सौ राधिका -माजगावकर- पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘…पंढरीच्या वाटेवर’- वारीवर्णन : श्री सारंग कुसरे ☆ माहिती संग्रहिका आणि शब्दांकन : सौ राधिका-माजगावकर-पंडित ☆

आयुष्याचं गणित सोपं करून सांगणारी माणसं इथे वारीत भेटतात.

मनांत असलेली भक्ती, साऱ्या गात्रात भरभरून वाहणारी शक्ती घेऊन ‘ती’  पारूमाऊली दिंडीतून जरा बाजूला होऊन सावलीला विसावली.मिटल्या डोळ्यांपुढे सावळा पंढरी नाचत होता, ती त्याच्या पायाशी वाकली. आणि म्हणाली ,” किती नाचतोस ? दमशील नां रे बाबा ! थांब! मी तुझे पाय दाबते.असं म्हणून ती पुढे वाकली खरी, पण हे काय ? आपल्याच पायाला हा कोणाचा  स्पर्श ? डोळे उघडले तर एक हंसतमुख तरुण म्हणत होता , ” माऊली दमली असशील,अगं! मी वारीतला सेवेकरी.पंढरीला या वेळी नाही येऊ शकत. पण तुझ्या रूपात इथेच मी पंढरी पाहीन . पाय मागे घेऊ नकोस. तुझ्या फोड आलेल्या अनवाणी पायांना जरासं तेल लावतो. तेवढीच रखुमाईची सेवा केल्याचा आनंद.आणि तो पंढरीच्या वाटेवरचा तरुण सेवेकरी सेवेला भिडला.

अडचणीवर मात करून, आहे त्या परिस्थितीचा स्विकार करून विठ्ठल भक्तीची ‘आस ‘ तिची सेवा करून पूर्ण करणाऱ्या त्या सेवेकऱ्याच्या डोळयातली धन्यता फार मोठं भक्तीचे ‘ सार ‘ सांगून गेली.

आमच्या सन सॅटॅलाइट सोसायटीतले हुशार,अतिशय उत्साही, हौशी, परदेशवारी करून आलेले चिरतरुण श्री. सारंग कुसरे पंढरीच्या वारीत सामील झाले आहेत .त्यांचे अनुभव त्यांच्या कडून ऐकताना, अक्षरशः वारी डोळ्यासमोर उभी राहते. आणि आपणच पंढरीच्या वारीत सामील झाल्याचा आभास होतो . इतकं अप्रतिम वर्णन ते करतात.  कमी शिकलेल्या साध्या भोळ्या माणसांच्या, पण जगातलं मोठं तत्त्वज्ञान अंगीकृत बाणलेल्या, अनुभवसिद्ध ज्ञानाचं  खूप सुरेख वर्णन केलं आहे. श्री सारंग म्हणाले , ” छोट्याशा दुकानांत त्यांना पिठलं, भात,  चुलीवरची भाकरी मिळाली. त्या अन्नाला  पंचपक्वानांची चव होती. त्या माउलीला, “अन्नदात्री सुखी भव ” असें म्हणून तृप्तीची ढेकर देतांना त्यांनी विचारलं, ” मालक कोण आहेत या दुकानाचे ?   पुढे येत सांवळासा तरुण म्हणाला, ” माऊली मालक पंढरीला , विटेवर उभा आहे.मी नाही  तो आहे मालक .आम्ही  अवाक झालो, त्या भक्ती भावाने,  आणि त्याच्या बोलण्याने”.

पुढील वाटचालीत वारकऱ्यांची गैरसोय झाली.त्या गैरसोईला सामोरे जाताना  वारकरी म्हणतात . “अरे गैरसोईला सोय म्हणतो, गैरसोईतूनच सोय शोधतो तोच खरा वारकरी.”  गैरसोईतही पॉझिटिव्ह असलेले सारंग म्हणाले, “पैशाची रास करून गाद्या गिरद्यांवर लोळून जे समाधान मिळालं नाही तो आनंद चांदण्या मोजत, ‘ नीले गगन के तले ‘आम्ही, शाळेच्या पटांगणात झोपून लुटला.आणि साध्या सतरंजीवर शांत झोपलो.अंधाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या, अभंग,झिम्माफुगडी खेळणाऱ्या, अभंगावर नाचत ठेक्याचा ताल धरून आनंद तरंगात तरंगणाऱ्या या वारकऱ्यांकडे बघून मनांत येत,या श्रद्धायुक्त भक्तांकडे एवढा उत्साह एवढी ऊर्जा येते कुठून ?एका वारीतच आपण गार होतो. 18 वाऱ्या करणारे भाग्यवान पंढरीच्या वाटेवरून धावत असतात. श्री सारंग म्हणाले, “अभंगाशी ही माणसं इतकी तन्मय होतात आणि अभंग असे गातात की आपण त्या काळात केव्हां पोहोचतो कळतच नाही. प्रगल्भ विद्याविभूषित पंडित सुद्धा एक वेळ अडखळेल. पण न थांबता  टाळ् मृदंगाच्या ठेक्यावर  वारकरी म्हणतो, ” तुकोबाची कांता सांगे  लोकांपाशी..   गोसावी झाले गं माझे पती”आणि हे ऐकतांना तल्लीन झालेल्या सारंग ह्यांनी आपल्या मधुर आवाजात त्या ओळी गाऊन टाळ वाजऊन,सगळ्यांची वाह वा! मिळवली. स्रिची भावना 

स्रिचं ओळखू शकते हे लक्षात येऊन माझ्या मनात आलं, तुकाराम पत्नी जिजाऊंची मनातली व्यथा,आणि संसाराची कथा, व्यथेने भरली आहे. मातीच्या घरात गरिबीतही कोंड्या चा मांडा करून संसार करण्याची अगदी साधी अपेक्षा होती तिची. पण नवऱ्याच्या वैराग्याने गरिबीतही तिने हार नाही मानली.मनाला मुरड घालून तिने संसार केला.तुकारामांची कीर्ती जगभर पसरली. पण त्यांच्या यशामागे उभी असलेली ही अर्धांगिनी अंधारातच राहीली. नाथ असूनहीं ती अनाथ होती.कारण तुकारामाचे संसारात लक्षचं नव्हतं.एकतर्फी संसार चालवणाऱ्या त्या असामान्य मनोधैर्याच्या  माऊलीला माझा भक्तीपूर्ण नमस्कार.     मी म्हणेन खूप काही घेण्यासारखं होतं तिच्यापासून.

 विठ्ठल नामाचा गजर करताना  वारकऱ्यांची सगळी गात्र विठ्ठलाधिन होतात. वारकऱ्यांच्या मुखात अभंग असतात मग हात तर,टाळ वाजवण्यासाठी मुक्त हवेत ना? म्हणून धोरणांनी ते  वारीला निघताना शबनम  घेतात.सारंगना घरून  निघतांना प्रश्न पडला होता, मी बरोबर चप्पल घेऊ का स्लीपर?  झब्बा कुर्ता घेऊ की  सदरा?  छत्री की रेनकोट ? या प्रश्नमंजुषेत ते फिरत होते. तर तिकडे वारकरी विचार करीत होते मी कोणता अभंग म्हणू ? आणि कोणतं भजन गाऊ ? त्यातून बरेचसे अभंग अगदी तोंडपाठ होते त्यांचे. त्यातले काहीजण निरक्षर असूनही श्रवणशक्ती व तल्लख  मेंदूच्या जोरावर आणि विठ्ठल प्रेमावर ते भजनात तल्लीन व्हायचे. यासाठी कुठल्याही शाळा कॉलेजात जाण्याची त्यांना गरजच पडली नाही.जगाच्या शाळेत त्यांनी ही भक्तीची डिग्री मिळवली होती.

हम भी कुछ कम नही,’ असं म्हणून पुढे  असणाऱ्या बायकाही सेवेच्या बाबतीत मागे नसतात. अन्नपूर्णेच व्रत घेऊन कष्टाला भिडणाऱ्या वारीतल्या बायका,पोळ्या पिठलं भाकरी करून आपल्याबरोबर इतरांचीही पोटोबा शांती त्या करतात. दहा बारा पोळ्या  केल्यावर कमरेचे टाके ढीले होणाऱ्यांना त्या मोठ्या आकारात व मोठ्यां प्रमाणात पोळ्या करून पोटभर वाढून त्या  लाजवतात.आपल्या चार पोळ्या तर त्यांची एकच मोठी पोळी पाहून खाण्याआधीच खाणारा गार होतो. कारण त्या पोळीत रामकृष्ण असतो. विठ्ठल रखुमाई असते आणि अन्नपूर्णेचा वास असतो. प्रत्येक जण वारीत सेवाभावी असतो शक्ती प्रमाणे खारीचा वाटा उचलण्यात या भक्ती सागरात तरुणही न्हांहून निघतात. वयस्करांची हातपाय दाबून सेवा,रुग्णांना मलम पट्टी करणे,प्लॅस्टिक गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे याआणि अशा कामांबरोबर अपंगांची, आंधळ्यांची ते काठी होतात. काही तरुण, वारकरी माऊलींना फुकट चार्जिंगची सोय करून देतात.वारकऱ्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या त्यांच्या घरच्यांना खुशाली नको का कळायला! म्हणून घरच्यांशी संवाद साधून देतात. इथे ‘स्ट्रगल’  असूनही  आनंद आहे. सकारात्मक विचारांची जोड आहे . नामस्मरणात दंग असल्याने कुविचारांना अति विचारांना इथे थारा नाही. कौन्सिलर ची गरज असते लोड गादीवर लोळणाऱ्या,रिकाम्या मनातल्या रिकाम टेकडयांना. ईथे निराश  व्हायला कुणी रिकामच नसत.विठ्ठल नामांत, विठ्ठल भक्तीत ते अखंड बुडाले आहेत . आणि म्हणूनच मला मनापासून खूप खूप कौतुक वाटतं ते सारंग सारख्या उत्साही तरुणांचं.परदेशात विमानाने सुखात आरामात प्रवास करण्याचा आनंद जितक्या तन्मयतेने त्यांनी घेतला तितक्याच समाधानाने त्यांनी हा खडतर प्रवास आनंदाने स्विकारला आहे.पुढील वाटचालीसाठी त्यांना आपण मनःपूर्वक शुभेच्छा देऊया. श्री.सारंग यांचे विचारही प्रगल्भ आहेत ते उत्तम शिघ्र कवी,कलाकार आहेत.त्यांच्या गाण्यात कमालीचा गोडवा असून बारकावे शोधून वारी वर्णन करण्यात  त्यांचं कसब अप्रतिम आहे. ते म्हणतात, “एकदा मनाने ठरवलं की सगळं होतं”. वारी प्रवास संपत आला, एक सुंदर गाणं आठवल त्यांना,…. दोन ओडक्यांची होते सागरात भेट.. त्याचे वारकरी त्यांना भेटले असतील. या जनसागरात वारकरी संप्रदायात त्यांना खूप खूप आनंद अनुभव,भरपूर ऊर्जा मिळाली. माणसातले देव  भेटले. चारीधामचा आनंद, पुण्य  मिळाल. माऊलीचा अतिशय सुंदर अर्थ त्यांना उमगला. सुरेख वर्णन धावपट्टीवरचंच होतं. ते पुढे म्हणतात, मा… म्हणजे मानवता. ऊ म्हणजे उदारता. आणि ली म्हणजे लिनता.. अतिशय सुंदर माऊली चा अर्थ सांगून श्रद्धेचा सुरेख सारीपाटच वारकऱ्यांनी आपल्यापुढे मांडला आहे. या सामान्य वाटणाऱ्या पण असामान्य बुद्धीनें, सकारात्मक विचाराने, जीवनाचा आनंद घेणाऱ्या,वारकऱ्यांना माझा   म्हणजे सौ.राधिकेचा शिरसाष्टांग  नमस्कार असो. …

मी पदवीधर आहे,खूप सुवर्ण पदके मिळवली आहेत. मला उच्च स्थान आहे. हा माणसांचा गर्व इथे वारकऱ्यांपुढे,  पंढरीच्या वाटेवर गळून पडतो… नतमस्तक होऊन मी म्हणते .धन्य ती माऊली.,धन्य ते तुकाराम, आणि धन्य धन्य ते पंढरीच्या वाटेवरचे वारकरी.  

 मंडळी आपणही विठ्ठल नामाचा गजर करूया. जय  जय राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. माऊली माऊली,

वारीवर्णन : श्री सारंग कुसरे

© सौ राधिका – माजगावकर – पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments