श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ माऊलींचा हरिपाठ… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
सर्वप्रथम मी निवेदन करतो की हरिपाठावर या आधी अनेक संत आणि अधिकारी सत्पुरुषांनी चिंतन लिहिले आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेल्या पाठावर ‘काही’ लिहिणे हे खरंतर माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसाचे काम नाही, तरीही मी माझ्या सद्गुरूंच्या आधाराने यथामती लिहिण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करीत आहे.
भगवंत प्राप्तीचा सर्वांगसुंदर मार्ग सर्व संतांनी स्वानुभूतीने सामान्य मनुष्यासाठी खुला करून दिला आहे. मनुष्य स्वाभाविकच स्वतःवर प्रेम करतो, त्यानंतर तो त्याच्या आवडीच्या माणसांवर, त्याच्या वस्तूंवर, घरादारावर, गाडी घोड्यावर, संपत्तीवर प्रेम करीत असतो. संत सांगतात त्याप्रमाणे हे प्रेम अंशतः का होईना स्वार्थी असतेच असते. या नश्वर जगात मनुष्य निःस्वार्थी प्रेम करू शकत नाही. जो मनुष्य निःस्वार्थी प्रेम करतो, तो सर्वांना आवडतो, त्यामुळे ती देवालाही प्रिय होतो. एका गीतात श्री. वसंत प्रभू म्हणतात
“जो आवडतो सर्वांना | तोचि आवडे देवाला|`”
परमार्थ साधणे म्हणजे अधिकाधिक निःस्वार्थ होणे. परमार्थ मार्गात गुरू शिष्याला नाम देतात आणि मग शिष्य त्या नामाचा अभ्यास करून परमार्थ साधण्याचा यत्न करीत असतो. माऊलींचे गुरू निवृत्तीनाथ यांनी त्यांना हरिनाम दिले. त्या नामाचा अभ्यास करून ज्ञानदेवांनी ज्ञांनदेव ते ज्ञानेश्वर इतकाच पल्ला गाठला नाही तर विश्वाची माऊली होऊन अवघाचि संसार सुखाचा करीन अशी ग्वाही दिली. माऊली म्हणतात,
“अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्हीं लोक ॥१॥ जाईन गे माय तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥ सर्व सुकृताचें फ़ळ मी लाहीन । क्षेम मीं देईन पांडुरंगी ॥३॥ बापरखुमादेवीवरु विठ्ठलेंसी भेटी । आपुले संवसाटी करुनि ठेला ॥४॥”
{अर्थ:- संसार हा दुःखरूप असून माऊली म्हणतात. तो संसार मी सुखाचा करीन याचा अर्थ संसार हा ज्या ब्रह्मस्वरूपा वर मिथ्या भासलेला आहे. ते ब्रह्म सुखरूप आहे. आणि मिथ्या पदार्थ अधिष्ठानरूप असतो. या दृष्टीने संपूर्ण संसार ब्रह्मरूपच आहे. असे मी ज्ञानसंपादन करून संसार सुखरूप करून टाकीन इतकेच काय त्रैलोक्य ब्रह्मस्वरूप आहे असे जाणून सर्व त्रैलोक्य आनंदमय करून सोडीन. हे जाणण्याकरीता त्या पंढरपूरास वारीला जाऊन माझे माहेर जो श्रीविठ्ठल त्याला मी आलिंगन देईल. त्या पंढरीरायाला आलिंगन देऊन आतापर्यंत केलेल्या माझ्या पुण्याईचे फळ मी प्राप्त करून घेईन. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या भेटीला आतापर्यंत जे जे भक्त गेले. त्यांना त्यांनी आपलेसे करून सोडले. म्हणजे तो भक्त परमात्मरूपच होतो. असे माऊली सांगतात.
सामान्य मनुष्याला स्वतःचा प्रपंच नेटका करता येतोच असे नाही, कारण त्याच्या प्रपंचात स्वार्थ जास्त असतो. संत होणे म्हणजे अत्यंत निःस्वार्थ होणे. म्हणून सर्व संत विश्वाचा प्रपंच करतात आणि सद्गुरू कृपेने ज्ञानेश्वरांसारखे संत विश्वमाऊली होत असतात.
माउलींचा हरिपाठ हा सर्वमान्य आणि लोकप्रिय हरिपाठ आहे. आजही अनेक ठिकाणी त्याचे नित्य पठण केले जाते. सातशे वर्षांपूर्वी लिहिलेला हरिपाठ गावोगावी कसा पोहचला असेल आणि मागील सुमारे सातशे वर्षे तो नित्य म्हटला जात असेल तर जागतिक आश्चर्य नव्हे काय ?
भगवन्नामाचे महात्म्य, महत्व आणि महती आपल्याकडील सर्व संतांनी मुक्त कंठानी गायिली आहे. ‘बिनमोल परंतु अमोल’ अशा नामांत मुक्ती, भुक्ती व भक्ती प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य आहे आई सर्वसंतांनी उच्चरवाने प्रतिपादित केले आहे. नामाने भवरोग नाहीसा होतो इतकेच नव्हे, तर सर्व शाररिक व मानसिक रोग नाहीसे करण्याची अगाध शक्ती भगवंताच्या नामांत आहे. प्रपंच व परमार्थातील नाना प्रकारच्या अडचणी, विघ्ने व संकटे नामाने सहज दूर होतात. अत्यंत नाजूक व साजूक असे भगवंतांचे प्रेमसुख मिळण्याचे भाग्य नामस्मरण करणाऱ्या नामधारकालाच प्राप्त होते. संसार ‘असार’ नसून तो परमेश्वराच्या ऐश्वर्याचा अविष्कार आहे अशी दृष्टी नामानेच प्राप्त होते. कर्म, वर्ण व धर्म यांचे बंड मोडून भगवतप्राप्तीचा मार्ग संतांनी केवळ नामाच्या बळावर सर्वाना खुला केला आहे. हरिपाठ म्हणजे विठूमाऊलीच्या गळ्यातील सत्ताविस नक्षत्रांचा हार आहे, असे म्हणता येईल. संत ज्ञानेश्वरांच्या संपूर्ण शिकवणुकीचे सारं म्हणजे हा हरिपाठ आहे असे म्हटले तर वावगे होऊ नये. एक कल्पना मांडतो. भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरीच्या सुमारे नऊ हजार ओव्या आणि हरिपाठाचे सत्तावीस अभंग. नऊ हजार ओव्यांचा अभ्यास सामान्य मनुष्याला तसा कठीणच जाणार यात वाद नसावा. पण तरीही ज्याला थोड्या वेळात आणि कमी श्रमात परमार्थ प्राप्ती करायची आहे त्याने या सत्तावीस अभगांचा अभ्यास केला तरी त्याचे काम होईल असे माऊली सांगतात. या हरिपाठ चिंतनाच्या निमित्ताने आपली सर्वांची नामावर असलेली निष्ठा आणिक वृद्धिंगत होवो ही सद्गुरू आणि माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो, सर्व सुजाण वाचकांना नमन करतो.
जय जय राम कृष्ण हरी।
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈