? इंद्रधनुष्य ? 

☆ भारतातली पहिली महिला सिव्हिल इंजिनियर – शकुंतला भगत ……… सुश्री स्मिता जोगळेकर  ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ☆ 

(देशातले ६९ पूल आज तिच्यामुळे उभे राहिलेत!) 

देशाची सर्वांगीण प्रगती अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यापैकीच एक घटक म्हणजे त्या देशातल्या सोयीसुविधा किती दूरपर्यंत पोहोचलेल्या आहेत! आजसुद्धा आपल्याकडे अनेक गावे अत्यंत दुर्गम आहेत. तेथे पोहोचायला वाहतुकीची साधने नाहीत, दळणवळणाच्या सुविधा नाहीत. देशात असूनही अशी ‘बेटे’ त्यांच्या दुर्गम स्थानामुळे प्रगतीपासून दूर आहेत. या पार्श्वभूमीवर पूलांचे मोठे योगदान आहे. या पुलांनी गावे एकमेकांना ‘जोडण्याचे’ महत्त्वाचे काम केले आहे; अनेक गावांवरचा दुर्गमपणाचा शिक्का पुसायला मदत केली आहे.                      

शकुंतला भगत यांचे नाव आपल्यापैकी फार कमी लोकांना माहिती असेल. त्या भारतातल्या पहिल्या महिला सिव्हिल इंजिनियर. भारतातल्या ६९ आणि जगभरातल्या २०० पुलांच्या निर्मितीत त्यांचा सहभाग आहे. त्यांनी पूल बांधणीच्या क्षेत्रात केलेले काम आजही भल्याभल्यांना चकित करते. निवडलेल्या कामाची तीव्र आवड असेल तर कुठल्या कुठे पोहोचता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे शकुंतला भगत.                        

शकुंतला यांचा जन्म १९३३ मधला. त्या काळाचा विचार करता मुलीने इंजीनियर होणे ही खूपच मोठी गोष्ट होती. वडिलांनी शिकायला प्रोत्साहन दिले. शकुंतला जोशी म्हणून इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवलेल्या या मुलीने इंजिनिअरिंगच्या विषयांमध्ये त्वरित गती पकडली. तिचे वडील स्वतः एक उत्तम अभियंता होते. १९४२ च्या चले जाव आंदोलनात ते सहभागी झाले होते. ते विचारांनी इतके पुढारलेले होते की मुलीने आपले इंजिनीअरिंगचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लग्न केले नसते तरी त्यांना चालणार होते. 

१९५३ मध्ये शकुंतला जोशी यांनी मुंबईच्या वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट म्हणजेच व्हीजेटीआय या विख्यात संस्थेतून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आणि त्या भारतातल्या पहिल्या महिला सिव्हिल इंजिनियर बनल्या. शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर त्यांनी एका ठिकाणी फॅक्टरी ट्रेनी म्हणून कामाला सुरुवात केली. पण एकदा काम करत असताना छोटासा अपघात होऊन त्या किरकोळ जखमी झाल्या. त्यावेळी त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी पुन्हा एकदा वडिलांनी त्यांना कणखर आधार दिला. त्यांनी त्यांना डिझाईन इंजिनियर म्हणून काम करण्यासाठी जर्मनीला पाठवले. जर्मनीहून त्या १९५७ मध्ये भारतात परतल्या.                    

त्यानंतर त्यांनी अजून एक धाडस केले ते म्हणजे प्रेमविवाह. काळाच्या कितीतरी पुढे जात त्यांनी आपल्या पसंतीचा जोडीदार निवडला. तोही इंजिनीअर नसलेला! अनिरुद्ध भगत यांचे स्वतःचे ऑटोमोबाईल गॅरेज होते. एवढी शिकलेली मुलगी एका गॅरेजमालकावर प्रेम करते हे कळल्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या. शकुंतला यांनी मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहात लग्न केले आणि संसारही निभावून नेला. अर्थात त्यासाठी अनिरुद्ध भगत यांची साथ मोलाची ठरली. भगत यांचे उत्पन्न पुरेसे नसल्यामुळे शकुंतला यांनी आर्थिक जबाबदारीही स्वीकारली. त्यांनी १९५९ ते १९७० या काळात आयआयटी, मुंबई येथे सिव्हिल इंजीनियरिंगच्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी केली.                                      

या काळात त्यांनी मध्ये दोन वर्षांसाठी सब्बटिकल (प्राध्यापकांना शिक्षण घेण्यासाठी विद्यापीठाकडून मिळणारी भरपगारी रजा) घेऊन युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया इथून मास्टर्स पूर्ण केले. पुढे १९७० मध्ये शकुंतला भगत यांनी आपले यजमान अनिरुद्ध भगत यांच्यासह क्वाड्रीकॉन नावाची पूल बांधणी करणारी कंपनी स्थापन केली. या कंपनीने वेगवेगळी रुंदी आणि विस्तार असलेले पूल अल्प खर्चात तयार केले. त्यासाठी त्यांनी प्री-फॅब्रिकेटेड(आधीच तयार करुन ठेवलेल्या) सुट्ट्या भागांचा वापर केला. तसेच हे भाग एकमेकांना जोडण्यासाठी बिजागऱ्यांसारख्या जोडणीचा वापर केल्यामुळे त्यासाठी कमी स्टील वापरावे लागे. अस्तित्वात असलेला एखादा पूल मोडकळीस आला असेल तर त्याला आधार देण्यासाठी त्यांनी टोएबल ब्रिज या नव्या प्रकारच्या पुलांचे डिझाईन तयार केले. हे पूल नादुरुस्त पुलांखाली वापरून मोडकळीस आलेल्या पुलावरूनदेखील अवजड वाहनांची वाहतूक करणे शक्य होऊ लागले.                            

हा काळ एकंदरच देशाच्या विकासाचा आणि भरभराटीचा होता. हिमालयालगतच्या प्रदेशात बांधल्या गेलेल्या पुलांमुळे त्या प्रदेशाचे चित्र पालटू लागले होते. इतके दिवस भौगोलिक दृष्टीने दुर्गम असलेले भाग क्वाड्रीकॉनने उत्तर आणि ईशान्य भारतात बांधलेल्या ६९ पुलांमुळे आज उर्वरित भारताशी जोडले गेले आहेत. याशिवाय युके, युएस, जर्मनी या देशांमध्येही त्यांनी पूल बांधले आहेत.                          

त्यांच्या मुलांच्या म्हणण्यानुसार त्यांची आई नि वडील दोघांमध्येही प्रचंड इच्छाशक्ती होती. अगदी जेवायला बसल्यावरही त्यांच्यातल्या चर्चा कामाभोवतीच फिरत. कधी त्या चर्चांमधून वादही रंगायचे. पण एकदा का एक निर्णय झाला आणि तो कंपनीच्या हिताचा आहे यावर शिक्कामोर्तब झाले की वाद थांबे. मग जणू काही झालेच नाही अशा थाटात हे नवराबायको खेळीमेळीने संभाषण सुरू करत. आपण उभारलेली संस्था बहरावी म्हणून त्यांनी त्या काळात सर्व प्रकारचे धोके स्वीकारले, पण कंपनीची घोडदौड कायम ठेवली. जेव्हा त्यांच्या कल्पनांमध्ये गुंतवणूक करायला सरकार किंवा खाजगी कंपन्या राजी नव्हत्या तेव्हा त्यांनी पैसा उभा करण्यासाठी स्वतःचे घर गहाण टाकले, दागदागिने विकले, पण स्वप्ने सत्यात उतरवून दाखवली. कधी एखाद्या साइटवर छोटासा जरी अपघात झाला तरी घरात सुतकी वातावरण असे. त्यांच्यासाठी त्यांची कंपनी घराइतकीच जवळची होती. पण म्हणून त्यांचे घराकडे दुर्लक्ष झाले नाही. उलट करिअरची एकेक शिखरे सर करत असताना शकुंतला यांनी कौटुंबिक आघाडीही तितक्याच ताकदीने सांभाळली. एवढे सगळे करूनही जर्मनीत असताना परिचित झालेल्या वेस्टर्न क्लासिकल सिंफनीज ऐकण्यासाठी त्या खास वेळ काढत.                             

त्यांच्या तिन्ही मुलांनी त्यांना अतिशय पद्धतशीरपणे काम करताना पाहिलेले आहे. त्या काळात संगणक नसल्यामुळे वह्यांमध्ये आकडेमोड करणारी, एखादे डिझाईन मनासारखे उतरेपर्यंत वहीत रेखाटने करण्यात गढून गेलेली आई आजही त्यांच्या डोळ्यासमोर आहे. इतरांपेक्षा आपल्या आई नक्कीच वेगळी आहे, जिथे एकही स्त्री नाही अशा क्षेत्रात ती समर्थपणे पाय रोवून उभी आहे याचा अभिमान त्या मुलांना वाटला नाही तर नवलच! त्यांच्या फॅमिली पिकनिक्ससुद्धा बहुतेक वेळा कंस्ट्रक्शन साइटवरच असायच्या. त्यामुळे नकळतच मुलांवर कामाचे संस्कार झाले. मोठमोठ्या स्ट्रक्चर्समधील बारकावे, त्यांची तपशीलवार तपासणी याबद्दल मुलांना आई-वडिलांकडूनच शिकायला मिळाले.

सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पुलांची बांधणी सगळ्यात अवघड मानली जाते. पण याच विषयाला हात घालत, त्याला आपलेसे करत शकुंतला भगत यांनी जी उभारणी केली आहे त्याला तोड नाही.                               

 

– स्मिता जोगळेकर

संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments