सौ.अस्मिता इनामदार
इंद्रधनुष्य
☆ इंद्रधनुष्य ☆ मी मस्त आहे—- ☆ संग्राहक – सौ.अस्मिता इनामदार ☆
(For all senior citizens)
वय झाले अजून मस्ती गेली नाही
विचार धावतात पण शरीर साथ देत नाही
कळते आहे पण वळत नाही
कोणावर विश्वास ठेवायचा तेच समजत नाही
तरी पण मी मस्त आहे—–
काय होतय सांगता येत नाही
दुखतात गुढगे सांगायचे नाही
कुणाकडे जाताही येत नाही
सावकाश चालायचे हेच आता उरले
तरी पण मी मस्त आहे—–
थकले शरीर जरी
नजर अजून शाबूत आहे
थकल्या जीवाला
थोडी उभारी देत आहे
तरी पण मी मस्त आहे—–
आताशा मोजकेच दात तासून त्यावर टोप्या ( cap) घातल्यात
तेव्हा कुठे दुःख थांबले
कुस्करून खाल्ले
तेव्हां पचायला लागले
तरी पण मी मस्त आहे—–
वाचायला घेतले धुरकट दिसते
चष्मा लावला तर पाणी सुटते
डोळे पुसत वाचण्यापेक्षा
न वाचलेले परवडते
तरी पण मी मस्त आहे——-
लिहायला घेतले तर हात कापतात
शब्दांवरच्या रेषा सरळ कुठे येतात
साधी स्वाक्षरी पण धड येत नाही
चेक परत का येतात तेच समजत नाही
तरी पण मी मस्त आहे——
उलटा बनियन तर नेहमीच असतो
तरी बरे तो आत झाकला जातो .
घरातले हसतातच
तरी पण मी मस्त आहे——
कानात हुंकार वाजत असतात
शब्द अस्पष्ट ऐकू येतात
अनुभवाने समजून घेतो
आणि मगच उत्तर देतो
तरी पण मी मस्त आहे——
वाचायला घेतले तरी लक्ष लागत नाही
वाचलेले सुद्धा काही लक्षात रहात नाही
मित्रांशिवाय कुणाला काही सांगत नाही
समदुःखाची कथा बाकीच्यांना पटणार नाही
तरी पण मी मस्त आहे—–
बरेच आयुष्य जगून घेतले
अजून थोडे बाकी आहे
उरलेले मात्र सुखात जावे
येवढीच इच्छा बाकी आहे
तरी पण मी मस्त आहे—–
संसाराचे सारे पाश
आता पूर्ण सोडायचे आहेत
उरलेली पुंजी संपे पर्यंत
आनंदी जगायचे आहे
तरी पण मी मस्त आहे—–
आपल्याच धुंदीत जगलो आहे
पाहिजे ते मिळवले आहे
उपभोगून आयुष्य सारे
गात्रे शिथिल होत आहेत
तरी पण मी मस्त आहे—–
आयुष्यात ज्यांनी साथ दिली
काहींनी मधेच साथ सोडली
कोणाचेच काही अडलं नाही
तरी सर्वांचा मी आभारी आहे
आणि मी मस्त आहे——
भार कोणावर टाकायचा नाही
झटपट मात्र बोलावणे यावे
इतरांना हवेहवे वाटतांना
आपण निसर्गात विलीन व्हावे
तरी पण मी मस्त आहे—–
—आणि हे देवा ,
तिथे पण मी मस्त रहावे——
संग्राहक : अस्मिता इनामदार
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈