? इंद्रधनुष्य ?

 

 ‘ढिंचणिया’ — लेखक : मकरंद करंदीकर ☆ श्री सुनीत मुळे ☆

मांडी घालून जेवतांना अजब टेकू –…!!

भारतात पूर्वींपासून चालत आलेल्या भोजन पद्धती आणि जेवणासाठी वापरली जाणारी  वैशिष्ट्यपूर्ण भांडी, स्वयंपाकघरातील वेगळ्या वस्तू आणि अनेक प्रथा, आताशा लुप्त होत चालल्या आहेत. जमिनीवर मांडी घालून बसणे हा एक सर्वमान्य, सार्वकालिक अस्सल भारतीय प्रकार ..!! म्हणूनच आपण तिला ‘भारतीय बैठक’ म्हणतो ..!! 

मांडी घातल्यावर दोन्ही पावले, गुडघ्यांच्या खाली अशा तऱ्हेने घेतली जायची की त्यामुळे, दोन्हीही मांड्यांना आधार मिळत असे. हा सगळा इतका मोठा व्यायाम होता की ज्यामुळे सांधेदुखी, कंबरदुखी,गुडघ्यातील वेदना, ‘नी रिप्लेसमेंट’ असल्या  गोष्टी लांब राहत असत. कांही अपवाद वगळता भोजनासाठी, न्याहारीसाठी जमिनीवर, पाटावर,आसनावर बसण्याची पद्धत होती ..!! 

खरेतर, माणसाच्या नाभी पासून गुडघ्यापर्यंतच्या शरीराचे सर्वाधिक वजन असते. जमिनीवर बसल्यानंतर, नाभीपासून डोक्यापर्यंतचे वजनही त्यावरच येते ..!! 

मांडी घालून बसल्यावर,अधिक स्थूल मंडळींची गंमतच होत असे. त्यांचे दोन्हीही गुडघे जमिनीपासून खूप वरती राहत असत. अशा टांगलेल्या  अवस्थेत जास्तवेळ जमिनीवर बसणे अशक्य होते. त्यावर शोधून काढलेली वस्तू म्हणजे ‘ढिंचणिया’ म्हणजे ढोपर टेकू ..!! 

जेवायला जमिनीवर मांडी घालून बसल्यावर, अधिक स्थूल मंडळींची गंमतच होत असे. त्यांचे दोन्ही गुढघे जमिनीपासून खूप वरती राहत असत. अशा टांगलेल्या अवस्थेत जास्त वेळ जमिनीवर बसणे अशक्य होते. अशा अवस्थेत राहणाऱ्या मांड्यांच्या खाली द्यायचा आधार म्हणजे ‘ढिंचणिया’ ..!! हा एक ढिंचणिया साधारणत: डमरूसारखा, ५ ते ७ इंच उंच आणि ३ ते ४ इंच रुंद इतक्या आकाराचा असे. दोन गुडघ्यांखाली घेण्यासाठी याची जोडी बनवली जात असे. याचा तळ समईच्या तळासारखा जाड आणि एकसंध असायचा. त्यामुळे ते पटकन उलटत नसे ..!! मांडीला टोचू नये म्हणून याचा वरचा भाग हा कडेने आणि वरून गोल गुळगुळीत असे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की वरचा अर्धा भाग हा नक्षीचा जाळीदार असायचा. बराच काळ मांडीखाली ठेवल्याने तो शरीराच्या उष्णतेने तापू नये म्हणून ही जाळी असे. हे पितळ आणि कांशापासून बनविले जात असत. तत्कालीन कारागिर त्यावर खूप चांगली नक्षी कोरत असत. तांबे आणि हस्तिदंतापासूनही हे  ढिंचणिया बनविले जात असत. लाकडापासून बनविलेले  ढिंचणिया हे स्वस्त असल्याने अधिक लोकप्रिय होते. त्यावरही अतिशय आकर्षक रंगांमध्ये सुंदर नक्षी रंगविलेली असे. गुजरात (विशेषतः सौराष्ट्र) आणि राजस्थान ह्या भागांमध्ये हे ढिंचणिया वापरले जात असत ..!! अगदी खेडेगावात जेथे ढिंचणिया उपलब्ध नसतील तेथे, एखादा धातूचा डबा, लाकडी ठोकळा, कापडाचा बोळा अशा वस्तूही वापरल्या जात असत ..!!  

आपण एक हस्तटेकूही पहिला असेल. आसनावर हातात जपमाळ घेऊन बसलेल्या संत रामदासस्वामी आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हाताखाली दिसणाऱ्या इंग्रजी टी आकाराच्या टेकूला कुबडी म्हणतात. ह्याच्या आत स्व-संरक्षणासाठी शस्त्रही लपविले जात असे ..!! 

शहरांमध्ये आता जमिनीवर बसणे कायमचे बाद होत चालले आहे. छोटी नगरे आणि खेडीही ‘मॉडर्न’ होत चालली आहेत. आता या ढिंचणियांची गरजच संपली आणि ते दृष्टीआड होता होता सृष्टीआडही होत आहेत ..!!  अजून निदान त्याचा वापर तरी माहिती आहे. कांही वर्षांनी बहुधा या ‘अज्ञात वस्तू’ म्हणून तेथे शिल्लक राहतील ..!! 

लेखक : मकरंद करंदीकर 

प्रस्तुती : सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments