कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
इंद्रधनुष्य
☆ देवर्षी नारद – –… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆
अहो देवर्षिधन्योऽयं यत्कीर्ति शार्ङ्गधन्वन: |
गायन्माद्यन्निदं तंत्र्या रमयत्त्यातुरं जगत् ||
अहो! हे देवर्षी नारद धन्य आहेत. जे आपली वीणा वाजवीत भगवत- गुणगायनात तल्लीन होतात व संसारदुःखाने तप्त जीवांना सदा आनंदित करतात.
नर=पाणी. जलदान, ज्ञानदान आणि सर्वांना तर्पण अर्पण करण्यात पारंगत असल्यामुळे त्यांना नारद म्हणतात. ते वेद, उपनिषदांचे पारखे, देवांचे उपासक, पुराणांचे पारखी, आयुर्वेद आणि ज्योतिष शास्त्राचे महान अभ्यासक, संगीत तज्ञ आणि प्रभावी वक्ता आहेत.
आद्य पत्रकार, महागुरू व एकमेव देवर्षी असे नारद मुनी .देवर्षी नारद हे भगवान विष्णूंचे महान भक्त आहेत. ते विश्वाचे निर्माते ब्रम्हा आणि विद्येची देवी माता सरस्वती यांचे पुत्र आहेत. भारतातील ऋषीमुनींपैकी फक्त नारदमुनींनाच देवर्षी ही पदवी मिळालेली आहे कारण देवत्व आणि
ऋषीत्व या दोन्हीचा समन्वय त्यांच्यात होता. त्यांना ब्रह्मदेवांकडून वरदान मिळाले आहे. त्यामुळे ते आकाश, पाताळ ,पृथ्वी या तीनही लोकात भ्रमण करून देव ,संत महात्मे ,इंद्रादी शासक आणि जनमानसाशी थेट संवाद साधू शकत. त्यांची सुखदुःखे जाणून घेत अडचणी निवारण्याचा प्रयत्न करत म्हणूनच ते देवांना जेवढे प्रिय होते तेवढेच ते राक्षस कुळामध्येही प्रिय होते. पृथ्वी आणि पाताळ लोकातील माहिती देवांपर्यंत पोहोचवण्याचे काम देवर्षी नारद करत म्हणूनच त्यांना आद्य पत्रकार म्हटले जाते. ते सडेतोड पत्रकार होते. उन्हाळ्यात जल व्यवस्थापनाचा संदेश देताना नारद मुनींनी वाटसरूंसाठी रस्त्यावर ठिकठिकाणी पाणपोयी उभारण्याची कल्पना सर्वप्रथम राबवली. त्यांनी अनेक स्मृती रचून त्यात दंड विधान निश्चित करण्याचे काम केले. दंडाच्या भयाने तरी मानवाने गुन्हेगारी वृत्तीकडे वळू नये असा त्यांचा हेतू होता. त्यांच्या एका हातात वीणा असते तर दुसऱ्या हातात चिपळ्या. त्याद्वारे ते भक्तीचा प्रसार करत. कीर्तन भक्तीचे श्रेय नारद मुनींनाच आहे. नारद मुनी जगाला भक्तीचा सोपा मार्ग दाखवणारे, भक्तीरसाचा सुगंध देणारे मुनी आहेत .भक्ती म्हणजे काय हे जगाला पटवून सांगणारे देवर्षी नारद धर्मशास्त्रामध्ये पारंगत आहेत. त्यांनी नारद पुराणाची रचना केली. ते स्वतः उत्तम वक्ते आणि श्रोताही आहेत .भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ, राजा अंबरीश अशा महान व्यक्तिमत्त्वांना भक्ती मार्गावर त्यांनी नेले. नारद पुराण हे मानवाच्या सहिष्णुवृत्तीचे आदर्श उदाहरणच आहे. सर्व विषयात पारंगत नारद मुनी संगीताचे महागुरू आहेत. वीणा हे त्यांचे प्रिय वाद्य .सनत्कुमार कुलगुरू असलेल्या सर्वात पहिल्या विद्यापीठात नारदांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यावेळी सर्व विषयातील त्यांचे प्रभुत्व पाहून सनत्कुमार थक्क झाले होते. गॉड पार्टिकल किंवा ईश्वरीय कणाची संकल्पना त्यांनीच प्रथम मांडली. त्यांनी ज्योतिष विज्ञानाच्या व्यावहारिक वापराविषयी खगोलीय परिणाम सांगून रचना स्पष्ट केल्या. अतिसूक्ष्म परमाणूंपासून अतिविशाल विष्णू या कर्त्याच्या रूपात भ्रमण करत विश्वाला प्राणवायू प्रदान केला जातो .विष्णू म्हणजे विश्व+ अणु अशी व्याख्या त्यांनी केली.
नारद मुनींनी भृगु कन्या लक्ष्मीचा विवाह विष्णूशी लावून दिला. इंद्राची समजूत घालून ऊर्वशी आणि पुरुरवा यांचे सूत जमवले. महादेवांकडून जालंधरचा विनाश करवला. कंसाला आकाशवाणीचा अर्थ समजावला. इंद्र, चंद्र, विष्णू, शंकर ,युधिष्ठिर, राम,कृष्ण यांना उपदेश देऊन कर्तव्याकडे वळवले. ते ब्रह्माजींकडून संगीत शिकले .ते अनेक कला व विषयांत पारंगत आहेत. ते त्रिकालदर्शी आहेत. वेदांतप्रिय, योगनिष्ठ ,संगीत शास्त्री, औषधी ज्ञाता, शास्त्रांचे आचार्य व भक्ती रसाचे प्रमुख मानले जातात. ते श्रुती- स्मृती, इतिहास, पुराण, व्याकरण, वेदांग, संगीत, खगोल- भूगोल, ज्योतिष ,व योग यासारख्या अनेक शास्त्रांचे प्रचंड गाढे विद्वान आहेत.
त्यांनी पंचवीस हजार श्लोकांचे प्रसिद्ध नारद पुराण रचले. नारद संहिता हा संगीताचा उत्कृष्ट ग्रंथ रचला. नारद के भक्तिसूत्र, बृहन्नारदीय उपपुराणसंहिता,
नारद- परिव्राज कोपनिषद व नारदीय शिक्षेसह अनेक स्तोत्रे देखील त्यांनी रचलेली आहेत.
काही कारणामुळे प्रजापती दक्षाने त्यांना शाप दिला की दोन मिनिटापेक्षा जास्त काळ ते कुठेही राहू शकणार नाहीत. त्यामुळे नारद सतत भ्रमण करत असतात. ब्रह्माजींच्या शापामुळे ते आजीवन अविवाहित राहिले. त्यांच्या नावावर नारदभक्तिसूत्रे, नारद स्मृती, नारदपंचरात्र, संगीत मकरंद, राग निरूपण, पंचसारसंहिता, दत्तील नारदसंवाद असे ग्रंथ आहेत.
कळलावे आणि कलहप्रिय अशी त्यांची ख्याती आहे. पण या दोन्हींतून ते चांगल्याच गोष्टी करत होते.
नारद मुनींच्या काही मिनिटांच्या सत्संगाने वाल्याचा वाल्मिकी झाला. ते महर्षी वेद व्यासांचे गुरु होते.
नारदमुनी अमर आहेत. त्यांना कोटी कोटी प्रणाम.
लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈