श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ एक रामरत्न आणि दोन भारतरत्न ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
संस्कृतातील रम धातू म्हणजे रमणे आणि घम धातू म्हणजे ब्रम्हांडाची पोकळी….ही सर्व पोकळी व्यापून उरले ते राम…प्रभु श्री राम !
योगी ज्या शून्यात रमतात त्या शून्यास राम म्हणतात. तुलसीदासजी म्हणतात “स्वयं प्रभु श्रीरामांना आपल्या स्वत:च्या नावाचं वर्णन नाही करता येत”…इतकं ते अवर्णनीय आहे. रामनामाचा केवळ एक उच्चार पुण्यप्रद आणि दोनदा उच्चार तर तब्बल १०८ वेळा नामजप केल्याचं फल देणारा! म्हणून आजवरच्या सर्वच संतांनी राम नाम जपायला सांगितलं, रामचरित्र गायचा आग्रह धरला !
ज्यांची प्रतिभा एखाद्या संत-महात्म्यापेक्षा कमी नव्हती असे पंडित नरेंद्र शर्मा यांनी संतांचा हाच विचार आधुनिक भाषेत मांडला. आणि या शब्दांना महान मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतात बांधले. राम रत्नाचे गुण गायला खळे काकांनी एक नव्हे तर दोन दोन रत्नं मिळवली…भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि भारतरत्न लता मंगेशकर! या दोघांशिवाय या ईश्वरी शब्दांना न्याय देणारं दुसरं होतं तरी कोण? पण ही दोन रत्नं एकत्र आणण्याचं काम मोठं अवघड. श्रीनिवासजींचा लतादीदींवर प्रेमाचा अधिकार होताच. मराठीत माऊली ज्ञानोबारायांच्या आणि जगदगुरू तुकोबारायांच्या शब्दांना लतादीदींनी खळे काकांच्याच स्वरमार्गदर्शनाखाली श्रोत्यांच्या काळजापर्यंत पोहोचवले होते. पंडित भीमसेन जोशी हे खरे तर शास्त्रीय गाणारे! परंतू त्यांना या रामनामासाठी राजी करायला वेळ लागला नाही…कारण रामाचे भजन हेचि माझे ध्यान सारख्या रचना त्यांनी आधी गायल्या होत्याच आणि त्यात त्यांना समाधान लाभल्याचा अनुभव होताच.
पंडित नरेंद्र शर्मांना दीदी ‘पप्पा’ म्हणून संबोधित असत. मास्टर विनायकांच्या घरी दीदींची आणि पंडितजींची पहिली भेट झाली होती आणि त्यातून ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या त्या पडल्याच. पंडितचे घर दीदींचे घर बनले आणि त्यांचे सर्व नातेवाईक दीदींचे नातेवाईक. एवढं असूनही पंडितजी दीदींना ‘बेटा,बेटी’ असं काहीही न म्हणता लताजी! असं म्हणत….ते आत्यंतिक प्रेमाने आणि दीदींचा अधिकार जाणून! पंडितजींचे शब्द आणि ते ही श्रीरामस्तुतीचे असं म्हणल्यावर दीदी त्वरीत तयार झाल्या पण पंडित भीमसेन जोशींसारख्या हिमालयासोबत उभं राहण्याच्या कल्पनेनं भांबावून गेल्या. ज्योतीने तेजाची आरती अशी काहीशी त्यांची मनोवस्था. कारण भीमसेनजींचा शास्त्रीय संगीतातील उच्चाधिकार इतरांप्रमाणेच दीदीही जाणून होत्या. पण खळे काकांनी दीदींना आश्वासन दिले….मी आहे सोबत!
त्यानुसार योजना झाली आणि ‘राम शाम गुणगान’ नावाच्या हिंदी श्रीरामभजनाच्या संगीत अल्बमच्या ध्वनिमुद्रणास आरंभ झाला. इथं श्रीनिवास खळेकाकांनी मात्र एक वेगळा प्रयोग केला. भारदस्त ताना,आलाप घेणा-या पंडित भीमसेनजींना त्यांनी साधे सरळ गायला लावले. अर्थात पंडितजींचे ‘साधे-सरळ’ गाणं सुद्धा अगदी पट्टीच्या गवयांना अवाक करणारे. गाण्याचे शब्द होते…राम का गुणगान करीये! यात आरंभी भीमसेनजींनी तिस-या वेळी म्हणलेला ‘गुणगान’ शब्द ऐकावा काळजीपूर्वक! तर…खळेकाकांनी दीदींना मात्र ताना,आलाप घेण्याची जबाबदारी दिली! साहजिकच दीदींना प्रचंड मानसिक तणाव आला! बरं दीदी काही कच्च्या गुरुंच्या चेल्या नव्हत्या. पिताश्री मास्टर दीनानाथ आणि पुढे उस्ताद अमानत अली खान आणि अमानत खान आणि अन्य काही श्रेष्ठ शास्त्रीय संगीत शिक्षकांकडे दीदी शास्त्रीय शिकल्या होत्याच. जर त्या चित्रपट संगीताकडे वळल्या नसत्या तर त्या निश्चित प्रसिद्ध शास्त्रीय गायिका झाल्या असत्या!
दोन महासागर काही ठिकाणी एकमेकांसमोर उभे ठाकतात आणि गळाभेट घेतात.परंतू एकमेकांना कमी लेखत नाहीत. समोरच्याला आपला रंग आहे तसा ठेवू देतात. पंडितजींनी असेच केले. पण त्यांच्याविषयीच्या परमादरामुळे दीदी नाही म्हटले तरी मनातून हलल्या होत्या. यावर उपाय म्हणून श्रीनिवास खळेंनी ध्वनिमुद्रण करताना या दोन गायकांच्या मध्ये चक्क एक छोटे लाकडी आडोसा (पार्टीशन) लावून घेतले होते. म्हणजे दोघे एकमेकांना पाहू शकणार नाहीत असे. पण दोघांच्याही गाण्यात कुठेही आडोसा असल्याचे जाणवत नाही. एकदा का रामनामाची धून काळजातून कंठात आली की सर्व राममय होऊन जातं. तसंच झालं….राम शाम गुणगान मधील एकेक गाणं म्हणजे एक एक महाकाव्य म्हणावे असे झाले. १९८५ मध्ये प्रसिद्ध झालेला हा संगीतठेवा आजही अत्यंत श्रवणीय आहे! ही प्रत्यक्ष त्या श्रीरामचंद्रांची कृपाच! यात राम का गुणगान हे अहिर भैरव रागातील गाणे म्हणजे दिव्य कोंदणातील अतिदिव्य हीराच!
आजचे आघाडीचे गायक शंकर महादेवन हे त्यावेळी केवळ अकरा वर्षांचे होते. त्यांनी या गाण्यांसाठी, या अल्बममध्ये वीणावादन केले आहे, हे किती विशेष!
‘राम शाम गुणगान’ म्हणजे एका रामरत्नाचे गुणगान दोन रत्नांनी करावे हाही एक योगच होता श्रोत्यांच्या नशीबातला. आज ही दोन्ही रत्ने आणि त्यांचे मोल जाणणारे पदमभूषण पंडित नरेंद्र शर्मा आणि पदमभूषण श्रीनिवास खळे हे या जगात नाहीत, पण त्यांची स्वरसृष्टी अमर आहे.
राम का गुणगान करिये, राम का गुणगान करिये।
राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिये॥
राम के गुण गुणचिरंतन,
राम गुण सुमिरन रतन धन।
मनुजता को कर विभूषित,
मनुज को धनवान करिये, ध्यान धरिये॥
सगुण ब्रह्म स्वरुप सुन्दर,
सुजन रंजन रूप सुखकर।
राम आत्माराम,आत्माराम का सम्मान करिये, ध्यान धरिये॥
(अर्थातच हे सर्व मी इतरांचे वाचून रामनवमीनिमित्त तुमच्यासमोर मांडले आहे. माहितीमध्ये काही तफावत असेल तर दिलगीर आहे. पण यानिमित्ताने सर्वांच्या मुखातून राम का गुनगान व्हावे अशी इच्छा आहे. वरील ओळी आपण वाचल्या म्हणजे आपल्याकडून गुणगान झालेच की! )
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈