डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘थॅंक यू डॉक्टर…’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

(‘डॉक्टर्स डे’ चे औचित्य साधून)

डॉ. बी.सी. रॉय

नमस्कार मैत्रांनो!

“आधुनिक वैद्यकीय उपचारपद्धतीचा पाया रचणारे डॉ. विल्यम ऑस्लर यांचे प्रसिद्ध वाक्य आहे, ‘चांगला डॉक्टर रोगावर उपचार करतो; महान डॉक्टर हा रोग असलेल्या रुग्णावर उपचार करतो.”           

डॉ. बिधान चंद्र अर्थात डॉ. बी.सी. रॉय (१ जुलै, १८८२ – १ जुलै, १९६२) हे MRCP, FRCS या परदेशातील सर्वोत्तम पदव्यांनी अलंकृत असे निष्णात डॉक्टरच नाही तर आघाडीचे स्वातंत्र्यसेनानी होते. ते आधुनिक पश्चिम बंगालचे प्रणेते आणि दुसरे मुख्यमंत्री (१९४८-१९६१) होते. १९६१ साली त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. १ जुलै १९६२ रोजी रॉय ह्यांचे त्यांच्याच जन्मदिवशी निधन झाले. १९९१ पासून भारतात १ जुलै हा त्यांचा जन्मदिन आणि स्मृतिदिन आपण ‘डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा करतो.   

मी शपथ घेतो की….. डॉक्टर म्हणजे अजातशत्रू व्यक्तिमत्व. त्याला लढायचे असते ते रोग्याच्या आजाराशी. डॉक्टरांची ‘आचारसंहिता’ पूर्वापार चालत आलेली आहे. याबाबत एक उदाहरण आठवले. प्रत्यक्ष रावण पुत्र इंद्रजिताने लक्ष्मणावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केल्याने लक्ष्मण बेशुद्ध पडला होता. या निकराच्या लढाईत देखील, बिभाषणाच्या सांगण्यावरून रामाने सुषेण या रावणाच्या राजवैद्याला पाचारण केले. राज्याच्या आचारसंहितेपेक्षा आपल्या वैद्यकीय व्यवसायाची ‘आचारसंहिता’ पाळीत सुषेणाने हनुमानाद्वारे आणल्या गेलेल्या संजीवनी औषधीचा योग्य उपयोग करीत लक्ष्मणाला मृत्यूच्या द्वारातून परत आणले. आश्चर्य असे की रावणाने यावर आक्षेप घेतला नाही. हिप्पोक्रेटस असो वा चरकाची शपथ, त्यातील सर्वात प्रमुख गोष्ट आहे, “एक डॉक्टर म्हणून माझे प्रथम कर्तव्य रुग्णसेवा हेच असेल. यापरीस कुठलीही बाब माझ्या दृष्टीने गौण आहे.” मंडळी, दुसऱ्या महायुद्धात चिनी सैनिकांसाठी चिकित्सक म्हणून गेलेल्या निस्वार्थ डॉक्टर कोटणीस यांचे चीन मध्येच वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी प्लेगच्या साथीत रुग्णसेवा करतांना त्याच आजाराने निधन झाले. आपले चीनशी कितीही राजनैतिक वैर असू दे, पण संपूर्ण चीन देशासाठी डॉक्टर कोटणीस हे आजही श्रद्धास्थान आहेत. 

मेडिकल शिक्षण आणि वैद्यकीय उपचार सेवा तेव्हां अन आता- ‘आमच्यावेळी असे नव्हते हो! तेव्हाचे डॉक्टर म्हणजे साक्षात देवच! आता तर नुसता बाजार झालाय!’ मंडळी, लक्षात असू द्या, बदल हाच जीवनाचा स्थायी भाव आहे. स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर सरकारी मेडिकल कॉलेजेस सुरु झालीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांप्रमाणे डॉक्टर पेशंटचे प्रमाण १:१००० असायला हवे. आपल्या देशाच्या वाढत्या लोकसंख्येला अनुसरून १९८०च्या दशकात खाजगी महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली. मार्च २०२४ मधील (नॅशनल मेडिकल कौन्सिल) च्या आकडेवारीनुसार भारतात एकूण ७०६ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या ७०६ वैद्यकीय महाविद्यालयांपैकी ३८६ सरकारी आहेत तर ३२० खाजगी आहेत. डॉक्टर पेशंटचे प्रमाण आपल्या देशात १: ९००, म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांपेक्षाही चांगले आहे. 

मी दोनही क्षेत्रात कार्य केले आहे. इथे मला सर्वात मोठा फरक जाणवतो ते उपलब्ध निधीचा. सरकारी रुग्णालयातील पायाभूत सुविधा कमी, डॉक्टरांची संख्या कमी, (रिक्त जागा हे कायमचे दुखणे) मात्र एका बाबतीत सरकारी क्षेत्र दुथडी भरून वाहते, ते म्हणजे पेशंटची संख्या. गरीब रुग्ण अजूनही सरकारी दवाखान्याचा आधार घेतात. बहुतेक प्रायव्हेट दवाखान्यात पेशंटची आवक कमी! सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भरपूर पेशंट बघायला मिळतात. यात अपवाद नक्कीच आहेत. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातही हुशार विद्यार्थी आहेत. शेवटी चिकाटी, मेहनत आणि जिज्ञासू वृत्ती ही महत्वाची. अतिशय वेदनादायी भाग म्हणजे भरमसाठ फी भरून ‘मॅनेजमेंट कोट्यात’ आपल्या पाल्याला खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात घालणारे पालक. जिथे सुरुवातच ‘मेडिकल सीट’ विकत घेण्यापासून होते, त्या विद्यार्थ्याच्या भविष्यकालीन ATTITUDE विषयी मी काय बोलावे?

आता उद्भवणाऱ्या नवनवीन समस्यांमुळे डॉक्टर आणि पेशंटमधील दरी रुंदावत चालली आहे. कट प्रॅक्टिस, अनावश्यक वैद्यकीय चाचण्या, डॉक्टरांच्या फीमधली तफावत, पंचतारांकित रुग्णालयाकडे डॉक्टर आणि पेशंट्सचा वाढता कल, डॉक्टरांनी गावात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचे टाळणे, एक ना दोन! बघा मंडळी, डॉक्टर समाजाचाच एक हिस्सा आहे. जिथे सामाजिक निष्ठा आणि नैतिकतेचे सर्व क्षेत्रात अवमूल्यन होते आहे, तिथे डॉक्टर त्याला अपवाद कसे असतील? समाज म्हणतो, “डॉक्टरांनी त्यांच्या पांढऱ्या कोटासारखी स्वतःची स्वच्छ प्रतिमा जपायला हवी!” मात्र कांही घटना अशा घडतात की दवाखान्यात आणण्याआधीच पेशंट सिरीयस होता, डॉक्टरांनी शक्य ते सर्व उपचार केले, पण हाताबाहेर गेलेला आजार पेशंटचा बळी  घेऊन गेला! अशा परिस्थितीत शोकमग्न नातेवाईकांचा क्रोध अनावर होऊन त्यांनी डॉक्टरला मारहाण करणे आणि त्याच्या क्लिनिकची तोडफोड करणे हे योग्य नव्हे.

एखाद्या दवाखान्याची गुणवत्ता तपासायची असेल तर त्यासाठी एक महत्वाचा निकष म्हणजे डॉक्टर मंडळी रोग्याची तपासणी सरासरी किती वेळ करतात. ‘तेव्हा’ आणि ‘आता’ यामध्ये बराच फरक पडला आहे. तेव्हांची फॅमिली डॉक्टरची संकल्पना अतिशय उत्कृष्ट होती. बहुतेक डॉक्टर्स पदवीधर असायचे (MBBS, RMP, LMP, Homeopath, Ayurvedic). मात्र त्यांच्या हाताला ‘गुण’ होता, मोजकीच बाटलीबंद औषधे, गोळ्यांच्या पुड्या आणि अगदी क्वचित इंजेक्शन यात त्यांचे उपचार बंदिस्त असायचे. रोग्याची संपूर्ण हिस्टरी, सखोल तपासणी, अनुभवाने आलेले वैद्यकीय ‘ज्ञान’, उपजत आणि कमावलेली सेवावृत्ती, यातून बहुदा अचूक निदान साधले जात होते. वैद्यकीय चाचण्या गरज असल्यास क्वचित व्हायच्या. परंतु याहून अधिक होता तो त्यांचा रोगी आणि त्याच्या नातेवाईकांशी सतत सुरु असलेला सुसंवाद, आश्वासक नजर आणि प्रेमळ वागणूक! त्यांच्या निदानाविषयी आणि दिलेल्या उपचारावर रोग्यांचा पूर्ण विश्वास असायचा. यातूनच बरे झाल्यावर अनुभवांती पेशंट डॉक्टरला खुशाल मनाच्या देव्हाऱ्यात बसवायचे. या विश्वासामुळे रोगी आज्ञाधारक बाळासारखे डॉक्टरची प्रत्येक सूचना अंमलात आणत असत. तंत्रज्ञान तितकेसे विकसित नसूनही ‘क्लिनिकल जजमेण्ट’ जबरदस्त असायचे. 

‘क्लिनिकल जजमेंट’ (चिकित्साविषयक निर्णयक्षमता)  

डॉ. विल्यम ऑस्लर म्हणतात, “वैद्यकीय उपचार ही दवाखान्यात प्रत्यक्ष काम करून शिकण्याची कला आहे, क्लासरूममधील धडे गिरवून ती साध्य होत नाही! आजकालचे वैद्यकीय शिक्षण पुस्तकी ज्ञानाच्या आहारी गेले आहे. प्रत्यक्ष व्यावहारिक वैद्यकीय ज्ञान मिळवण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे. म्हणून भरगच्च आधुनिक वैद्यकीय चाचण्यांवर भर दिला जातोय. मात्र गेल्या ४-५ वर्षांपासून रोग्याशी ‘सुसंवाद’ साधण्याचे ‘शिक्षण’ मेडिकलच्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षांपासून देण्यात येत आहे. 

एक गोष्ट मला प्रकर्षाने मांडायची आहे की मार्कांसहित मेडिकल शाखेकडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा खरोखरच मनापासून कल (aptitude and ability) आहे कां हे निरपेक्ष वस्तुनिष्ठ चाचण्या घेऊन ठरवले पाहिजे. हे कां तर एक विद्यार्थ्याला डॉक्टर बनवण्यासाठीचा ७० % खर्च समाज उचलत असतो. मग पदवी प्राप्त केलेल्या डॉक्टरांनी समाजाला १००% उत्तम वैद्यकीय सेवा देणे हे उपकार नव्हेतच, तर ते डॉक्टरांनी फेडायचे समाजऋण आहे, अगदी बँकेतून एजुकेशनल लोन काढून तो हफ्ते भरतो तसेच. कधी तर MBBS ची आवड नसूनही पालकांच्या दबावाखाली किंवा अन्य कारणांनी ती डिग्री घेतल्यावर कांही हुशार पण असमाधानी विद्यार्थी IAS किंवा UPSC च्या परीक्षांकडे वळतात. एक अभिमानाची बाब ही की पुण्यातील AFMC मधून पास झालेले डॉक्टर भारतीय लष्करात सेवादाखल होतात! अशा डॉक्टर प्लस लष्करी अधिकाऱ्यांना माझा कडक सॅल्यूट!!!

जागतिक आरोग्य संघटनेनुसार आरोग्य ही केवळ रोग किंवा अशक्तपणाचा अभाव नसून संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्याची स्थिती आहे. 

लेखाच्या अंती खालील मुद्दे नमूद करते.

*डॉक्टर माणूस आहे, देव नव्हे, त्याच्याजवळ जादूची कांडी नाही.  

*डॉक्टरांना त्यांचे वैयक्तिक आणि खाजगी आयुष्य असते, त्यांना कधीतरी त्यांच्या कुटुंबाला वेळ देणे आवश्यक असते. अशा वेळेस ते त्यांचा वैयक्तिक अधिकार म्हणून गंभीर आजार नसलेल्या रुग्णाचा उपचार करण्यास नकार देऊ शकतात. मात्र रोगी गंभीररित्या आजारी असेल तर माणुसकीच्या नात्याने ते दुसऱ्या डॉक्टरकडे रोग्याला पाठवायची व्यवस्था करू शकतात. 

*प्रत्येक रुग्ण आणि त्याचा रोग हे वेगवेगळ्या वेळी डॉक्टरांसमोर वेगवेगळी आव्हाने उपस्थित करीत असतात, त्यातून सर्वोत्तम मार्ग काढणे आणि प्रयत्नात कुठेही कसूर न ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे. *मोठ्या कॉर्पोरेट दवाखान्यात डॉक्टर हा तेथील साखळीचा एक दुवा असतो, त्यातील आर्थिक नियोजनात बहुतांश डॉक्टरांचा सहभाग नसतो. 

*डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचना काटेकोरपणे पाळणे हे रोग्याचे परम कर्तव्य आहे. आजकाल हॉस्पिटल हॉपिंग (सेकंड, थर्ड किंवा त्याहून अधिक डॉक्टरांचे सल्ले घेणे), Mixopathy चा अवलंब करणे आणि आपले उपचार करणे, हे प्रकार वाढीस लागले आहेत. 

*डॉक्टरांनी रुग्णाला निरोगी जीवनशैलीचे महत्व समजावून सांगणे आवश्यक आहे. त्यात संतुलित आहार, व्यायाम, योग आणि ध्यान यांचा खूप मोठा सहभाग आहे. त्यासाठी त्यांनी स्वतः निरोगी जीवन शैलीचा अंगीकार करायला हवा! सिगारेट पीत पीत रोग्याला ‘तू सिगारेट पिणे बंद कर’ असे सांगणार का डॉक्टर?

वरील मुद्यांवर वाचकांनी आत्मचिंतन करून आपल्या सेवेशी तत्परतेने हजर असलेल्या डॉक्टरांच्या व्यवसायाचा आदर करीत त्यांच्यावर विश्वास ठेवावा, तसेच आपल्या आजाराची आणि आधी घेतलेल्या उपचाराची संपूर्ण माहिती त्यांच्यासोबत शेअर करावी असे मी आवाहन करते.  

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामयाः।

सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥        

(“सर्वजण सुखी होवोत, सर्वजण रोगमुक्त असोत, सर्वजण मंगलमय घटनांचे साक्षीदार राहोत आणि कोणालाही दुःखाचे भागीदार बनण्याची वेळ ना येवो!”)

डॉक्टर्स डे च्या सर्वांना निरामय शुभेच्छा!!!

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments