श्री मिलिंद जोशी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ डार्क वेब : भाग – 4 ☆ श्री मिलिंद जोशी ☆ 

(ही अतिशय महत्वपूर्ण माहिती देणारी लेखमाला दर सोमवारी आणि मंगळवारी प्रकाशित होईल) 

डार्कवेब बद्दल जे काही गैरसमज आहेत त्यातील एक प्रमुख गैरसमज म्हणजे, ‘डार्कवेबचा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे.’ हा गैरसमज इतका प्रचलित आहे की उद्या एखाद्याने कुणाला सांगितले की, ‘मी डार्कवेबचा वापर केला आहे’, तर लगेच त्याच्याकडे कुणीतरी मोठा गुन्हेगार आहे असे बघितले जाते. किंवा मग तो खूप मोठा हॅकर असल्याचा समज करून घेतला जातो. 

आजपर्यंत कोणत्याही देशाने डार्कवेबवर बंदी घातलेली नाही. भारतात तर त्याबद्दल कोणते कायदेही नाहीत. त्यामुळे कुणी आपल्या लॅपटॉपवर टोर ब्राउजर इंस्टाल केले असेल तर तो आपल्या देशात गुन्हा नाही. ते फक्त एक साधन आहे. आपण जोपर्यंत त्यावर कोणतेही बेकायदेशीर काम करत नाही, कायद्याच्या कचाट्यात येत नाही. 

हे समजवण्यासाठी एक अगदी घरघुती उदाहरण देतो. आजकाल प्रत्येकाच्या घरात सुरी असतेच. वेगवेगळ्या आकारात ती सुपरमार्केटमध्येही मिळते. ज्यावेळी आपण तिचा वापर फळे / भाजी कापण्यासाठी करतो, ती साधन असते, पण तीच एखाद्याच्या शरीरावर चालवली तर? तर त्याला शस्त्र म्हटले जाते. वस्तू एकच आहे पण तिचा वापर काय होतो त्यानुसार वस्तूचे नांव बदलते. हीच गोष्ट डार्कवेबचा वापर करण्यासाठी बनवलेल्या टोर ब्राउजरबाबतही लागू होते. 

डार्कवेबचा वापर कायद्याने गुन्हा नाही तर लोकांना त्यापासून दूर राहण्याचा सल्ला का दिला जातो? त्याचे कारण एकच. इथे ज्या गोष्टी केल्या जातात त्यावर कोणत्याही सरकारचे नियंत्रण नसते. समोरची व्यक्ती खरी की खोटी हेही आपल्याला माहित नसते. अशा वेळी आपण फसवले जाण्याची टक्केवारी अनेक पटीने वाढलेली असते. त्यापासून वाचावे यासाठीच इथे जाऊ नये असे सांगितले जाते. तसेच काही जण अनवधनाने एखाद्या अशा साईटवर गेले, जिथे हत्यारांची विक्री होत असेल, लहान मुलांच्या अश्लील फिल्म बनवल्या जात असतील, स्त्री पुरुषांची खरेदी विक्री केली जात असेल, बंदी घालण्यात आलेल्या नशिल्या पदार्थांची विक्री केली जात असेल तर मात्र ते कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतात. जसे भारतात रस्तावर चालताना ‘डाव्या बाजूने चालावे हे मला माहिती नव्हते’ असे सांगता येत नाही, तसेच इथेही आहे.   

या संदर्भात अजून एखादे उदाहरण द्यायचे झाले तर, अनेक मोठ्या शहरात ‘रेड लाईट एरिया’ असतो. त्या शहरात राहणाऱ्या लोकांना ते माहितीही असते. पण अनेकदा त्याच्या जवळपास राहणारे लोक जवळचा रस्ता म्हणून त्या भागातून कायम ये जा करतात. त्यांना त्याबद्दल कुणीही विचारत नाही. पण समजा त्या भागात पोलिसांची धाड पडली आणि तुम्हीही त्या भागात सापडला, तर पोलीस तुम्हालाही त्यांच्यातील एक समजून अटक करू शकतात. अर्थात ज्यावेळी तुम्ही त्यांच्यातील नाहीत याची पोलिसांची खात्री पटेल, तुम्हाला सोडून दिले जाईल. पण ते होईस्तोवर तुम्हाला जो मनस्ताप होईल त्याचे काय? किंवा लोकांचा तुमच्याबद्दल जो गैरसमज होईल त्याचे काय? हाच विचार करून आपल्या घरचे आपल्याला सांगतात, ‘बाबारे… त्या भागात जाऊ नकोस.’ तीच गोष्ट याबाबतही आहे.

सावधानीचा इशारा : डार्कवेब वापरणे कायद्याने गुन्हा नाही, पण त्यावरचा वावर तुमची सिस्टीम हॅक होण्यास कारणीभूत ठरू शकतो. किंवा नशीब अगदीच खत्रूड असेल तर पोलिसांशी प्रश्नोत्तरेही होऊ शकतात. 

क्रमशः भाग चौथा 

©  श्री मिलिंद जोशी

वेब डेव्हलपर

नाशिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments