशस्त्र संघर्षाची पार्श्वभूमी तयार झाली. योद्ध्यांना आता मर्दुमकी दाखवण्याची संधी मिळणार होती…ज्याची सैनिक वाट पहात असतात. पूर्व पाकिस्तानात पाकिस्तानी सैन्याने चालवलेल्या अत्याचारांचा परिपाक म्हणून तेथील नागरीकांचा उद्रेक होणं आणि त्यातून एका स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती होण्याची प्रक्रिया नियतीने सुरू केली होती. तेथील स्वातंत्र्यसैनिकांच्या मुक्तीवाहिनी दलाला सैनिकी प्रशिक्षण देण्याच्या कामात भवानी सिंग साहेब सहभागी झाले. 

पाकिस्तान भारतात पश्चिमेच्या बाजूने पॅटन रणगाड्यांच्या भरवशावर आक्रमण करणार असा अचूक अंदाज फिल्ड मार्शल सॅम बहादूर मानेकशॉ साहेबांनी बांधला आणि हे आक्रमण थोपवण्याच्या दृष्टीने पाच-सहा महिने आधीच सराव सुरू केला…त्याची जबाबदारी लेफ़्टनंट कर्नल भवानी सिंग साहेबांकडे आली आणि त्यांनी ती निभावली सुद्धा….अगदी प्रभावीपणाने! 

या धामधुमीत तिकडे जयपूर मध्ये वडिलांच्या अचानक झालेल्या देहावसानामुळे राजपुत्र भवानी सिंग साहेबांना महाराज म्हणून गादीवर बसण्याचा सन्मान प्राप्त झाला होता…आता एक राजपुत्र नव्हे तर एक महाराजा युद्ध लढणार होते. 

माणेकशा साहेबांचा अंदाज अचूक ठरला आणि पाकिस्तानने पश्चिम बाजूने भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. ही बाजी त्यांच्यावर उलटवण्यासाठी बाडमेर पासून सुमारे ७०-८० किलोमीटर्सवर भवानी सिंग साहेब आपल्या जवानांसह सुसज्ज होते. दिल्लीत घुसु पाहणा-या पाकिस्तानला भारताने पाकिस्तानात घुसून चोख प्रत्युत्तर दिले. यात आघाडीवर होते भवानी सिंग साहेब आणि त्यांची १० पॅरा रेजिमेंट. 

     सलग चार दिवस आणि चार रात्री अथक चढाई करीत करीत भवानी सिंग साहेबांनी पाकिस्तानच्या सैन्याला मागे रेटीत नेले. सुमारे पाचशेच्यावर गावे भारतीय सैन्याच्या ताब्यात आली होती. या प्रचंड मा-यामुळे पाकिस्तानी सेना प्रचंड गोंधळून आणि घाबरूनही गेली होती. भवानी सिंग साहेबांच्या नजरेसमोर आता लाहौर दिसत होते…अगदी काही तासांतच लाहौर वर तिरंगा फडकताना दिसू शकला असता….लाहौर…भवानी सिंग साहेबांचे पूर्वज कुश यांचे बंधू लव यांची नगरी….! पण हा योग जुळून आला नाही! 

     इस्लामकोट,नगर पारकर, वीरावाह या पाकिस्तानी ठाण्यांवर तिरंग फडकला होता…लुनियावर ध्वज फडकावून लाहौरकडे कूच करायचा मनसुबा असतानाच वरीष्ठांच्या आदेशानुसार भवानी सिंग माघारी फिरले. त्यांच्या नेतृत्वात भारतीय जवानांनी ३६ पाकिस्तान्यांना यमसदनी धाडले आणि २२ पाकिस्तानी सैनिक युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतले होते. या अतुलनीय पराक्रमासाठी या महाराज महावीरास महावीर चक्र न मिळते तरच नवल! 

विजयी होऊन लेफ़्तनंट कर्नल महाराजा भवानी सिंग साहेब जेंव्हा जयपूरला पोहोचले तेंव्हा त्यांच्या अभिनंदनासाठी संपूर्ण जयपूर लोटले होते….विमानतळ ते आमेर किल्ला हे वीस किलोमीटर्सचे अंतर पार करायला विजय मिरवणुकीला दहा तास लागले होते…राजपुत्र म्हणून सैन्यात गेलेले सुपुत्र महाराजा म्हणून युद्ध जिंकून आले होते! युद्ध संपल्यावर काहीच दिवसांत सरकारने ‘राजा’ ‘महाराजां’चे अधिकार संपुष्टात आणले. पण जनतेच्या मनातील महाराजा भवानी सिंग यांचेबद्दलचा आदर किंचितही संपुष्टात आला नाही, हे खरेच! 

१९७४ मध्ये महाराजांनी सेनेतून स्वेच्छानिवृत्ती स्विकारली. पण भारतीय सेनेच्या श्रीलंकेतील शांतिसेना अभियानादरम्यान भवानी सिंग साहेबांवर फारच मोठी जबाबदारी दिली गेली. श्रीलंकेतील एल.टी.टी.ई. (लिबरेशन टायगर्स ऑफ तमील ईलम)च्या बंडखोरांनी काहीशा बेसावधपणे श्रीलंकेत उतरलेल्या सैन्यावर तुफान हल्ला चढवून खूप मोठे नुकसान केले. एका घटनेत तर आपल्या काही कमांडो सैनिकांचे अपहरण करून त्यांना नृशंसपणे ठार मारले होते. याचा फार मोठा परिणाम सैनिकांच्या मनोधैर्यावर होणे अगदी स्वाभाविक होते. या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी सरकारने लेफ्टनंट कर्नल भवानी सिंग (सेवानिवृत्त) यांना श्रीलंकेत खास कामगिरीवर धाडले. आणि या जातीवंत लढवय्याने सैनिकांमध्ये नवा उत्साह भरला आणि सैनिक पुन्हा लढण्यास सज्ज झाले. रामायणातही जेंव्हा वानरसेना हतोत्साहीत झाली असेल तेंव्हा प्रभु रामचंद्रांनी असाच त्यांचा उत्साह वाढवला असेल ! 

(महाराजा भवानी सिंग साहेबांना या कामगिरीबद्द्ल १९९१ मध्ये मानद ब्रिगेडीअर पदाने गौरवण्यात  करण्यात आले. यानंतर दोनच वर्षांनी म्हणजे १६ एप्रिल १९११ रोजी रात्री उशिरा महाराजांनी इहलोकाचा निरोप घेतला. १६ एप्रिल हा भवानी सिंग साहेबांच्या निधनाचा दिवस. केवळ एका शूर सैनिकाचे स्मरण म्हणूनच या लेखाकडे पाहिले जावे आणि केवळ याच विचाराने आलेल्या प्रतिक्रिया दिल्या जाव्यात, अशी आशा श्रीरामकृपेने करतो.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments