डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ श्रीमद्भगवद्गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक १ ते ११) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
संस्कृत श्लोक…
अर्जुन उवाच
मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसञ्ज्ञितम् ।
यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम ॥ १॥
कथित अर्जुन
कृपा करुनीया मजवरती कथिले गुह्य अध्यात्माचे
आकलन होउनिया तयाचे ज्ञान जाहले अज्ञानाचे ॥१॥
*
भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया ।
त्वतः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ॥२॥
*
विस्ताराने ज्ञान ऐकले उत्पत्तीचे प्रलयाचे
कमलनेत्रा तसेच तुमच्या अविनाशी महिमेचे ॥२॥
*
एवमेतद्यथात्थ त्वमात्मानं परमेश्वर ।
द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम ॥३॥
*
वर्णन केले अपुले आपण तसेच तुम्ही हे परमेश्वर
रूप पाहण्या दिव्य आपुले नेत्र जाहले माझे आतुर ॥३॥
*
मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो ।
योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम् ॥४॥
*
प्रभो असेन जर मी पात्र तुमच्या दिव्य दर्शनासी
दावावे मज योगेश्वरा तुमच्या अविनाशी स्वरुपासी॥४॥
श्रीभगवानुवाच
पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः ।
नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ॥५॥
कथित श्रीभगवान
विविध वर्ण आकाराचे शतसहस्र रूपे माझीअर्जुना
सिद्ध होई तू आता माझ्या अलौकीक या रूप दर्शना ॥५॥
*
पश्यादित्यान्वसून्रुद्रानश्विनौ मरुतस्तथा ।
बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत ॥६॥
*
माझ्याठायी दर्शन घेई आदित्यांचे वसूंचे तथा रुद्रांचे
अवलोकन होईल तुजला अश्विनीकुमारांचे मरुद्गणांचे
पूर्वी न देखिल्या अनेक देवतांच्या विस्मयकारी रूपांचे
भरतवंशजा इथेच तुजला दर्शन होइल त्या सकलांचे ॥६॥
*
इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरम् ।
मम देहे गुडाकेश यच्चान्यद्द्रष्टमिच्छसि ॥७॥
*
दृष्टीगोचर एकठायी स्थित चराचर सारे जगत
देही माझ्या पहायचे जे अन्य त्यासी पाही पार्थ ॥७॥
*
न तु मां शक्यसे द्रष्टमनेनैव स्वचक्षुषा ।
दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम् ॥८॥
*
दर्शन घेण्या या सर्वांचे चर्मचक्षु तव ना कामाचे
चक्षु अलौकिक प्रदान तुजला मम योगेश्वरी शक्तीचे ॥८॥
संजय उवाच
एवमुक्त्वा ततो राजन्महायोगेश्वरो हरिः ।
दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् ॥९॥
कथित संजय
कथुनी ऐसे रूप दाविले पापनाशक महायोगेश्वर भगवंताने
परम दिव्यस्वरूपी ऐश्वर्य-रूप प्रकटता पाहिले त्या पार्थाने ॥९॥
*
अनेकवक्त्रनयनमनेकाद्भुतदर्शनम् ।
अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् ॥१०॥
*
दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् ।
सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम् ॥११॥
*
बहुविधानने अनेक नयन दिव्याभूषण युक्त
दिव्यायुधे धारियलेली काया दिव्य गंध युक्त
मुखे व्यापिती सर्व दिशांना असीम विस्मय युक्त
विराट दर्शन परमेशाचे अवलोकित अर्जुन भक्त ॥१०, ११॥
☆
अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈