डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘पाऊसवेडे कवी…’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

जीवघेण्या ग्रीष्म ऋतूची काहिली पृथ्वीचे अंग प्रत्यंग जाळतेय. जागोजागी भेगा पडून विच्छिन्न झालेली ही वसुंधरा जणू भग्न मूर्तीसारखी भकास बघतेय एकटक आसमंताकडे! या कोमलांगी प्रेयसीला समीराचे उष्ण श्वास अंतर्बाह्य पोळत आहेत, त्यावर ‘चंदनाची चोळी’ देखील शीतलता प्रदान करायला असमर्थ आहे! नजरेत प्राण एकवटून तिच्या अंतरीची आस वाट बघतेय, कुठं दिसतोय का ‘शामलवर्णीय मेघदूत’ अन त्याची चंचल खट्याळ सखी विद्युल्लता! कारण या दूताने ग्वाही दिल्याशिवाय तिचा प्रियतम अवतरतच नाही. अन एक दिवस या जीवघेण्या प्रतीक्षेचा अंत होतो. श्यामवर्णी मेघांच्या सेनेची अति जलद गरुडभरारी आसमंतात दृष्टिपथास येते! एका बाजूने आक्रमण करीत करीत संपूर्ण नीलाकाशाला व्यापून टाकीत युद्ध जिंकल्याच्या आनंदात त्यांचे गडगडाटी हास्य पृथ्वीला तिच्या प्रियकराची चाहूलच वाटते. मेघाच्या संगती त्याची प्रेयसी विद्युलता आपले चपलांगी हास्य करीत मेघांना रुपेरी रंगाने सजवते. हा जामानिमा तयार झाला की येतो पाऊस. आपल्या प्रेयसी वसुंधरेला कोवळ्या नाजूक सरींच्या स्पर्शाने हलकेच गोंजारून मग मात्र आवेगाने तिचे अंग अंग आपल्या सहस्रबाहू जलधारांनी कवेत घेत बरसतो! या प्रणयाचे साक्षीदार असतात वृक्षलता, आनंदाने आपला पिसारा फुलवून नर्तन करणारे मयूर आणि पावसाच्या एका थेंबानेच तृप्त होणारा चातक!

मंडळी, पाऊस म्हटला की सामान्यजनांना सय येते ती वाफाळलेल्या अदरक घातलेल्या कडक मीठी चाय अथवा जायफळ घातलेल्या धुंद वाफेने गंधाळलेल्या कॉफीची, सोबतीला गरमागरम कांद्याची किंवा तत्सम भजी असली तर ब्रम्हानंदी टाळी लागलीच म्हणून समजा आमची! पण या ‘कवी’ नामक फुलपाखरी गिरकी घेत पावसाचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तींची जातकुळीच वेगळी हो! आपण त्यांच्या शब्दभ्रमाच्या भुलभुलैयात मस्तपैकी जाणून बुजून बंदिस्त होऊन मज्जा मज्जा करीत ‘अंगे भिजली जलधारांनी’ असा अनुभव घ्यायचा!      

या मनोहर हिरवाईने लगडलेल्या, रंगीबेरंगी सुमनांच्या ताटव्याने बहरलेल्या वर्षाऋतूचा देखणा नायक असतो ‘पाऊस’! मराठी माणसाच्या मनांमनांत रुजलेले हिरवेजर्द काव्य म्हणजे बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांचे ‘बालभारती’ त प्रस्थापित ‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे । क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ।।’ ही आद्य पाऊस कविता! कितीही वेळा वाचा, हिची सर्वकालीन हिरवीकंच हिरवाई कधीच कोमेजत नाही. या बहुप्रसवी भूमीचे सृजन याच पावसाने फुलते. उन्हाने त्रासलेल्या मानवाला तर हा पाऊस म्हणजे आनंदच नव्हे तर नवसंजीवनी देणारा ठरतो. म्हणून तर पावसाळा हा ‘ऋतू हिरवा ऋतू बरवा’ (कवयित्री-शांताबाई शेळके) आहे.   

‘ऋतू हिरवा, ऋतू बरवा, 

पाचूचा वनी रुजवा

युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा’

लहान मुलांची (त्यांच्या लहानपणापासूनच) अन पावसाची गट्टी अश्शी घनदाट असते, की ‘ये रे ये रे पावसा रुसलास का माझ्याशी गट्टीफू केलीस का’ (कवयित्री-वंदना विटणकर) असे ती त्यालाच विचारतात. उत्तर मिळाले नाही तर मग ही मुले पाऊसदादाला सरळ एका ढब्बू पैशाचे आमिष द्यायलाही कमी करत नाहीत.  म्हणून तर अखिल बालक  मंडळी पहिल्या पावसाची एंट्री व्हावी म्हणून ‘ये रे येरे पावसा तुला देतो पैसा’, असे घोकत असतात. गोड छकुल्याने असा पैसा दिला की, गहिवरलेला आज्ञाधारक पाऊस लगेच हजर झालाच म्हणून समजा!  

आता बाळ थोडं मोठं झालं की त्याला अवचितच शाळा नामक खलनायिका भेटते. मग काय आता कवितेचा रागरंगच बदलतो. ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?’ (कवी-मंगेश पाडगावकर) असे म्हणत शाळेला वैतागलेली पोरं मग डायरेक्टली भोळ्या शंकरालाच साकडे घालतात. बघा कशी गंमत आहे, धो धो पाऊस अंगणात अन रानावनात कोसळतोय अन ही आई नावाची बाई मुलाला घरात कोंडून ठेवतेय! किती हा हिचा जाच! मग तिची विनवणी अन लांगूल चालन करावे लागणारच ना. ‘ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे’ (आमच्या अति लाडक्या कवयित्री-वंदना विटणकर) अन एकदाचं बाहेर पडलं की धुमशान पळतंय कसं बघा पोरगं पावसाच्या सरी झेलायला, अन गम्माडी गंमत करायला, दोस्तांबरोबर फेर धरत गाणी हवीच- ‘पिरपिर पिरपिर पावसाची, त्रेधा तिरपिट सगळ्यांची’ (परत वंदनाताईच हो!) किंवा झालंच तर ‘अग्गोबाई ढग्गोबाई, लागली कळ । ढगाला उन्हाची केवढी झळ । थोडी न् थोडकी लागली फार । डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ।।’ (कवी- संदीप खरे)

मैत्रांनो, आता जाऊ या तिथं, जिथं राधा अधीर होऊन म्हणतेय ‘रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे, पाणिच पाणी चहूकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे?’ (जनकवी पी. सावळाराम) निसर्ग कवी बा. भ. बोरकरांची ‘सरींवर सरी आल्या ग’ ही सदा प्रफुल्लित कविता आठवते कां? गोकुळात बरसणारा पाऊस, हिरवेगार कदंब वृक्ष, यौवनाच्या उंबरठ्यावर थबकलेल्या वेली, मेघांची गर्जना, विजेची पैंजणे आणि कृष्णधुन आळवणारी त्याची वेणू, यांच्या तालासोबत मनमोहक रंगांनी सजलेले आपले पिसारे फुलवीत मिरवणारे मयूर! त्यांच्यासोबत दुग्धधारांसारख्या भासणाऱ्या धवल जलधारांत सचैल न्हालेल्या गोपींचे कृष्णाशी एकरूप होण्याचे वर्णन बोरकरांनीच करावे! (ही समग्र कविता ऐकावी यू ट्यूब वर पु ल देशपांडेंच्या स्वरात!) 

☆ सरिंवर सरी: सरिंवर सरी… ☆

सरिंवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग

गोपी झाल्या भिजून-चिंब, थरथर कापती निंब-कदंब

घनांमनांतुन टाळ-मृदंग, तनूंत वाजवी चाळ अनंग

पाने पिटिती टाळ्या ग, सरिंवर सरी आल्या ग

मल्हाराची जळांत धून, वीज नाचते अधुनमधून

वनांत गेला मोर भिजून, गोपी खिळल्या पदी थिजून

घुमतो पावा सांग कुठून? कृष्ण कसा न उमटे अजून?

वेली ऋतुमति झाल्या ग, सरिंवर सरी आल्या ग

हंबर अंबर वारा ग, गोपी दुधाच्या धारा ग

दुधात गोकुळ जाय बुडून, अजून आहे कृष्ण दडून

मी-तू-पण सारे विसरून, आपणही जाऊ मिसळून

सरिंवर सरी आल्या ग, दुधात न्हाणुनि धाल्या ग

सरिंवर सरी: सरिंवर सरी….

कवी ग्रेस यांची ‘पाऊस कधीचा पडतो’ ही कविता मेघांनी आच्छादलेल्या आकाशासारखी गूढरम्य आहे. जणू विरहाचे दुःख डोळ्यांच्या पापण्यांतच थिजल्यासारखे वाटते!  

‘पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने

हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने’

मंडळी या निसर्गराजाच्या वर्षाऋतूत भावानुरागी कवीचे मन बरसणाऱ्या जललहरीं सोबत थुई थुई नाचत असते. या पावसाचे नखरेल रुप विविधरंगी आणि बहुढंगी! कधी कोमल हलकेच थेंबाथेंबाने अंगण भिजवणारा रोमांचकारक शिडकावा जणू स्मितहास्याची हळुवार लकेर, वा मंद शीतल समीराची झुळुकच, अथवा रसरंगात दंग असलेल्या मैत्रिणींच्या अंगांवर शिंपडलेले तजेलदार गुलाबपाणी समजा! या पावसाचा मूड पण वेगवेगळा असतो बरं कां! एखाद्या मैफिलीत जाणत्या शास्त्रीय गायकासारखा इंद्रधनुष्याच्या किनारीने नटलेली निलाकाशी शाल पांघरून कधी द्रुत तर कधी विलंबित तालात तो गायनी कला दर्शवतो, तर कधी हाच पाऊस नद्या, नाले, तडाग इत्यादींची तृष्णा एकाच वेळी भागवण्याकरता रसरसून अतिवेगाने अविरत बरसत असतो. 

ग्रीष्म ऋतूच्या गर्मीत तिष्ठत असलेल्या विराणी धरेला पहिल्याच भेटीत हळुवारपणे कवेत घेत तिच्यावर मृदगंधाची पखरण करणारा हा पहिला पाऊस तर कवीला अतिप्रिय, त्याच्या प्रणयिनीची आठवण करून देणारा! मंगेश पाडगावकर यांच्या प्रणयधुंद कवितेतील या ओळी पहिल्या ओलेत्या भेटीचे अत्तर शिंपीत येतात.  

‘भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची ।

धुंद वादळाची होती रात्र पावसाची ।।

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली ।

ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली ।

श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची ।।’

मैत्रांनो, या रमणीय वर्षा ऋतूचा अनुभव घेतल्यानंतर आता लेखाच्या अंती याच पावसाचे रौद्ररूप देखील स्मरण्याची वेळ आलीय! आकाश भयावह काळ्याकभिन्न राक्षससदृश मेघांनी संपूर्णपणे आच्छादलेले, त्यातच मध्ये मध्ये आपली समग्र शक्ती एकवटत सुरु असलेले विजेचे भीषण तांडव, नदी नाल्यांचा जीवानिशी मांडलेला आकांत ऐकणारे कुणीच नाही. ‘घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा’ (कवी- ग. दि. माडगूळकर) असा प्रलयंकारी घनघोर पाऊस वेड्यासारखा मुसळधार कोसळतोय. इतके दिवस पेरणी करून आकाशात डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी थिजले. अन आता त्याच पिकाची नासाडी करीत त्याच्या कमकुवत खोपट्याकडे तुच्छ नजरेने पाहणाऱ्या मस्तवाल पावसाला शेतकऱ्याची कारभारीण शिवी घालतेय, ‘आरं गाभ्रीच्या पावसा!’ (कवी – स्वप्निल प्रीत) 

‘आरं गाभ्रीच्या पावसा! आता कशी दया आली 

कवतिक नाही तुजं, जवा तहान आटली ।।धृ।।

ओली ठिगळाची चोळी, वर छप्पर गळते

कागदाच्या होडीवानी माजं खोपटं बुडते ।।१।।

आला पडशाचा ताप, कशी जाऊ मी कामाले

तुझा नाचणारा मोर, घास देतो का पोटाले ।।२।।

रित्या पोटी बाप ग्येला, डोळं होतं आभायाला

फक्त आईच्या डोयांत, तवा पाऊस पाह्यला ।।३।।

त्याच दुष्काळात माझं, सारं सपान सुकलं

आता नको तुझी माया, मन तुले उबगलं ।।४।।

प्रिय वाचकांनो, वरील लेखाकरता मी मुद्दामच बहुतेक गेय कविता निवडल्या आहेत. तुम्हाला भावणारी पावसाची नटरंगी रूपे एन्जॉय करतांना वाफाळत्या ‘चाया गरम’ बरोबर यू ट्यूबवर या कवितांचा आशयघन आस्वाद घ्यायला मात्र विसरू नका बरं कां! धन्यवाद! 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
3.3 3 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Asha

Wah wa all the beauty of season and literature simply described 🙏🏻

Vaishnavee Borgaonkar

Nice description