श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ तीनशे एकोणचाळीसावे प्रस्थान ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
वारी…! ‘वा’सनांची ‘री’घ लागलेली असते मानवाच्या जीवनवाटेवर! ‘वा’म मार्गाला जाण्याची ‘री’त सहजपणे अनुसरण्याची सवय असलेले मन याच वाटेवरून तर चालत असते निरंतर! या वाटेला कोणतेही अंतिम गंतव्य स्थान नाही…अर्ध्या वाटेवरून पुन्हा माघारी फिरणे आणि संसाराचा ताप सहन करीत पुन्हा वाटेला लागणे नव्या जन्मात…पुनरपि जननं ठरलेलं…मरण तर असतंच…कितीदा जन्मून मरत असतील ना जीव? पण आपले जग मोठे भाग्यशाली…इथे वैराग्याची बाग फुलवणारे संत महात्मे जन्मले!
वारी….अलौकिक आनंदाची जी वाट शतकानुशतके ज्ञानोबाराय-तुकोबारायादी संत-महात्मे चालून निजधामाला पोहोचले…त्याच वाटेवर त्यांच्या पादुका पालखीत विराजमान करवून त्यांच्यासोबत चालणे ही कल्पनाच केवळ अवर्णनीय! जगाला तोवर देवतांच्या पालख्या माहित होत्या. देव आत गाभा-यात विराजमान असतात…या देवांचे मुखवटे पालखी नावाच्या विशेष सजवलेल्या आकर्षक आसनामध्ये विशिष्ट तिथीला किंवा काही ठिकाणी रोजच्या रोज मंदिरांच्या आवारात किंवा परिसरात भक्तीभावाने मिरवल्या जात. नंतर देवतांचे मूर्तिमंत प्रतिनिधी अशी ओळख धारण केलेल्या राजांनी मग हा अधिकार स्वत:ला बहाल केला! नंतर इतर अधिकारी या पालख्यामधून मिरवू लागले. पालखीचा मान हा दिला जाण्याची बाब होती..त्यासाठी स्पर्धाही असेलच आणि एकमेकांची असूयाही!
मानवी देहात येऊन आणि मानवी देहाला अनिवार्य असणारे भोग भोगून जगासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ झालेल्या चिरंजीवी संतांना त्यांच्या जीवनकालात पालखीचा लाभ झाला असेल की नाही,कोण जाणे!
परंतू, अवतार समाप्तीपश्चात का असेना…पण किमान आपल्या मराठी मुलुखात तरी हा मान संतांना अत्यंत नम्रतेने प्रदान करण्याचं मराठी मनाने मनावर घेतलं हे आपले भाग्यच!
प्रत्यक्ष महादेव हे पंढरीचे सर्वप्रथम वारकरी असल्याचं मराठी मन मानतं. तीच परंपरा कित्येक भगवदभक्तांनी अखंड ठेवली…तत्कालीन सामाजिक,धार्मिक,व्यावहारिक आणि नैसर्गिक गोष्टींना सामोरे जात जात.
जगदगुरू तुकोबारायांच्या कित्येक पिढ्या आधीपासून वारी होती…ती आजपर्यंत आहे. तुकोबाराय वैकुंठास निघून गेले त्यावेळी त्यांची भार्या आवली उर्फ जिजाबाई पाच-सहा महिन्यांच्या गर्भार होत्या…त्यांच्या पोटी नारायण आले! नारायण महाराज. धाकुटे तरी आध्यात्मिक अधिकार तोलामोलाचा. आकाशाएवढे जन्मदाते लाभलेले नारायण महाराज. पण त्यांना पित्याचा सहवास लाभू शकला नाही..! पंढरीच्या कित्येक येरझारा घातलेल्या आपल्या वडिलांच्या पादुका..चरणपादुका त्यांना शिरोधार्य होत्या. नारायण महाराजही पंढरीची नित्याची वारी धरून होते…एकेदिवशी त्यांच्या मनाने घेतलं….पित्यासोबत वारी केली तर?
काळ मुघली आक्रमणाचा होता…तरीही हे धाडस केले नारायण महाराजांनी….छत्रपती श्री संभाजी महाराजांचा पाठिंबा होताच…साजेशी पालखी सजवली…तुकोबारायांच्या पादुका पालखीत घातल्या….पण खुद्द तुकोबाराय स्वत:ला जाहिरपणे (आणि स्वत: विशिष्ट अधिकार प्राप्त केल्यावरही) पायीची वहाण म्हणवून घेत असतील तर ते एकट्यानं पालखीत बसले असते?…कदापि नाही! राजस सुकुमार ज्ञानियांचा ‘राजा’ असलेल्या माऊलींना त्यांनी प्रथम मान दिला असता…! जेष्ठ शुद्ध सप्तमीस नारायण महाराजांनी पालखीसह प्रस्थान ठेवले! त्या दिवशी देहूत मुक्काम ठेवून दुसरे दिवशी अष्टमीस तुकोबारायांची पालखी अलंकापुरीस नेली…देहू आणि आळंदी हाकेच्या अंतरावर..मोठ्या भक्तीभावाने माऊलीस समाधीतून क्षणभर जागृत केले…तुम्हीही चला तुकोबांसवे…तुम्हां दोघांच्या नामगजरात चालू आम्ही पंढरीची वाट! ज्ञानोबा-तुकाराम! ज्ञानेश्वर माऊली..ज्ञानराज माऊली तुकाराम! हा मंत्रच! माऊली गोड हसल्या…नारायण तर तुकोबारायांचे मूल..मुलाचा हट्ट पुरवला पाहिजे…! वैय्यक्तिक पातळीवरचा परमार्थ सार्वजनिक जीवनात आणून क्रांती घडवणा-या ज्ञानोबारायांस वारकरी भक्तांसवे वाटचाल करण्याची कल्पनाच भावली असावी….ज्ञानराज आपल्या वैभवासह पालखीत विराजले….नामाचा एकाच कल्लोळ उठिला….ज्ञानबा! नारायण महाराजांनी पित्याच्या नावाच्या आधी ज्ञानोबारायांचे नाव उच्चारले आणि मग तुकोबारायांचे ! एक आनंदपर्व आरंभले होते…भक्तीगंगेचा उगम ज्ञानोबा-तुकोबा हे दोन थेंब असले तरी ते थेंब जनसागरात मिसळून गेले आणि त्यांच्या अमृतस्पर्शाने सागर महासागर झाला…अध्यात्माचा,नैतिकतेचा,निर्मल,कोमल भगवदभक्तीचा अथांग महासागर! या सागरावरून वाहत येणा-या वा-याने संगे उत्तम आचरणाचे बाष्प वाहवून आणले…आणि उभा महाराष्ट्र चिंब होत राहिला!
हा क्रम सुरू राहिला काही काळ…बदल हा कालाचा स्थायीभाव. या एकात्म परंपरेत खंड पडला काही कारणाने…देहू आणि आळंदी यांचे पंढरीला जाण्याचे मार्ग भिन्न झाले…पण गंतव्य मात्र तेच राहिले…श्री विठ्ठल!
थोर भक्त हैबतबाबा चाफळकर अलंकापुरीस वास्तव्यास आले आणि इथलेच झाले…महापूर आला तरीही त्यांनी माऊलींस अंतर दिले नाही…पुढे आषाढी जवळ आली…त्यांनी ज्ञानोबारायांच्या पादुका स्वतंत्र पालखीत ठेवल्या…अल्पावधीतच वैभव वाढले…आणि कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज आळंदीहून स्वतंत्र प्रस्थान ठेवू लागले…पण तिथी मात्र तीच राखली…अष्टमी! आणि नामगजरही तोच…ज्ञानबा तुकाराम…ज्ञानोबा-तुकाराम! दोन्ही कडील वारकरी हरिपाठ गातात तो माऊलींचाच…आणि विशेषत: अभंग मात्र तुकोबारायांचे! अर्थात दोघांच्याही सोबतीला नामदेवमहाराज, एकनाथमहाराज,निळोबाराय होतेच…मुक्ताई होत्या,जनाई होत्या…अवघे संतनभोमंडळ होते आणि आजही असतात!
आधी एकाच मार्गावरील भाविकांना दर्शनाचा लाभ होई…आता दोन वेगवेगळ्या मार्गांवरील भाविकांस हा लाभ मिळू लागला. तुकोबारायांसोबतची वाटचाल आरंभी ज्ञानोबारायांच्या वाटचालीपेक्षा कठीण होती…पण आता दोन्ही मार्ग वैभवसंपन्न झाले आहेत….नारायण महाराज यांनी आरंभ केलेला हा ज्ञान-वैराग्य-आनंद सोहळा मोग-यासारखा बहरला आहे…आपण फुले वेचतो न वेचतो तोच पुन्हा वेल कळ्यांनी बहरू लागलेली असते…हा सुगंध महाराष्ट्राच्या कणाकणात असाच घमघमत राहो…ही ज्ञानोबा-तुकोबांच्या चरणी विनम्र प्रार्थना….नारायण महाराज आणि हैबतबाबांच्या चरणी वंदन…रामकृष्णहरि! ज्ञानोबा….तुकाराम….ज्ञानराज माऊली तुकाराम!
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈