श्री मेघःशाम सोनवणे
इंद्रधनुष्य
☆ इथे खरोखरंच ओशाळला मृत्यू !… – लेखक : विद्याधर गणेश आठवले ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆
दोन वर्ष पूर्ण व्हायच्या आतच आमच्या स्क्वाड्रनला पुन्हा हलवण्याचा निर्णय झाला. आम्ही सगळा मांडलेला पसारा आवरून जामनगरला आलो. अजूनही आमच्याकडे तीच जुनीपुराणी हंटर विमानं होती आणि नवीन विमानं मिळण्याची शक्यता दुरापास्त असल्यामुळे आम्ही याचा पार्ट त्याला, त्याचा पार्ट याला करत करत शिळ्या कढीला ऊत आणण्यासाठी झटत होतो !
जामनगरला पठाणकोट सारखंच प्रचंड मोठं एअर फोर्स स्टेशन होतं. खूप मोठा टेक्निकल एरिया, खूप मोठा डोमेस्टिक एरिया, सिनेमा थिएटर, स्विमिंग पूल, रिक्रिएशन सेंटर, डार्क रूमसह सर्व सुविधा युक्त हौशी फोटो क्लब, अशा नागरी सुविधा होत्या! सुकाॅय ७, मिग २१ आणि मि ८ हेलिकॉप्टर तसंच बेल हेलिकॉप्टरच्या स्क्वाॅड्रन होत्या. त्यात आता आमच्या हंटरची भर पडली !
सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे पासष्ट आणि एकाहत्तरच्या युद्धातील वाॅर हिरो, किलर ब्रदर्स पैकी, ग्रुप कॅप्टन डी किलर जामनगरला आमचे स्टेशन कमांडर होते ! साक्षात किलर सरांना प्रत्यक्ष भेटण्याच्या कल्पनेनेच मी हरखून गेलो होतो ! किलर सर, जठार सर हे म्हणजे साक्षात ‘काळ ‘ असं बरंच काही ऐकलेलं असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती!
किलर सरांनी आणि जठार सरांनी युद्धांमधे पाकिस्तानी एअर फोर्सच्या धावपट्या उखडून, चहूबाजूंनी गोळ्या लागून चाळण झालेली, पेटती विमानं आणून आपल्या रनवेवर उतरवली होती! या असामान्य कामगिरी बद्दल त्याना शौर्य पदकं मिळाली होती! कोणत्या मटेरियलचं काळीज बनवलं असेल परमेश्वराने या माणसांचं ! !
विमानाला गोळ्या लागून आग लागलेली असताना, आपला जीव वाचविण्यासाठी, विमान सोडून ‘बेल आऊट’ न करता, त्या विमानाचे काही ना काही पार्टस् वापरता येतील आणि आपल्या देशाचं काही फाॅरेन एक्सचेंज वाचेल या उदात्त हेतूने, स्वतःच्या जीवावर उदार होऊन ते विमान आणून आपल्या विमानतळावर उतरवण्यासाठी आपलं सर्व कौशल्य पणाला लावणारे योद्धे ज्या देशाकडे असतील त्यांना जगातलं कोणतंही आणि कितीही शक्तिमान राष्ट्र पराभूत करू शकणार नाही, प्रत्यक्षात किलर सरांना पाहिल्यावर माझा भलताच भ्रमनिरास झाला! नावच किलर असलेला माणूस भयंकर उग्र व्यक्तिमत्वाचा असणार अशी माझी कल्पना होती!
हा लाल गोरा अँग्लो इंडियन माणूस अतिशय प्रसन्न आणि गोड चेहर्याचा होता! अत्यंत प्रेमळ स्वभाव! सगळ्यांना सांभाळून घेण्याची कामाची आश्वासक पद्धत! सगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीज मधे उत्साहाने सहभागी व्हायची हौस! उतरंडीतल्या शेवटच्या पायरीवरच्या माणसाच्या सुद्धा खांद्यावर हात टाकून, त्याची समस्या स्वतः समजून घेऊन त्यावर उपाय करण्याची धडपड! देवाने हे एक वेगळंच रसायन घडवलं होतं!
आकाशात जीवघेण्या भराऱ्या मारणाऱ्या, या उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या माणसाकडून मी जमिनीवर रहाणं किती महत्वाचं असतं ते शिकून घेतलं! ‘तुमच्या सहकार्यांच्या कोंदणात तुम्ही किती घट्ट बसला आहात त्यावर तुमचं पद, तुमची प्रतिष्ठा किती अधिकाधिक उजळून निघणार हे अवलंबून असतं ‘ हा एक खूप महत्वाचा धडा, किलर सरांचं प्रशासकीय कौशल्य जवळून निरखताना आपोआप मिळाला, ज्याचा मी पुढे उच्च पदावर काम करताना मला खूप फायदा झाला! यशाची गुरुकिल्लीच किलर सरांनी नकळत माझ्या हाती सोपविली!
एका रोमहर्षक प्रसंगात ‘किलर’ म्हणजे काय ते प्रत्यक्षच पहायला मिळालं ! एका मिग- २१ चं टेस्ट फ्लाईंग करण्यासाठी किलर सरांनी टेक ऑफ घेतला. आकाशात झेपावल्या क्षणीच, विमानाची कॅनाॅपी (फायटर विमानात पायलटला बाहेरचं पहाता यावं म्हणून ठेवलेलं फायबरचं पारदर्शक कवच) उडून गेली ! हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा अपघात होता! आता कल्पना करा की, डोळ्यावर शील्ड नसली तर ऐंशी किलो मीटर वेगाने मोटर सायकल सुद्धा चालवता येत नाही! हा माणूस बाराशे नॉटिकल माईल्स वेगाने टेक ऑफ घेत असताना याच्या डोळ्यासमोरची विंड शिल्ड नाहीशी झाली! काय करावं या माणसाने?
विमान सोडून तात्काळ इजेक्ट करायला हवं होतं! नियंत्रण कक्षातून तशा सूचनाही दिल्या होत्या, पण नवं कोरं विमान सोडून देणाऱ्या माणसाचं नांव किलर असूच शकत नाही! त्यांनी नियंत्रण कक्षाला उलट सांगितलं, “क्रॅश लँडिंगची तयारी करा! मी विमान उतरवतोय!”
क्षणात अनेक सिग्नल्सची देवाण घेवाण झाली. किलर सरांच्या वरिष्ठांनी कळकळीची विनंती केली, ” ‘किलर’ या देशासाठी विमानापेक्षा किंमती आहे! विमान सोड!” किलर सरांनी बहुदा सांगितलं असावं, “Don’t worry Sir, you will have both!”
रनवेवर क्रॅश लँडिंगची तयारी झाली. प्रत्येक जण आपापलं कर्तव्य करण्यासाठी सज्ज झालेला होता आणि मनात, “देवा, किलर सरांना वाचव.” अशी तळमळीने प्रार्थना करत होता. डोळ्यांना काहीही दिसत नसताना, केवळ इच्छाशक्ती आणि अनुभवाच्या जोरावर सर्किट मधे फिरून त्यांनी फ्युएल संपवलं आणि आपण लँडिंग करत असल्याची सूचना दिली! नियंत्रण कक्षाकडून आपण परफेक्ट लँडिंग लाईनवर आहोत याची खात्री करून घेतली आणि त्या ऐतिहासिक क्षणाकडे सरकायला सुरुवात झाली. प्रत्येक जण श्वास रोखून, काळजावर दगड ठेवून, आता पुढे काय वाढून ठेवलंय त्याची प्रतिक्षा करत होता!
विमानाचं अंडर कॅरेज सुरक्षितपणे उघडलं! तीनही चाकं व्यवस्थित बाहेर पडली! विमान उंची कमी करत करत योग्य दिशेने रनवेकडे येऊ लागलं! विमान इतक्या परफेक्ट लाईनवर होतं की पायलटला काही दिसत नाहीये हे खरंच वाटत नव्हतं! प्रत्यक्षात नियंत्रण कक्षातून मिळणाऱ्या फक्त सूचनांच्या बळावर विमान उतरत होतं!
सर्व काही सुरळीत होत आहे असं वाटत असतानाच विमान एका बाजूने कलंडल्या सारखं झालं आणि विमानाच्या मागच्या दोन चाकांपैकी एक चाक बॅरियरच्या सिमेंट पोलला टच झाल्यामुळे तुटून गेलं. आता मागचं एकच चाक उरलं होतं, ते टेकून नीट बॅलन्स झाला तर पुढचं टेकणार! गती आणखी कमी करण्यासाठी, चाक तुटताच किलरसरांनी टेलशूट (मागे उघडणारं पॅराशूट) ओपन केलं होतं !
शेवटी विमान एका बाजूला घसरून बाॅडी घासल्यामुळे आग लागणार, हे आता सगळ्यांना कळून चुकलं होतं! क्रॅश व्यवस्थापन पुढच्या भयंकर प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी अति सज्ज झालं होतं !
अति समिप….सावधान….
विमानाची गती संपता संपता ते तिरकं तिरकं जात असताना काँक्रिटच्या रनवेवर बाॅडी टेकणार नाही असं दोन चाकांवर बॅलन्स करत ते रनवे सोडून बाजूच्या मातीवर आल्याची खात्री पटल्यावरच किलर सरांनी इंजिन स्विच ऑफ केलं आणि विमानाला आग लागण्यापासूनही वाचवलं!
डाॅक्टरनी किलर सर कसे आहेत ते पहाण्यासाठी काॅकपिटकडे धाव घेतली. त्यांच्या चेहऱ्यापासून संपूर्ण शरीर इतकं सुजलं होतं की सेफ्टी बेल्ट कापून काढल्यानंतर सुद्धा त्याना काॅकपिटमधून बाहेर काढणं अवघड झालं होतं! चेहर्यावर ना नाक दिसत होतं ना डोळे! बेल्ट कापता कापताच ते बेशुद्ध झाले! कसंबसं काॅकपिटमधून बाहेर काढून त्याना आय एन एस वलसुरा ला नेव्हीच्या हाॅस्पिटलमधे दाखल केलं, तेव्हा ते कोमात गेले होते!
सतरा दिवस मृत्यूशी झुंज देऊन ह्या महारथीने अचाट पराक्रम करून देशाचं एक विमान आणि एक जिगरबाज पायलट वाचवला आणि पुन्हा आकाशात झेप घ्यायला सज्ज झाला !
इथे खरोखरंच ओशाळला मृत्यू !
लेखक : श्री विद्याधर गणेश आठवले.
प्रस्तुती – मेघःशाम सोनवणे
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈