श्री मिलिंद जोशी
इंद्रधनुष्य
☆ डार्क वेब : भाग – 5 ☆ श्री मिलिंद जोशी ☆
खरे तर या भागात मी डार्कवेब वरील ‘रेड रूम’ याबद्दल भाष्य करणार होतो, पण मागील दोन भागात काही जणांनी विचारणा केली होती, ‘जर डार्कवेब इतके भयंकर असते तर लोक ते का वापरतात?’ किंवा ‘डार्कवेबचा वापर फक्त हॅकरच करतात का?’
एखाद्याला हे प्रश्न खूप बाळबोध वाटतील, पण हे प्रश्न बिलकुल बाळबोध नाहीत. कारण या प्रश्नांची उत्तरे आपल्या मनातील अनेक प्रश्नांचे निरसन करतात. त्यामुळे आजचा लेख याच प्रश्नांची उत्तरे काही प्रमाणात देणारा आहे. ‘काही प्रमाणात’ हा शब्दप्रयोग यासाठी केला, कारण इथे येणारा माणूस कोणत्या मानसिकतेचा असतो हे कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. अनेकदा माणसाची मानसिकता त्याला कुणी ‘ओळखत असते’ त्यावेळी वेगळी, आणि ‘ओळखत नसते’ त्यावेळी वेगळी असू शकते.
पहिल्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे झाले तर डार्कवेबचा वापर अनेक जण वेगवेगळ्या कारणासाठी करतात. त्यातील काही लोकांचा उद्देश चांगला असतो तर काहींचा वाईट.
ज्यावेळी कुणी डार्कवेबचा वापर करतो त्यावेळी ९९% त्याला त्याची ओळख लपवायची असते. डार्कवेब वापरण्यासाठी उपयोगात आणले जाणारे टोर ब्राउजर हेच काम करते. नव्वदच्या दशकात अमिताभ बच्चन यांचा एक चित्रपट आला होता. नाव होते शहंशाह. त्या चित्रपटात नायक पोलीस असतो. पण चित्रपटातील खलनायकांशी सामना करताना त्याला त्याचा गणवेश आड येणार असतो. कायद्याच्या चौकटीत राहून खलनायकांशी सामना करणे त्याला अवघड असते. त्यासाठी तो एक युक्ती योजतो. दिवसा लाचखोर पोलीस बनतो आणि रात्री शहंशाह बनून त्याच गुंडांना शिक्षा करतो. ज्यावेळी तो आपली ओळख बदलतो त्यावेळी आपोआपच त्याच्या मर्यादा कमी होतात. हीच गोष्ट इथेही असते. आपल्याला जर हे माहिती असेल की आपल्यावर कुणाचेतरी लक्ष आहे, किंवा कुणीही आपल्याला ओळखू शकतो, तर आपल्यावर अनेक मर्यादा येतात. तेच ज्यावेळी आपल्याला कुणी ओळखणार नाही अशी आपली खात्री पटते, आपले धारिष्ट्य वाढते.
ज्यावेळी आपण इंटरनेटचा वापर करत असतो त्यावेळी आपली ओळख असते आपल्या कॉम्प्युटरचा आयडी. जो एकमात्र असतो आणि तो कधी बदलता येत नाही. आता काहींच्या मनात असाही प्रश्न निर्माण होईल, जर आयडी बदलता येत नाही तर टोर ब्राउजर आपली ओळख कशी बदलते? याचे उत्तर आहे मास्किंग. थोडक्यात नवीन मुखवटा चढवणे. ज्यावेळी तुम्ही एखादा मुखवटा चढवतात त्यावेळी तुम्ही बदलत नाहीत, तर तुम्ही दुसरेच कुणी आहे असा भास निर्माण होतो. तो एक प्रकारचा बनाव असतो. ‘बदलणे’ आणि ‘बदलला आहे’ असे वाटणे यात फरक असतो. टोर ब्राउजर तुमच्या खऱ्या आयपीवर दुसऱ्याच एखाद्या आयपीची लेअर चढवते. अशा अनेक लेअर चढल्यावर तुम्ही इतरांशी जोडले जातात. त्यामुळे तुम्ही खरे कोण हे शोधणे अवघड होऊन बसते. इथे एक गोष्ट लक्षात घ्या. मी इथे ‘अवघड होते’ हा शब्द वापरला आहे, ‘अशक्य होते’ असे म्हटलेले नाही. कारण मी पहिल्यांदाच सांगितले आहे, टोर ब्राउजर आयपी बदलत नाही तर असलेल्या आयपीवर वेगळ्या आयपीची लेअर चढवते. जर एखाद्याने एकेक करून शेवटपर्यंत जायचेच ठरवले तर शेवटचा आयपी हा खराच असणार आहे. तो शोधण्यात जो वेळ लागेल त्या वेळात माणूस स्वतःला वाचविण्याचा वेगळा उपाय शोधतो.
डार्कवेबचा वापर चांगल्या कामासाठी देशाच्या सुरक्षा यंत्रणा, सैन्य तसेच पोलीस यंत्रणा यांच्याकडून केला जातो. यामागील उद्देश म्हणजे समजा अशा ठिकाणाहून एखादी माहिती लिक झाली तरी त्यावर सहसा विश्वास ठेवला जात नाही. आपोआपच लोकांचा अविश्वास हे एक प्रकारे त्यांच्यासाठी सुरक्षाकवच म्हणून काम करते. काही पत्रकार देखील गोपनीय माहिती मिळविण्यासाठी किंवा ती उघड करण्यासाठी डार्कवेब वापरतात. त्याच प्रमाणे हॅकिंग क्षेत्रात करिअर करणारे लोकही नवनवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी, त्याचे प्रयोग करण्यासाठी डार्कवेबचा वापर करतात. डार्कवेबसाठी वापरले जाणारे टोर ब्राउजर हे दर दिवसांनी नवीन अपडेट घेऊन येते. यावर कोणत्या जाहिराती नसतात, ते वापरायलाही फुकट आहे, तरीही याचे अपडेट येतात म्हणजे कुणीतरी त्यावर कायम काम करत असणार ना? मग त्यांना पैसा कोण देत असेल? याचा विचार केलाय कधी? अनेकांचा विश्वास बसणार नाही पण यासाठी फंडिंग करणारे अमेरिकन सरकार तसेच गुगल इंजिन सारख्या कंपन्या आहेत.
डार्कवेबच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक मोठमोठे घोटाळे उघड झालेले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी अनेक अप्रिय घटना वेळेआधीच रोखण्यात यश मिळवले त्याचे कारणही हे डार्कवेब हेच आहे. ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरी बाजू याच्या अगदी विरुद्ध आहे. छापा सोबत काटा असतोच ना. तो तर निसर्गनियम आहे. त्याला डार्कवेब तरी अपवाद कसे असणार? पण ते मात्र पुढील भागात.
क्रमशः भाग पाचवा.
© श्री मिलिंद जोशी
वेब डेव्हलपर
नाशिक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈