सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

(२३ जुलै १८५६ – १ अगस्त १९२०)

☆ “इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक  !” भाग –१ —लेखक : श्री पार्थ बावसकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

कुणी चितेजवळ रडत होतं, कुणी राख छातीशी घेत होतं : टिळक गेले त्या वेळची गोष्ट…

“आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस! अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिळक!”

“हजारो लोक मुंबईच्या सरदारगृहापुढे रस्त्यावर उभे होते. अखेर मध्यरात्र उलटली. १२ वाजून गेले. १ ऑगस्ट १९२०चा दिवस सुरु झाला आणि थोड्या वेळानेच लोकमान्यांचे देहावसान झाल्याची बातमी कोणीतरी लोकांना सांगितली. त्या क्षणी त्या प्रचंड जनसमुदायाच्या तोंडून शोकाचे आणि दुःखाचे विदारक उद्गार बाहेर पडले. त्याचे स्मरण झाले की, अजूनही अंगावर कंप उठतो. काही लोक तर धाय मोकलून रडले. ज्यांचे डोळे पाण्याने भरुन आले नाहीत, असा एकही माणूस त्या जनसमुदायात आढळला नसता. लोकमान्यांच्या मृत्यूची बातमी एखाद्या वाऱ्याप्रमाणे मुंबई शहरात ताबडतोब पसरली, मग रात्री झोप कोणाला येणार? लोकमान्यांची आठवण करून सारी मुंबईनगरी त्या रात्री अक्षरशः ढळाढळा रडली, असे म्हटले तर त्यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती होऊ नये.”

टिळक गेल्यानंतरचे हे उद्गार आहेत आचार्य अत्रेचे!

ते स्वतः त्या गर्दीचा एक भाग होते.

टिळक गेल्याचे समजले आणि गर्दी आणखीन वाढली.

त्याच रात्री मुंबईत गडकऱ्यांच्या ‘भावबंधन’ नाटकाचा प्रयोग सुरु होता. बाराशे रुपयांची तिकीट विक्री होऊन प्रयोग हाऊसफुल्ल झालेला. चौथा अंक सुरू झाला आणि आत काहीशी गडबड ऐकू आली. मंचावर घनश्यामच्या भूमिकेतले चिंतामणराव कोल्हटकर थांबले. तेवढ्यात तात्यासाहेब परांजपेंनी विंगेत येऊन टिळक गेल्याची वार्ता सगळ्या जनसमुदायाला सांगितली.

खेळ आपसूकच बंद झाला. ज्यांना तिकिटाचे पैसे परत हवे, त्यांना ते मिळतील, अशी सूचना देण्यात आली आणि पैसे परत करण्यासाठी एक माणूस तिकीटबारीवर जाऊन थांबला… .. पण, पैसे मागायला कुणी येईचना, सुमारे हजाराचा तो रसिकवर्ग एकाएकी उठला सरदारगृहाच्या दिशेने टिळकांना अखेरचे बघण्यासाठी निघाला. टाचणी पडली तरी भलामोठा आवाज यावा, असा सन्नाटा थिएटरभर पसरला होता.

या प्रसंगाचे साक्षी असलेले चिंतामणराव कोल्हटकर लिहितात,

“पायांचे आवाजसुद्धा ऐकू येऊ नयेत इतक्या शांततेत लोक बाहेर पडले. जमिनीला कान लावून ऐकणाऱ्यालासुद्धा ऐकू आले असते ते फक्त दुःखाचे निश्वास आणि रडण्याचे उसासे!”

रडण्याचे कढ हळूहळू वाढतच चालले होते. लोकमान्यांचे दर्शन घेण्यासाठी सरदारगृहाचे दार तोडण्यापर्यंत गर्दीची मजल गेली होती. शेवटी लोकांच्या दर्शनार्थ पहिल्या मजल्याच्या बाल्कनीत टिळकांचा देह आणून ठेवला, हा प्रसंग जसाच्या तसा लिहून ठेवणारे पुंडलिकजी तिथे उपस्थित होते.

ते सांगतात,

“प्रत्येक माणूस धडपडत टिळकांच्या दर्शनाला येई. टिळकांना बघितल्यावर त्याला भडभडून येत असे. एक माणूस म्हणाला, एका माणसाने त्या शवापुढे येताच आपल्या तोंडावर हातच मारून घेतला. एक म्हातारा मनुष्य म्हणाला, बाबा आता हिंदुस्थानला इंग्रजांच्या तावडीतून कोण सोडवणार रे?” असे म्हणून मोठ्याने किंकाळी फोडून तो रडूच लागला.

“श्री शिवाजी महाराजांचा मृत्यू, राजारामाचे अकाली मरण, पानिपतचा रणसंग्राम, नारायणराव पेशव्यांचा वध, सवाई माधवरावांची आत्महत्या अथवा नाना फडणवीस यांचा स्वर्गवास, या महाराष्ट्राच्या इतिहासातील ज्या भयंकर विपत्ती, त्यांच्याहून अणूमात्रही कमी नसलेली भयंकर वेळ आज महाराष्ट्रावर आलेली असून, तिने महाराष्ट्रातून आज बाळ गंगाधर टिळक यांना ओढून नेलेले आहे,” अशा शब्दांत या महानिर्वाणाचे वर्णन केले अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी।

टिळकांच्या पुण्यात ही बातमी समजली आणि पुणेकरांची मनेच हादरली. रडू आवरत कसेबसे लोक मुंबईला जायला निघाले. नेहमीच्या दोन रेल्वे कमी पडल्या. सरकारला ज्यादा गाड्यांची व्यवस्था करावी लागली.

टिळकांचे अंत्यसंस्कार पुण्यात व्हावे, अशी केळकरांची आणि सगळ्या पुणेकरांची इच्छा होती; इच्छा कसली त्यांचा हट्टच होता, नव्हे नव्हे हक्कही होता त्यांचा. कारण, पुणे ही टिळकांची कर्मभूमी! पण, मुंबईकरही हट्टाला पेटले होते. त्यांचेही म्हणणे बरोबरच होते, टिळकांची कर्मभूमी पुणे असली तरी ते आता एकट्या पुण्याचे राहिले नसून अवघ्या महाराष्ट्राचे ‘लोकमान्य’ झालेले होते.

तात्यासाहेब केळकर निघाले. पुण्याला आले. त्यांना ‘ केसरी ‘चा पुढचा अंक काढण्याची खटपट करावी लागणार होती. याच ‘केसरी’च्या आधीच्या अंकातून लोकांना सांगण्यात आले होते, लोकमान्यांची प्रकृती मलेरियाच्या तापाने थोडी बिघडली आहे, पण काळजी करण्याचं काही कारण नाही. लोकमान्य लवकरच ठणठणीत होतील..

आधीच्या अंकात ही बातमी वाचणाऱ्या वाचकांना हे कुठे माहिती होतं की, पुढच्या ‘केसरी’च्या अंकात टिळकांच्या मृत्यूची काळीज करपून सोडणारी बातमी आपल्याला वाचावी लागणार म्हणून ! ‘केसरी ‘चा हा अंक महाराष्ट्रातल्या घराघराला एक अकल्पित वज्राघातच वाटला.

ही बातमी अंदमानात सावरकरांना समजली त्यांनी आणि अंदमानातल्या सगळ्याच् कैद्यांनी एक दिवस अन्नपाणी घेतले नाही. टिळकांना आदरांजली म्हणून उपवास पाळला.

आणि इकडे मुंबईत, अफाट लोकसमुदायाबरोबर टिळकांची महानिर्वाणयात्रा दुपारी दीड वाजता सुरू झाली. दोन लाखांच्यावर लोकांची गर्दी यापूर्वी एखाद्या अंत्ययात्रेला कधीही झालेली नव्हती. स्त्रिया, पुरुष, म्हातारे, हजारो गिरणी कामगार, हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, जैन, हरेक भारतीय टिळकांचा जयजयकार करत चालला होता.

आकाशाची शिवण उसवावी, आभाळ फाटावे असा पाऊस त्यादिवशी पडत होता. टिळकांच्या चितेला अग्नी दिलाच जाऊ नये, अशी त्या वरुणाचीही इच्छा असावी बहुतेक. त्या पावसाच्या घनगंभीर अशा मेघगर्जनेपेक्षा टिळकांच्या महानिर्वाणयात्रेतील लोकगर्जना अवघा महाराष्ट्र हलवून सोडत होती, ती गर्जना होती, ‘टिळक महाराज की जय!’ लोक घराच्या खिडकीतून अंत्ययात्रा पाहत होते. टिळकांना अखेरचा नमस्कार करत होते. घराच्या गच्चीवरून पुष्पवृष्टी होत होती. माणसांच्या गर्दीत मुंगीलाही उभे राहता येत नव्हते. खापर्डे, गांधी हेही लोकांच्या जथ्थ्यात हेलकावे खात इकडून तिकडे ढकलले जात होते.

या महानिर्वाणयात्रेत ३५-४० वर्षांचा एक ख्रिस्ती तरुण साठीच्या पलीकडे झुकलेल्या आपल्या म्हाताऱ्या आईला घेऊन तेथे आला होता. लोकमान्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी ती ख्रिस्ती म्हातारी हेलकावे खात होती. तिचा जर्जर देह इकडून तिकडे फेकला जातो की काय, अशी अवस्था होती. हे पाहून तिचा मुलगा म्हणाला,

आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस! अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा ! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक!”

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री पार्थ बावसकर 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments