श्री मोहन निमोणकर
इंद्रधनुष्य
☆ “तळ्यातला गणपती” – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
सारसबागेतील गणपती मंदिराला आज २४० वर्षे पूर्ण झाली. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात बांधलेले हे मंदिराला तळ्यातला गणपती या नावाने प्रसिद्ध आहे. सारस बागेतील…. ‘तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ आहे.
नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे ‘विद्येचे माहेरघर’ मानले जाते. परंतु नवसाला पावणाऱ्या ‘तळ्यातला गणपती’ ने पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अगदी आत्तापर्यंत हे ठिकाण “तळ्यातला गणपती” याच नावाने ओळखले जायचे.
पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या बागेतील गणपती पेशव्यांचे पूजास्थान होते. पुण्याची वाढती पाण्याची गरज पाहून श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी १७५४ साली आंबील ओढ्याच्या प्रवाह बदलून मोठे तळे बांधले. या तलावाचे काम १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. या तलावात ‘सारस पक्षी’ सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५००० चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग – बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले. त्या नंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेचे काव्यात्मक ‘सारस बाग’ असे नामकरण केले.
हैदरअली वर स्वारी करायला जाण्यापूर्वी येथील तळ्यात श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. साहजिकच पर्वती, सारस बाग आणि तलाव ही पुणेकरांची फिरावयास येण्याची व देवदर्शनाची ठिकाणे झाली.
स्वातंत्र्यपूर्व काळात १८६१ च्या सुमारास शहरातील अनेक जागा पुणे नगरपालिकेकडे देण्यात आल्या. त्यावेळी गणपती मंदिराचे बेट सोडून तलावाची जागा मुंबई सरकारने पुणे नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. मंदिराची सर्व व्यवस्था देवदेवेश्वर संस्थान पाहते. सारसबाग हे उद्यान व तेथील गणपती पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण आहे.
माहिती संकलक : अज्ञात
संग्राहक : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈