श्री मिलिंद जोशी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ डार्क वेब : भाग – 1 ☆ श्री मिलिंद जोशी ☆ 

(ही अतिशय महत्वपूर्ण माहिती देणारी लेखमाला दर सोमवारी आणि मंगळवारी प्रकाशित होईल) 

मी महाविद्यालयात शिकत असताना लोकांमध्ये संगणकाबद्दल खूप आकर्षण होते. कारण त्याबद्दल फारशी माहिती नव्हती. मी असेही अनेक महाविद्यालयात शिकवणारे शिक्षक बघितले आहेत जे म्हणायचे, “तुमच्या कांपूटरपेक्षा आमचे कालकूलेटर भारीये.” एक शिक्षक तर त्याही पुढे जाऊन म्हणायचे, “क्याम्पूटर लैच भारी असतो, बटन दाबलं का माहिती भायेर…” महाविद्यालयात शिकविणाऱ्या शिक्षकांची ही गत होती तर सामान्य माणूस कसा असणार? इथे मी त्या शिक्षकांना नावे ठेवत नाही. ठेवणारही नाही. कारण जे विषय ते शिकवत होते त्यात ते पूर्णतः पारंगत होते. आणि संगणक हा त्यांचा विषयही नव्हता. त्यावेळी मला तरी कुठे अंतरजालाबद्दल ( इंटरनेट ) काही माहिती होती? पण हे सांगायचा उद्देश इतकाच की संगणकाबद्दल इतके अज्ञान लोकांमध्ये होते. त्यामुळे त्याबद्दल कुतूहलही जास्तच.

त्यावेळी ‘हम आपके है कौन’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातील नायिका, माधुरी दीक्षित हिच्या तोंडी एक वाक्य देण्यात आले होते. तिला विचारले जाते, “बाई गं, तू काय शिकतेस?” आणि ती सांगते “कम्प्युटर्स…” ( हे संवाद हिंदीत होते हं ) तिच्या तोंडी दिलेला तो शब्द ‘ती किती हुशार आहे’ हे सांगण्याचा प्रयत्न होता. आणि त्यात दिग्दर्शकाला यशही आले होते. 

१९९२ मध्ये शाहरुखखानचा एक चित्रपट आला होता. “राजू बन गया जंटलमन”. त्यात एक प्रसंग येतो. चित्रपटाचा नायक अभियंता ( इंजिनिअर ) म्हणून मुलाखत द्यायला जातो. मुलाखत घेणारे त्याला काही प्रश्न विचारतात. नायक आपली हुशारी दाखवत त्या लोकांनी केलेल्या आधीच्या कामात ५ करोड रुपये कसे वाचवता आले असते हे सांगतो. मुलाखत घेणारे लगेच संगणकासमोर बसलेल्या यंत्रचालकाला (  कॉम्प्युटर ऑपरेटर हो ) विचारतात, ‘बाबारे, तुझा संगणक काय सांगतोय?” आणि संगणकासमोर बसलेला माणूस त्याच्या समोरील कळफलकावर ( कीबोर्ड ) आपली बोटे चालवतो. आणि सांगतो, ‘या व्यक्तीने सांगितलेले पूर्णपणे बरोबर आहे.’ हा चित्रपट श्रीरामपूरमध्ये १९९३ मध्ये मी बघितला होता. आणि तो प्रसंग बघून त्यावेळीही मला हसू आवरले नव्हते. का? अहो जी गोष्ट मुख्य अभियंत्याला जमली नाही, ती गोष्ट एक साधा यंत्रचालक अगदी आठ दहा सेकंदात सांगतो हे कितपत पटू शकेल? बरे हे सांगत असताना संगणकाच्या पडद्यावर काय दिसते तर ‘आज्ञावलींची यादी.’ ( फाईल लिस्ट ). त्यावेळी आम्ही ‘DIR/W’ ही आज्ञा संगणकातील आज्ञावलींची यादी बघण्यासाठी वापरत होतो. मग हसू नाही येणार तर काय? पण ही गोष्टही त्यावेळी प्रेक्षकांनी खपवून घेतली.

आता काळ बराच बदलला आहे. चित्रपटही जास्तीत जास्त लोकांचा विश्वास बसेल अशा गोष्टी दाखवू लागले आहेत. परवानगीशिवाय एखाद्याच्या संगणकाचा वापर करणाऱ्या ( हॅकिंग ) विषयावरील चित्रपट याचे चांगले उदाहरण आहे. पण त्याचसोबत युट्युबवर आजकाल असेही अनेक चलचित्र ( व्हिडिओ ) आपल्याला सापडतात, जे एकतर अर्धवट माहितीवर आधारित असतात किंवा काल्पनिक माहितीवर. आणि विशेष म्हणजे अनेक लोक आजही त्यावर विश्वास ठेवतात. अनेकांच्या मनात त्याबद्दल विनाकारण भीती निर्माण होते. याचे चांगले उदाहरण म्हणजे ‘काळेकुट्ट अंतरजाल’. ( डार्क वेब हो ) त्याबद्दलच्याच अनेक गोष्टी मी अगदी छोट्या छोट्या लेखांमार्फत वाचकांसमोर मांडायचा प्रयत्न करणार आहे. याचा उद्देश फक्त लोकांच्या मनातील विनाकारण भीती कमी करणे इतकाच असेल. 

(या आधीही काही जणांनी मला विचारणा केली होती की मी शक्य तितक्या मराठी शब्दांचा वापर का करतो? हे मी माझ्यासाठी करतो. माझा मराठी भाषेतील शब्दसंग्रह वाढावा यासाठीचा माझा हा प्रयत्न आहे.)

– क्रमशः भाग पहिला 

©  श्री मिलिंद जोशी

वेब डेव्हलपर

नाशिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments