श्री मिलिंद जोशी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ डार्क वेब : भाग – 8 ☆ श्री मिलिंद जोशी ☆ 

मागील काही भागातून आपण डार्कवेब बद्दल माहिती घेत आहोत. त्यात आपण याचा वापर कोण करते? सरकारचे त्यावर नियंत्रण का नाही तसेच डार्कवेबचा वापर करणे कायद्याने प्रतिबंधित आहे का याचा मागोवा घेतला. आज आपण त्यातीलच एक गोष्ट बघणार आहोत. 

‘रेड रूम’

डार्कवेबचा विषय निघाला आणि रेडरूम बद्दल चर्चा झाली नाही असे सहसा होत नाही. ज्यांना डार्कवेब ही गोष्ट माहिती आहे त्यांना रेडरूम हेही माहित असते. अनेकदा तर लोकांना आधी रेडरूम बद्दल माहिती मिळते आणि नंतर त्याबद्दल जास्त माहिती घेताना डार्कवेब बद्दल माहिती मिळते. 

सर्वप्रथम ही ‘रेडरूम’ काय भानगड आहे ते पाहू. होय… भानगडच. कारण रेडरूम बद्दल तुम्हाला जी माहिती मिळेल त्यानुसार, रेडरूम म्हणजे अशी जागा ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीवर अत्याचार केले जातात किंवा त्याची हत्या केली जाते आणि ती घटना अनेक जण मनोरंजन म्हणून बघतात. थोडक्यात WWE मध्ये असते ना, दोन, चार जण एकमेकांना हातात येईल त्या गोष्टीने बदडतात आणि लोकांना ते बघण्यात आनंद वाटतो. इथे फक्त दोन गोष्टी बदलतात. पहिली गोष्ट म्हणजे इथे ज्या व्यक्तीवर अत्याचार केले जातात ती व्यक्ती सहन करण्याशिवाय काहीच करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे प्रेक्षक आपल्या घरी डार्कवेब इंटरनेटचा वापर करून आपल्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर हे सगळे बघू शकतात. या साठी ते दिलेल्या लिंकवर बीटकॉईन किंवा इतर एखाद्या डिजिटल करन्सीच्या रुपात पेमेंट करतात.

काही वेळेस तर असेही सांगितले जाते की यात तुम्ही दोन पध्दतीने भाग घेऊ शकतात. एक म्हणजे प्रेक्षक म्हणून. आणि दुसरे म्हणजे कोणत्या पद्धतीचा अत्याचार करायचा हे सांगून. हे सगळे लाइव्ह घडत असते, आणि हे बघण्यासाठी लोक हजारो / लाखो रुपये खर्च करतात. 

आता कुणाला असे वाटेल की एखाद्या निर्बल माणसावर अत्याचार करण्यात किंवा पाहण्यात कुणाला काय मजा येत असेल? आणि त्यासाठी कुणी हजारो, लाखो रुपये कुणाला का देतील? हाच विचार माझ्याही मनात आला होता. पण डार्कवेबवर अशा लिंक दिसतात हे मात्र खरे आहे. 

तुम्हाला आता रेडरूम म्हणजे काय हे थोडक्यात माहिती झाले असेल. आता याच्या पुढील प्रश्न. हे खरंच अस्तित्वात आहे का?

माझ्या मते अशा कोणत्याही रेडरूम डार्कवेबवर अस्तित्वात असणे जवळपास अशक्य आहे. का? कारण डार्कवेबचे काम करण्याची पद्धत. याआधीच्या भागात आपण पाहिले आहे की डार्कवेब क्लाइंट आणि सर्व्हर याची ओळख पटणे अवघड व्हावे यासाठी मास्किंग करत असते. त्यातून काही जण VPN चाही वापर करतात. त्यानुसार data अनेक वेगवेगळ्या आयपीवर पाठवला जातो. अशा अनेक ठिकाणाहून फिरत तो क्लाइंट पर्यंत पोहोचतो. इंटरनेटचा स्पीड लक्षात घेता अशा ठिकाणी लाइव्ह स्ट्रीमिंग कितपत शक्य आहे? म्हणजे टेक्निकली हे शक्य वाटत नाही. मग यात शक्यता कोणती असेल? तिथे एखादी लिंक देऊन झूम किंवा गुगलमिट सारख्या ठिकाणी सहभागी करून घेणे. पण इथे डार्कवेब वापरले जात नाही. डीपवेबचा यात वापर होऊ शकतो. ( गुगलमिट, झूम या गोष्टी डीपवेब प्रकारात मोडतात. कारण त्याचा वापर करण्यासाठी ज्याने अशी मिटिंग अरेंज केली असेल त्याची परवानगी लागते. )

रेडरूम बद्दल जर आपण कोणत्याही तज्ञाला विचारले तर त्याचे उत्तर असते, ‘मी याबद्दल ऐकले आहे पण कधीही रेडरूममध्ये गेलो नाही.’

काही जण आता असेही विचारतील की युट्युबवर तर याबद्दलचे अनेक व्हिडिओ दाखवले जातात. ते काय आहे? ते सगळे व्हिडिओ हे मुद्दाम बनवले जातात. किंवा अनेकदा वेगवेगळ्या चित्रपटातील क्लिपला ग्रेस्केल मध्ये ( म्हणजे black & white बनवून ) बदलून पोस्ट केले जातात. त्यामागे पोस्ट करणाऱ्याची मानसिकता ही थोडीशी मस्करी करण्याची किंवा आपल्याला काहीतरी जास्त माहिती आहे हे इतरांना सांगण्याची असते.   

असे सगळे असूनही मग डार्कवेबवर ‘रेडरूम’ बद्दलच्या लिंक का असतात? किंवा चार दिवसात ‘रेडरूम’ सेशन होणार आहे अशी लिंक का आढळते?

याला दोन कारणे आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे काही जणांच्या मनात अशा विचित्र भावना निर्माण होत असतात. काहीतरी थ्रिल म्हणून ते अशा ठिकाणी रजिस्ट्रेशन करतात. पैसे भरतात आणि फसले जातात. ज्याला पैसे मिळाले तो नंतर गायब होतो. आपण कुणाला पैसे पाठवले हेच माहिती नसेल तर तुम्ही त्याला पकडणार तरी कसे? म्हणजेच फसवणुकीसाठी अशा लिंकचा वापर अनेक hacker करतात.

याचे दुसरे कारण म्हणजे अशा अनेक लिंक काही देशाच्या सुरक्षा यंत्रणाच बनवत असतात. अशा ठिकाणी जे लोक येतात त्यांची माहिती घेऊन त्यांना अटक केली जाते. हा एक प्रकारचा सापळा असतो. अनेक विकृत लोक या सापळ्यात अडकतात आणि त्यांना योग्य ते शासन किंवा समुपदेशन केले जाते.   

अनेकदा डार्कवेब पेक्षाही विचित्र गोष्टी आपल्या सर्फेस वेबवर बघायला मिळतात. त्याचे साधे उदाहरण म्हणजे काही जण आत्महत्या करताना फेसबुक लाइव्ह करतात. काही गेम असे असतात की त्याचा उपयोग लहान मुलांना आत्महत्या करण्यास किंवा कुणाची हत्या करण्यास प्रवृत्त करतात. अनेक खेळांवर तर सरकारने बंदीही घातली आहे. आणि हे सगळे सर्फेस वेबवर चालते.  

थोडक्यात ‘रेडरूम’ ही गोष्ट डार्कवेबवर प्रत्यक्षात अस्तित्वात असणे जवळपास अशक्य आहे. 

मागील आठ भागांच्या लेखमालेतून डार्कवेब बद्दलची माहिती सोपी करून सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. पुढेमागे अशीच एखादी लेखमाला परत घेऊन येईन, तो पर्यंत रामराम… धन्यवाद…

©  श्री मिलिंद जोशी

वेब डेव्हलपर

नाशिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments