श्री सुनील शिरवाडकर
इंद्रधनुष्य
☆ सखी मंद झाल्या तारका… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
नुकताच आलेला ‘स्वरगंधर्व’ पाहिला.. आणि बाबुजींचा एक जुना किस्सा आठवला. वरळीच्या ‘रेडीओवाणी’ या स्टुडिओत काही गाण्यांचं रेकॉर्डिंग सुरु होतं. एक गाणं झालं.. मध्ये थोडा वेळ होता, म्हणुन बाबुजी चहा घेण्यासाठी खाली आले.ते एक छोटं रेस्टॉरंट होतं.
‘एक कप चहा.. एक रुपया ‘ असा बोर्ड होता. चहा आला..तो पूर्ण कपभर नव्हता.. थोडा कमी होता. बाबुजींनी वाद घालायचा सुरुवात केली. प्रश्न पैशाचा नव्हता.. तत्वाचा होता..वाद वाढला,पण तेवढ्यात रेस्टॉरंटचा मालक आला. त्याने बाबुजींना ओळखले.. पूर्ण कप भरुन चहा दिला.. इतकंच नाही तर लोणी लावलेली एक स्लाईसही दिली.. बाबुजी खुश झाले..नंतरचं रेकॉर्डिंग पण झकास झालं.
ते गाणं होतं….. ‘ सखी मंद झाल्या तारका.’
या गाण्याच्या खुप आठवणी आहेत. श्रीधर फडके एअर इंडियामध्ये अधिकारी होते. एअर इंडियाचं एक गेस्ट हाऊस होतं.. लोणावळ्याला. तेथे अधुनमधून तो पिकनिक ॲरेंज करायचा. अशीच एक पिकनिक ठरली. सुधीर फडके..राम फाटक.. सुधीर मोघे..श्रीकांत पारगावकर..उत्तरा केळकर अशी बरीच मंडळी होती. बाबुजींनी ठरवलं.. त्यांच्या काही गाण्यांच्या तालमी तेथेच करायच्या. लोणावळ्याच्या रमणीय परिसरात.. तरुण मंडळींच्या सहवासात तालमी छान रंगतील याची सर्वांना खात्री होती.
तर ‘सखी मंद झाल्या तारका ‘या गाण्याची तालीम सुरू झाली. गाण्याचे संगीतकार होते राम फाटक. त्यांचा आणि बाबुजींचा वाद सुरु झाला.
… ‘सखी मंद झाल्या तारका.. आता तरी येशील का..यानंतर पुन्हा एकदा’..येशील का’ असा एक खटका आहे.तो बाबुजींना मान्य नव्हता. राम फाटक म्हणाले..त्या खटक्यामधेच खरी गंमत आहे.पण बाबुजी ऐकायला तयार नव्हते.
शेवटी राम फाटक म्हणाले…. “या गाण्याचा संगीतकार मी आहे “
त्यावर बाबुजी म्हणाले…. “मग मी हे गाणं गाणार नाही असं म्हटलं तर?”
राम फाटक म्हणाले…. “हा तुमच्या मर्जीचा भाग आहे. म्हणणार नसाल तर आत्ताच सांगा, म्हणजे मला दुसरा आवाज शोधायला सोईचं होईल.”
बाबुजींनी वाद थांबवला. खेळीमेळीच्या वातावरणात रेकॉर्डिंग पार पडलं..गाणंही पुढे खुप गाजलं.
मुळात हे गाणं जन्माला आलं कसं?तो ही एक किस्सा आहे.
१९६७-६८ मधली गोष्ट.राम फाटक नुकतेच पुणे आकाशवाणीवर रुजु झाले होते.त्यांनी एक कार्यक्रम बसवला..’स्वरचित्र’ हे त्याचं नाव.दर महीन्याला एक नवीन गाणं सादर करण्याचा हा कार्यक्रम होता.१९८० पर्यंत हा कार्यक्रम सुरु होता.
या कार्यक्रमात राम फाटकांनी खुप सुंदर सुंदर गाणी सादर केली.एखादं नवीन गीत शोधायचं.. त्याला चाल लावायची.. आणि एखाद्या गायकाकडुन ते गाऊन घ्यायचं अशी या कार्यक्रमाची संकल्पना.
राम फाटक यांनी या कार्यक्रमात पं.भीमसेन जोशी यांच्याकडून अनेक गीते गाऊन घेतली.ती गाणी म्हणजे एक अलौकिक ठेवा आहे.
तीर्थ विठ्ठल.. क्षेत्र विठ्ठल..
अणुरणिया थोकडा..
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा..
नामाचा गजर..
ज्ञानियांचा राजा ..
काया ही पंढरी..
ही सर्व गीते म्हणजे बावनकशी सोनंच आहे..पण ही सर्व गीते अभंग या प्रकारात येतात.राम फाटक यांच्या मनात एकदा आलं की भीमसेन जोशींकडुन एखादं भावगीत गाऊन घ्यावं.त्यादृष्टीने राम फाटक एखादं गाणं शोधु लागले.तोच कवी सुधीर मोघे आले.फाटक यांना एक मुखडा सुचला होता.तो होता..
‘सखी तारका मंदावल्या…..
गाण्याची संकल्पना फाटक यांनी सुधीर मोघे यांना सांगितली..बरीच चर्चा झाली.. आणि कवी राजांनी थोडासा बदल करून पहिली ओळ लिहिली..
सखी मंद झाल्या तारका…….
दुसरे दिवशी सुधीर मोघे पुर्ण कविता घेऊन आले.ते एक उत्कृष्ट काव्य होतं.उर्दू शायरीच्या धाटणीचे.राम फाटक यांनी अप्रतिम चालीत ते गुंफले.. यथावकाश पं.भीमसेन जोशी यांच्या आवाजात ते ध्वनीमुद्रीत झालं. काव्य..चाल..गायन या सगळ्यांचीच उत्तम भट्टी जमली.. आणि एका अजरामर गीत जन्माला आलं.
कवी.. संगीतकार..गायक.. आणि अर्थातच समस्त मराठी रसिकांना या गाण्याने सर्व काही दिलं..
या गीतातच म्हटल्याप्रमाणे..
जे जे हवेसे जीवनी .. ते सर्व आहे लाभले.
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈