सौ. गौरी गाडेकर
इंद्रधनुष्य
☆ ‘सावरकरांचा हास्यविनोद करतानाचा फोटो !’… लेखिका : श्रीमती नीलकांती पाटेकर ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆
सावरकरांचा हास्यविनोद करतानाचा फोटो ! … मी प्रथमच असा बघितला.
खूप वर्षांपासून शोधत होते.त्यांचा कुठलाच फोटो असा नाहीये.आणि मला तर असा फोटो बघायचाच होता.म्हणून मी चित्रा, माझी मैत्रीण,तिला म्हटलं, “मला त्यांना हसताना बघायचं आहे.”
हा तिने आत्ता पाठवला. बघितल्यावर कित्येक वर्षांची कोंडी फुटली.
सश्रम कारावासाच्या २ जन्मठेप शिक्षा….
११वी मध्ये कविता होती… ‘जयोस्तुते…’ नंतर नाटक वाचलं – ‘संन्यस्त खड्ग’.नंतर…
जिथं मिळेल तिथं वाचणं.
त्यांचं साहित्य वाचून वाटायचं, ‘किती प्रगल्भ, बुद्धिमान व्यक्ती ही!आणि त्यांनी सश्रम कारावास भोगला, अख्खं तारुण्य त्यात गेलं. साधं स्वस्थ आयुष्य कधी जगले असतील ते? काही हलकेफुलके क्षण असतील का त्यांच्या वाट्याला? अनेक क्षणी अनेक विचार.
शिवाजीपार्क मध्ये रहात होते, तेव्हा शेजारच्या मधुकरनी,आत्ताच्या उद्यान गणेशच्या मागची त्यांची बसायची जागा दाखवली.
समोरच सावरकर स्मारक आहे. आता “ते पार्काकडे तोंड करून, कित्येक तास बसायचे”… म्हणाला तो. आपल्याला स्वातंत्र्य मिळून बरीच वर्षं झाली होती.कदाचित हा मोकळा श्वास, त्याची आस, कसं समजणार मला हे? पार्काला फेरी मारताना, मला त्या जागी उगाचच जाणवायचे. गोल भिंगातले घारे तीक्ष्ण डोळे, कित्येक वर्षांच्या सश्रम कारावासाचा थकवा शरीरावर असावा. पण डोळ्यातली भेदकता तितकीच तीव्र असावी. त्यातच कधीतरी त्यांना हसरं बघायची इच्छा झाली मला.वाटलं, असेल की कुठं एखादा फोटो पण आज ५४ वर्ष झाली त्याला.
हल्लीच चित्राला म्हटलं, बघायचं आहे त्यांना, हसताना. मध्ये काही दिवस गेले आणि आज अचानक हा फोटो पाठवला तिनं. एरवी एकच स्टँडर्ड फोटो बघितला आहे. योगायोग कसा बघा. आज सकाळी, कुठला तरी जुना पेपर हाती आला. लता मंगेशकर, हृदयनाथ आणि ब. मो. पुरंदरे दिसले फोटोत. उत्सुकतेनं लेख वाचला, शिव कल्याण राजा. राज्याभिषेकाला साडे तीनशे वर्षे झाली शिवाजी महाराजांच्या ! ५० वर्षांपूर्वीची LP त्यात सावरकरांची कविता घेतली होती. हृदयनाथांनी लिहिलेला लेख तो.रमून गेले पार मी. त्यात असलेलं प्रत्येक गाणं – ते त्यात का समाविष्ट झालं, त्याचं प्रयोजन… हृदयनाथांना भेटले नाही कधी पण दीदीच्या संदर्भातली गाण्याची प्रत्येक गोष्ट त्यांच्या तोंडून ऐकताना राजसूय यज्ञात, यज्ञवेदीच्या रक्षेत लोळून, सोनेरी झालेल्या मुंगुसाप्रमाणे होते स्थिती माझी. ती हुरहूर जागवते, आत खोल जागवते निष्ठा आणि बरंच काही…
त्या LP मधले कवी दिग्गज.त्यात सावरकरही…पुन्हा तीच ओढ, त्यांना हसताना बघायचं.
आणि नोटीफिकेशनचा टोन वाजला.
बघितलं तर फोनच्या डोक्यावर लिहून आलं, चित्रा फडके. मी सगळं सोडलं हातातलं आणि उघडलं पेज, तर हा फोटो, म्हटलं तिला लगेच, ” व्वा ! किती छान वाटलं बघूनच ! डोळे निवले. बाकीचे दोघेही आहेत. पण मला दिसलं, त्यांचं हसू…” कुणाला वाटेल, काय वेडेपणा!
एव्हढी काय ती तगमग! हो. तगमगच. इतक्या वर्षांच्या सश्रम कारावासात, हरवलं तर नाही ना, हसू त्यांचं…? आयुष्यातली इतकीशी, इवलीशी गोष्ट हरवली आणि ज्या आमच्यासाठी त्यांनी कारावास भोगला, त्या आम्हाला साधी जाणीवही नाही ? आणि ओढ लागली त्यांचा हसरा चेहेरा बघायची, इतकंच…
लेखिका : श्रीमती नीलकांती पाटेकर
प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈