? इंद्रधनुष्य ?

झाशीवाली शौर्य शालिनी ! – भाग – १ – लेखिका : मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी (नि.) ☆ प्रस्तुती – जुईली अमोल ☆

१८ जूनची सकाळ. आज सूर्याला शेवटचं अर्घ्य ! दामोदरला अलगद बाजूला करून राणी लक्ष्मीबाई निघाली. तोच करारी पोशाख, डोळ्यात निखारे, मनात अतूट निर्धार आणि चित्तात कमालीची स्थिरता! ती जय –पराजयाच्या खूप पुढे निघून गेली होती. १३ मार्च १८५४ रोजी या रणलक्ष्मीनं झाशीच्या दरबारात बुंदेलखंडाचा राजकीय प्रतिनिधी मेजर रॉबर्ट एलिस याच्यासमोर गर्जना केली होती, ‘मेरी झाँसी नही दूँगी!’ ती होती अन्यायाविरुद्ध ललकार, ती होती रक्तातली स्वातंत्र्याची उपजत उर्मी !

“Is Jhansi Rani overrated? Why is she so glorified?” असं सहजपणे विचारणाऱ्या व्यक्तींनी तिचा संघर्ष अवश्य अभ्यासावा आणि या वाक्याचं उत्तर शोधावं. “मोठी झाशीची राणीच लागून गेलीस!” असं एखाद्या धीट मुलीला आजही अगदी सहजपणे म्हंटलं जातं. किती पिढ्या उलटल्या तरी लहान मुली चंद्रकोर,मोत्याची माळ मिरवत झाशीची राणी होऊन स्पर्धेसाठी उभ्या रहातात! असं काय होतं या वीरांगनेत की तिचं धाडस या भारताची ओळख म्हणून गौरवलं गेलं?आघाडीवर राहून सक्षमपणे सैन्यनेतृत्व करणारं लक्ष्मीबाईचं शौर्य हे केवळ प्रासंगिक किंवा परिस्थितीवश आलेलं नव्हतं. तर अगदी बालपणापासून तिच्या चारित्र्यात, तिच्या निर्णयांमध्ये ते दिसून येतं. त्याला सखोल आणि ठाम अशी भूमिका होती. तिची आंतरिक शक्ती,तिचं आत्मबळ तिच्या शौर्यातून प्रकटलेलं दिसून येते. तिचे शब्द अंतस्थ प्रेरणा होऊन सैनिकांचं मन,मनगट बळकट करत असत.

महाराज छत्रासालांकडून थोरल्या बाजीरावांकडे १७२९ साली झाशीची सुभेदारी आली. पुढे पराक्रमी सरदार रघुनाथ हरि नेवाळकरांच्या अथक मेहनत आणि दूरदृष्टीतून झाशी समृद्धीच्या शिखरावर पोहोचली. १८१७ साली पेशवाईचे सगळे अधिकार संपुष्टात आले तेव्हा इंग्रजांनी झाशीला वंशपरंपरागत पद्धतीनं ते सांभाळण्याची परवानगी दिली होती.

पेशव्यांच्या पदरी दिवाणी कामकाज करणाऱ्या मोरोपंतांची ही कन्या मनुबाई (मनकर्णिका) गहू वर्णाची, सुविद्य,संस्कृत साहित्यात विशेष रमणारी, शस्त्रविद्यापारंगत होती. देहयष्टी फार मजबूत नव्हती, पण अंगी साहस मात्र दुर्दम्य! १८४२ साली या तेजस्वी युवतीचा गंगाधरपंतांशी विवाह झाला कर्तव्यबुद्धीला जणू अधिकारांची जोड मिळाली. नेवाळकरांची कुलस्वामिनी महालक्ष्मी. म्हणून तिचं नाव ठेवलं ‘लक्ष्मीबाई’! स्वतंत्रपणे प्रजेसाठी निर्णय घेत त्यांच्यात ती सामावून गेली. तिचा हळदीकुंकू कार्यक्रम राजपरिवारापुरता मर्यादित न ठेवता झाशीतल्या समस्त स्त्रिया, तरुणी यांनाही तिनं सामावून घेतलं. एकमेकींना हळदी कुंकू लावणारे हे हात राणीसाठी एक दिवस शस्त्रं चालवणारे सामर्थ्यशाली हात झाले!

अवघी चार वर्षांची असतांना झालेला मातृशोक, तान्ह्या पुत्राचा वियोग आणि पाठोपाठ गंगाधरपंतही १८५३ साली निवर्तले. अशा किती आघातांना सोसून ती पुन्हा उभी राहिली. तत्कालीन समाजावर रूढीचा घट्ट पगडा असतानाही राणीनं केशवपन करून लाल अलवण नेसण्यास ठामपणे नकार दिला. स्वतःचा राजधर्म जाणत दत्ताकपुत्र दामोदरला मांडीवर घेऊन तिनं प्रशासन हाती घेतलं. इंग्रजांनी अखेरीस झाशी किल्ला, खजिना सगळं ताब्यात घेतलं तरी पुन्हा झाशी आपल्याकडे येणार ही केवढी तिची दृढ इच्छाशक्ती !

इ. स. १८५७ मध्ये जागोजागी भारतीय सैन्यात स्वातंत्र्य समराचा वणवा पसरू लागला. झाशीजवळ नैगांग या लष्करी ठाण्यात सैन्यांनं मोठं बंड पुकारलं. 

‘खुल्क खुदाका |मुल्क बादशाह का |अंमल रानी लक्ष्मीबाईका ||’

ही घोषणा सर्वदूर पसरली. अनेक इंग्रज अधिकारी मारले गेले. या धुमश्चक्रीमध्ये योग्य संधी बघून राणी लक्ष्मीबाई प्रजेला अभय देत पुन्हा झाशीच्या सिंहासनावर आरुढ झाली. फितूर झालेल्या भाऊबंदाना तिनं कैदेत टाकलं. सैन्यासह चालून आलेल्या नत्थेखानाला अद्दल घडवून परत पाठवलं. झाशीनं कात टाकली. बाजारपेठा फुलल्या! सैन्य सशक्त झालं, तोफा बुरुजांवर चढल्या. दारुगोळ्याचा कारखाना सुरू झाला.

राणीचं व्यक्तिमत्व फार अलौकिक होतं. पहाटे व्यायामापासून तिचा दिवस सुरू होत असे. हीच पळत्या घोड्यावरमांड टाकून भाला फेकणारी वीरश्रीयुक्त सुस्नात काया शुभ्र वस्त्रात व्रतस्थ होऊन धर्माचरण करे तेव्हा ती मूर्तिमंत सात्विकता वाटे! तर दरबारात पायजमा, अंगात गडद रंगाचा अंगरखा, डोक्यावर केशरी रंगाची रेशमी रत्नजडित टोपी, त्यावर बांधलेली सुंदर बत्ती, कमरेला जरीचा दुपट्टा आणि त्याला लटकवलेली रत्नखचित तलवार असा एका राज्यकर्तीला शोभेल असा कडक पोशाख आणि करारी मुद्रेनं ती वावरत असे. अतिशय स्पष्टपणे आज्ञा देत ती दिवाणी,फौजदारी खटले ऐकून न्यायदान करणारी ती एक कुशल प्रशासिका होती.

एक प्रभावी सेनापती म्हणून राणीच्या सैन्यात शिस्त, अनुशासन होतंच पण त्याला भावनेचा स्पर्शही होता. युद्धानंतर सैनिकांचे घाव स्वतः बांधण्यासाठी ती जातीनं उपस्थित असे. त्यांच्या कामगिरीवर खूश होऊन त्यांना पदके देऊन गौरवणं, संकटात घाबरून न जाता सैन्याला खंबीर करणं असे असंख्य गुण तिला सेनापती म्हणून वेळोवेळी सिद्ध करतात. या ओळी प्रसिद्ध होत्या –

 जिन्ने (जिसने) सिपाही लोगोंको मलाई खिलाई l

आपने (स्वतः) खाई गुडधानी – अमर रहे झांसी की रानी |

– क्रमश: भाग पहिला 

लेखिका : मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.)

प्रस्तुती : जुईली केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments